ते झिजले म्हणून...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Feb-2019   
Total Views |

 

 
 
 
 
देशाला परम वैभवाला नेण्याचे आणि उत्तम व्यक्ती व समाजनिर्मितीचे ध्येय गाठीशी घेऊन १९३६ साली राष्ट्र सेविका समितीची लक्ष्मीबाई केळकर यांनी स्थापना केली आणि आजही समितीचे कार्य देशभरात उत्कृष्टपणे सुरू आहे. सुशीला महाजन यांनी आपल्या ‘डाव मांडियेला’ या आत्मचरित्रपर पुस्तकातून राष्ट्र सेविका समिती, जनसंघ, पती मधुकरराव महाजन आणि एका विचाराला वाहिलेल्या परिवाराचा लेखाजोखा मांडला आहे.
 
 
कोणतीही संघटना उभी राहते आणि घडते, ती कार्यकर्त्यांच्या बळावरच! प्रारंभीच्या काळात पायाचे चिरे झालेल्यांच्या कष्टावरच संघटनेचा वृक्ष बहरतो आणि भावी पिढ्यांना गोड फळे देतो. देशात स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातही अनेक संघटनांचा जन्म झाला. काही संघटना काही काळ चालल्या आणि नंतर संपल्याही. अर्थातच, राजकीय, सामाजिक व वैचारिक क्षेत्रात पुरुषांचा पगडा असल्याने अपवाद वगळता सर्वच संघटनांचे कर्तेधर्ते पुरुषच होते. पण, देशाला परम वैभवाला नेण्याचे आणि उत्तम व्यक्ती व समाजनिर्मितीचे ध्येय गाठीशी घेऊन १९३६ साली राष्ट्र सेविका समितीची लक्ष्मीबाई केळकर यांनी स्थापना केली आणि आजही समितीचे कार्य देशभरात उत्कृष्टपणे सुरू आहे. सुशीला महाजन यांनी आपल्या ‘डाव मांडियेला’ या आत्मचरित्रपर पुस्तकातून राष्ट्र सेविका समिती, जनसंघ, पती मधुकरराव महाजन आणि एका विचाराला वाहिलेल्या परिवाराचा लेखाजोखा मांडला आहे.
 

रुढार्थाने हे पुस्तक जरी ‘आत्मचरित्र’ असले तरी, ते देशाचेही स्वातंत्र्योत्तर चरित्र ठरावे, एवढ्या घटना, प्रसंग आणि घडामोडींची माहिती यात सुशीला महाजन यांनी आहे. विशेष म्हणजे, या कालावधीतील कितीतरी गोष्टी ज्या आज आपल्याला केवळ ऐकून माहिती असतात, त्या सर्व घटनांची लेखिका प्रत्यक्ष साक्षीदार असल्याचेही शब्दाशब्दांतून जाणवत राहते. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळातल्या ‘छोडो भारत’ चळवळीपासून ते देशाची फाळणी, निर्वासितांचे दु:ख, जनसंघाची स्थापना, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींचे काश्मीरमधील आंदोलन व त्यांचा मृत्यू आणि तद्नंतरची जनसंघाची वाटचाल ‘डाव मांडियेला’ पुस्तकातून उलगडत जाते. वाचकांची गोळवलकर गुरुजी, पं. दीनदयाळ उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी, जगन्नाथराव जोशी, बाळासाहेब देवरस, लक्ष्मीबाई केळकर, लालकृष्ण अडवाणी अशा स्वयंदीप्तिमान व्यक्तिमत्त्वांशी सहजतेने भेट होते व त्यांच्यातील साधेपण, माणूसपण दृष्टीस पडते. पुढल्या काळात इंदिरा गांधींनी लादलेली आणीबाणी, कार्यकर्त्यांना तुरुंगात भोगाव्या लागणाऱ्या हाल-अपेष्टा, लेखिकेची कार्यकर्त्यांना सणावाराला तरी गोडा-धोडाचे जेवण मिळावे यासाठीची धडपड, नंतर महाराष्ट्रातील ‘किल्लारीचा भूकंप’ आणि ज्या विचारांसाठी आयुष्यभर कार्य केले, त्या विचारांची व्यक्ती म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधानपदी आरुढ झाल्यानंतरचा आनंद आदी प्रत्येक घटना, प्रसंग लेखिकेने सुलभ व प्रवाही भाषेत वर्णिली आहे.

 

राष्ट्र सेविका समितीच्या कार्यालाच कर्तव्य मानलेल्या लेखिकेला जीवनप्रवासात पती मधुकरराव महाजन यांची मोलाची साथ मिळाली. ‘डाव मांडियेला’ या शीर्षकातूनही ते ध्वनित होते. समितीच्या कामासाठी गाव-खेड्यांपासून, शहरा-नगरांत ते उत्तर-दक्षिण आणि पूर्व-पश्चिम अशा सर्वच राज्यांत प्रवास आणि समितीचे कार्य, बैठका, संमेलने आयोजित करताना लेखिकेला मधुकरराव महाजन यांनी कधीही ‘नाही’ म्हटले नाही. उलट लेखिकेला काही वैयक्तिक वा कौटुंबिक कारणांमुळे जावेसे वाटले नाही, तर तेच कार्य करणे कसे गरजेचे आहे, हेही सांगत. शिवाय लेखिकेच्या दोन्ही मुली विद्या व सुषमा यांचीही प्रत्येक वेळी सोबत मिळत गेली. मात्र, पतीचे आजरपण व निधनाने एकाकी झालेली लेखिका नंतर ज्या इराद्याने घराबाहेर पडते व आजही देश व समाजहितासाठी काहीतरी करण्याची इच्छा बाळगते, हे नक्कीच कौतुकास्पद! याचबरोबर अमेरिका, इस्रायल आदी देशांचा प्रवास आणि लेखिकेने दिलेली व्याख्याने, गीतांचा कार्यक्रम, लक्ष्मीबाई केळकरांवरील पुस्तक व चित्रपट, दरम्यानच्या काळात भेटलेली माणसे, त्यांचे आलेले चांगले-वाईट अनुभव अशा सर्वच प्रसंगांची शिदोरी ‘डाव मांडियेला’मधून वाचायला मिळते.

 

महत्त्वाचे म्हणजे, कार्यकर्ता कसा असतो, कसा असावा आणि आताची कार्यकर्त्यांची पद्धती अशा सगळ्याच गोष्टी पुस्तकातून कळतात. घर की संघटना, कौटुंबिक नाते की कार्यकर्ते, असा निर्णय घेण्याचीही वेळ कार्यकर्त्यांवर येत असते. या प्रश्नांचे उत्तर नेमके कसे शोधायचे, हेही वाचकाला व कार्यकर्त्यालाही समजते. ओघवत्या भाषेमुळे पुस्तक प्रभावी झाले असून, वाचायला घेतल्यावर पूर्ण होईपर्यंत ते ठेवू नये असे वाटते.

 

पुस्तकाचे नाव : डाव मांडियेला

लेखक : सुशीला महाजन

प्रकाशक : शिल्पा प्रकाशन

पृष्ठे : २००

किंमत : २३०/-

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/आणिtwitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@