नाणार रिफायनरी व्हायलाच हवी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Feb-2019
Total Views |


 


मुंबई : नाणार रिफायनरी प्रकल्पामुळे तळकोकणात समृद्धी येईल. राजापूर परिसरात किमान दीड लाख नोकऱ्या उपलब्ध होतील. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्प समर्थकांच्याही भावना ऐकून घ्याव्यात,” अशी मागणी भाजपचे कणकवलीचे माजी आमदार व नाणार रिफायनरी समर्थक प्रमोद जठार यांनी केली. त्यासाठी प्रमोद जठार यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्प समर्थकांचे शिष्टमंडळ येत्या सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी जी जमीन जाणार आहे, त्यासंबंधीचे पॅकेज सरकारने आधी जाहीर करावे. त्यानंतरच लोकांचा या प्रकल्पाबाबतचा खरा कौल कळेल, असाही दावा जठार यांनी केला. राजापूर तालुक्यातील नाणार येथील रिफायनरी प्रकल्पामुळे दीड लाख नोकऱ्या उपलब्ध होणार असून या प्रकल्पामुळे पर्यावरणाला बाधा पोहोचत नाही. भारतात २३ ठिकाणी रिफायनरी प्रकल्प असून कोकणातील हा प्रकल्प पहिलाच आहे. या प्रकल्पामुळे राजापूर शहरात व परिसरात मोठी आर्थिक उलाढाल होणार असून त्याचा फायदा स्थानिकांनाच होणार आहे. प्रकल्पामुळे कोकणातील अनेक पिढ्या सुखी होतील, असा विश्वास जठार यांनी व्यक्त केला. सुरुवातीला शिवसेनेचे या प्रकल्पाला पूर्ण समर्थन होते. आता मात्र ते विरोधाचे राजकारण करत आहेत. या प्रकल्पामुळे राजापुरात आर्थिक गंगा येणार असून या प्रकल्पाविरोधात केले जाणारे राजकारण दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले.

 

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते खा. नारायण राणे यांनी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आणला. तसेच रत्नागिरीचे आमदार उदय सामंतांनी जेएसडब्लूचा कोळशावर चालणारा ऊर्जा प्रकल्प आणला. या प्रकल्पामुळे पर्यावरणाचे नुकसान झाले नाही काय, असा सवालही यावेळी प्रमोद जठार यांनी केला. स्मार्ट सिटी, ‘एम्स’च्या धर्तीवर अत्याधुनिक हॉस्पिटल, मच्छीमारांसाठी आधुनिक बंदर, आंबा-काजू रिसर्च सेंटर यांसारख्या सोयी-सुविधा कोकणात नाणारच्या निमित्ताने होत असतील तर वावगे काय, असेही त्यांनी विचारले. सरकार एवढे सगळे देत असताना जर हा प्रकल्प नाकारला गेला तर कोकणी माणसाच्या कपाळावर प्रकल्प व विकास विरोधक असा शिक्का बसेल, अशी भितीही त्यांनी शेवटी व्यक्त केली.

 

...तर आम्हाला युती नको!

 

नाणारसारखा कोकणच्या भरभराटीसाठी आवश्यक असणारा प्रकल्प कोकणातून हद्दपार होणार असेल तर आम्हाला भाजप-शिवसेना युती नको, असेही वक्तव्य प्रमोद जठार यांनी यावेळी केले. तसेच येत्या लोकसभा निवडणुकीत इतर तिन्ही पक्षांचे नेते प्रकल्पाविरोधातील मुद्दा घेऊन उतरणार असतील तर त्याठिकाणी प्रकल्पाच्या समर्थनार्थ बाजू मांडायला मी निवडणुकीत उभा रहायला इच्छूक आहे, असेही जठार यांनी स्पष्ट केले.

 

सध्या कोकणवासियांसमोर बेरोजगारी ही प्रमुख समस्या असून जर रोजगारच उपलब्ध नसतील तर त्यांनी करायचे काय? अशा वैफल्यग्रस्त परिस्थितीमुळेच कोकणी माणूस नाईलाजाने परप्रांतियांना जमिनी विकत आहे. हे दुष्टचक्र थांबवायचे असेल तर नाणार रिफायनरी प्रकल्प तळकोकणात होणे अत्यंत गरजेचे आहे.

 

प्रमोद जठार

माजी आमदार, कणकवली

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@