आमचं घर चांगलं चाललंय, विरोधकांनी आपलं घर पहावं!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Feb-2019
Total Views |


 


मुंबई : आमच्या भाजप-शिवसेना युतीचा काय खेळ होतोय हे पाहण्यापेक्षा त्यांच्या आघाडीचा काय खेळ होतोय हे विरोधकांनी पहावं. आम्ही त्यांच्यानंतर युतीची चर्चा सुरू करून युतीची घोषणाही केली. पण त्यांचं अजूनही काही ठरत नाहीय. तेव्हा आमचं घर चांगलं चाललंय, विरोधकांनी आपलं घर पाहावं. आमच्या घराची चिंता करू नये, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी विरोधकांना लगावला.

 

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या चहापानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. आम्ही त्यांच्यानंतर युतीची चर्चा सुरू करून युती घोषितही केली. दोन महिन्यांपासून त्यांची चर्चा सुरूच आहे. अजूनपर्यंत त्यांनी नगरची जागा कुणाला जाईल, औरंगाबादला कोण लढेल हेही ते ठरवू शकलेले नाहीत. तेव्हा त्यांनी त्यांचं घर पाहावं, आमच्या घरात डोकावू नये, असा टोला लगावतानाच मुख्यमंत्र्यांनी शिवसेना नेहमीच आमच्यासोबत होती. शंका माध्यमांना होती. आम्हाला याविषयी कोणतीही शंका नव्हती. भाजप-शिवसेनेची एकत्रित शक्ती महाराष्ट्राच्या हिताकरता पहायला मिळेल, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी लोकसभा-विधानसभा एकत्रित निवडणुकीची शक्यताही मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावली.

 

मुंबईच्या विकास आराखड्यासंदर्भात कोर्टात जाण्याची विखे-पाटील यांच्याकडून धमकी दिली जात आहे. यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी विखे-पाटील कधी कोर्टात जातात याची वाटच बघतोय असे सांगितले. त्याचप्रमाणे प्रियंका गांधी यांच्या राजकारणातील प्रवेशाबाबत बोलताना कोणीही यावं, त्यांना विरोधातच काम करायचंय असा टोलाही त्यांनी लगावला.

 

मित्र पक्ष आमच्यासोबतच...

 

रिपाई अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांच्यासोबत कालच आम्ही चर्चा झाली आहे. महादेव जानकर तसेच सदाभाऊ खोत यांच्याशीही चर्चा झाली आहे. महादेव जानकर यांच्या निवसस्थानावर मित्रपक्षही उद्या भेटत आहेत. आम्ही त्यासंदर्भात स्पष्ट भूमिका मांडली आहे. मित्रपक्षांशी चर्चा करून त्यांच्या जागा ठरल्यानंतरच जागा अर्ध्या-अर्ध्या करणार आहोत. लोकसभा असो वा विधानसभा आमचे मित्रपक्ष आमच्यासोबतच राहतील. त्यांची काळजी आम्ही घेऊ, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

 

धनगर आरक्षण अंतिम टप्प्यात

 

धनगर आरक्षणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून 'टीस'च्या अहवालानंतर शिफारशींवर कोणती कारवाई करावी याबाबत महाअधिवक्त्यांचा सल्ला घेतला जात आहे. त्या सल्ल्यानुसार पुढील कारवाई लवकरात लवकर केली जाईल. गरीबांसाठी घोषित करण्यात आलेल्या १० टक्के आरक्षणाचा लाभ मुस्लिमांनाही मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे मराठा समाजाच्या आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेले अनेक गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. जे गुन्हे मागे घेतले नाहीत त्यांचीही प्रक्रिया सुरू आहे. मात्र पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला त्यांच्यावरील गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

 

पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुबीयांना नोकरी

 

अर्धसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पुलवामा हल्ल्याच्या घटनेमुळे विरोधकांकडून चहापानाला येणार नसल्याचे सांगण्यात आले. मात्र हे चहापान म्हणजे 'सेलिब्रेशन' नसते तर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांनी एकत्र बसून कामकाज ठरवावं म्हणून असते. तरीही विरोधकांच्या भावनांचा आदर करतो असे सांगून मुख्यमंत्र्यांनी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्रातील जवानांच्या कुटुंबीयांना पन्नास लाखांची मदत देण्यात येणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी दिली जाईल, अशी घोषणाही केली.

 

दुष्काळाचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज

 

यंदा राज्यात मोठा दुष्काळ पडला असून त्याचा सामना करण्यासाठी प्रशासन यंत्रणा सज्ज आहे. जनावरांना चारा पुरविण्यासाठी आवश्यक तिथे चारा छावण्या उभारल्या जात आहेत. या छावण्यांमध्ये आतापर्यंत पंधरा हजार जनावरांना समावून घेण्यात आले आहे. त्याचप्रमाणे चारा टंचाईच्या भागात चारा लागवडीलाही प्रोत्साहन दिले जात आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दुष्काळग्रस्त भागांत २०१९ गावं आणि चार हजार ५९२ वाड्यांना दोन हजार ४३५ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे. विरोधकांकडून दुष्काळासंदर्भात ज्या बाबी सुचवल्या जातील त्याला सकारात्मकतेने उत्तर दिले जाईल. त्यांच्या सुचनाही मान्य केल्या जातील असे मुख्यमंत्री म्हणाले.

 

ईडी'ची भीती विरोधकांना!

 

आमच्यासाठी 'ईडी'चा अर्थ हा 'एफिसिएंट डेव्हलपमेंट' असा आहे. यासाठीच आम्ही एकत्र आलो आहोत. मात्र विरोधकांनी 'ईडी'ला घाबरण्यासारखी लायक कामे केली आहेत. म्हणून त्यांना त्याची भीती वाटत असल्याचे मुख्यमंत्री एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@