चिपळुणात रविवारपासून ‘विश्वकल्याण महोत्सव’, घडणार हिंदुत्वाचे विराट दर्शन!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Feb-2019
Total Views |


 


दि. २८ रोजी हिंदूऐक्यासाठी सामाजिक समरसता यज्ञाचेही आयोजन

 

साध्वी ऋतंभरा सलग ७ दिवस श्रीमद्भागवत कथा निरूपण करणार

  

चिपळूण : कोकणातील मध्यवर्ती केंद्र असलेल्या आणि ‘परशुरामनगरी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिपळूण शहरात रविवार, दि. २४ फेब्रुवारीपासून ते दि. ३ मार्चपर्यंत आठदिवसीय ‘विश्वकल्याण महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. विश्व हिंदू परिषदेच्या पुढाकारातून श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्ती संस्थान आणि अनेक हिंदुत्वनिष्ठ संस्था-संघटना आणि कार्यकर्त्यांच्या सहभागातून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून याद्वारे कोकणच्या भूमीत विराट हिंदूऐक्याचे दर्शन घडवण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

 

चिपळूण येथील पवन तलाव मैदानावर हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवातील वैशिष्ट्य म्हणजे साध्वी ऋतंभरा उर्फ दीदी माँ या रविवार, दि. २४ पासून शनिवार, दि. २ पर्यंत सलग सात दिवस श्रीमद्भागवत कथेचे निरूपण करणार आहेत. तसेच, आस्था या दूरचित्रवाणी वाहिनीवरून या कार्यक्रमाचे प्रक्षेपणही केले जाणार आहे. याशिवाय, गुरूवार, दि. २८ फेब्रुवारी रोजी सामाजिक समरसता यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध जातींतील हिंदू बांधवांनी सहकुटुंब एकत्र येत हिंदू समाजाच्या एकत्रित उन्नतीसाठी व कोकण भूमीच्या समृद्धीसाठी हा यज्ञ आयोजित केला आहे. याखेरीज, या संपूर्ण महोत्सवाच्या कालावधीत हिंदू समाजातील प्रमुख संप्रदायांच्या प्रमुख संतांचे प्रवचन व मार्गदर्शन, विशेष महासत्संग, सामुदायिक हरिपाठ, वेदपठण, गाथा भजन, संगीत काकडआरती, शेतकरी सत्संग, महिला सत्संग, युवक मार्गदर्शन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, श्रीक्षेत्र पंढरपूरहून श्रीपांडुरंग, आळंदीहून संत ज्ञानेश्वर, देहूहून संत तुकाराम यांच्या पादुकांचेही चिपळुणात आगमन होत असून त्यांच्या दर्शन सोहळ्यासह भव्य दिंडी आणि रिंगण सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले आहे.

 

संत-महंतांची मांदियाळी..

 

सदर विश्वकल्याण महोत्सवात ‘जगतगुरू’ नरेंद्राचार्य (दक्षिणपीठ, नाणीज), अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज, योगगुरू स्वामी रामदेव, साध्वी सत्यप्रिया (वृंदावन), विहिंपचे कोकण प्रांत धर्माचार्य संपर्कप्रमुख धर्माचार्य अनंत कार्ले, ‘हिंदूभूषण’ शाम राठोड (वृंदावन), डॉ. राहुल बोधी यांच्यासह देशभरातील अनेक संत आणि धार्मिक-अध्यात्मिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. हिंदू समाजाच्या उन्नतीसाठी, सर्व हिंदूंचे जाती-पाती विरहित संघटन उभे राहण्यासाठी आणि कोकण भूमीच्या समृद्धीसाठी आयोजित या आठदिवसीय महोत्सवात सर्व कोकणवासीय बंधू-भगिनींनी सहकुटुंब सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन विश्वकल्याण आयोजन समितीचे अध्यक्ष ह. भ. प. भगवान कोकरे आणि कार्याध्यक्ष उदय चितळे यांनी केले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@