भारताने नाड्या आवळल्या; पाकिस्तानमध्ये महागाईचा भडका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Feb-2019
Total Views |
 
 
 

नवी दिल्ली : काश्‍मीर पुलवामा दहशतवादी हल्लाच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानच्या चांगल्याच नाड्या आवळण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रावी नदीचे पाणी धरण बांधून अडवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता शेतकऱ्यांनीही आपले हत्यार उपसले आहे. माल सडला तरी चालेल पण पाकिस्तानला निर्यात होऊ देणार नाही, अशी भूमिका निर्यातदार शेतकऱ्यांनी घेतली आहे.

लाहोरमध्ये टोमॅटो खरेदी करण्यासाठी एका किलोसाठी तब्बल १८० रुपये मोजावे लागत आहेत. भाज्यांचे दरही कडाडले आहेत. पुलवामा हल्ल्यामध्ये भारताचे ४४ जवान हुतात्मा झाले. संपूर्ण देशात पाकिस्तानविरुद्ध संतापाची लाट आहे. त्यांच्या कुरापतींना प्रत्युत्तर म्हणून भारताने अद्याप युद्धाबद्दल विचार केला नसला तरीही चोहोबाजूंनी कोंडी करून पाकला नमवण्याची भूमिका भारताने घेतली आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर लगेचच भारताने पाकिस्तानचा 'मोस्ट फेव्हर्ड नेशन'चा दर्जा काढून घेतला आणि आयात-निर्यात शुल्कही वाढविले आहे. त्याचवेळी, देशातील व्यापाऱ्यांनीही पाकिस्तानला करणारी निर्यात थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. रस्ते मार्गाने होणारी मालवाहतूक बहुतांशी ठप्प झाली आहे. मध्य प्रदेशमधील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचा माल पाकिस्तानमध्ये न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. आझादपूर भाजी मंडईतून पाकिस्तानला सर्वाधिक नाशवंत माल पुरवठा केला जातो. अत्तारी-वाघा या मार्गे रोज किमान ७५ ते १०० ट्रक टोमॅटो पाकिस्तानला निर्यात होतात.

पुलवामा हल्ल्यानंतर सर्व निर्यात थांबली आहे. टोमॅटो, भाज्या, कापूस इत्यादींच्या निर्यातीवरही परिणाम झाला आहे. 2017 मध्येही भारत-पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यावेळीही निर्यात बंद केल्यानंतर लाहोर आणि पंजाब प्रांतात काही ठिकाणी टोमॅटोचे भाव ३०० रुपये प्रतिकिलो एवढे झाले होते.

 

आखाती देशांना माल निर्यात करा

शेतकऱ्यांनी केंद्र सरकारकडे आखाती देशांमध्ये माल निर्यात करण्यासाठी परवानगी मागितली आहे. यासाठी त्वरित कार्यवाही करण्याची मागणी शेतकरी आणि निर्यातदारांनी केली आहे.

 

पाकचे खजूर सीमेवरच

पाकिस्तानकडून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंनाही भारतात बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानहून आणला जाणारा खजूर हा सीमेवरच पडून आहे. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्राने मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला. त्यानंतर आयातशुल्क दोनशे टक्के केल्याने पाकिस्तानी निर्यातदारांचे मोठे नुकसान होत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
@@AUTHORINFO_V1@@