क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृतिकेंद्राच्या आराखड्याला मंजुरी :-देवेंद्र फडणवीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Feb-2019
Total Views |
 

 
 
धरणगाव, 21 फेब्रुवारी :
वनवासी समाजाला न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी राज्य सरकार त्यांच्या सदैव सोबत आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात वनवासी समाजाचे खूप मोठे योगदान असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृतिसंस्था, धरणगाव तर्फे आयोजित जनजाती मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी रा. स्व. संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी प्रमुख मार्गदर्शक, तर अतिथी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. रामेश्वर संस्थांनचे महंत नारायनस्वामी यांच्या आशीर्वादाने या मेळाव्यास प्रारंभ झाला.
 
मुख्यमंत्र्यांचे भाषण:
धरणगाव येथे जनजाती मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, सरकार वनवासी समाजाच्या सोबत उभे आहे. वनवासी समाजासाठी सुरू केलेल्या सर्व योजना सरकार प्रभावीपणे राबवित आहे. आज खाज्याजी नाईक यांच्या स्मारकाचे अनावरण आपण केले. ही आनंदाची बाब आहे.
 
भारताच्या इतिहासामध्ये जनजाती समाजाचा एक अत्यंत समृद्ध अशा प्रकारचा इतिहास राहिला आहे. हजारो हजारो वर्षे या भारतामध्ये जल, जमीन आणि जंगल यांना वाचवण्याचं काम जर कोणी केलं असेल, तर ते आमच्या जनजाति समाजाने केलं आहे. भारत देश पारतंत्र्यात गेला असतानादेखील अनेक वनवासी बंधूनी बलिदान दिले आहे.
 
भीमा नाईक व खाज्याजी नाईक यांनी इंग्रजांच्या हातात इथल्या गोर गरिबांच्या कष्टाचे पैसे पडू नये यासाठी प्रयत्न केले होते. एका चकमकीत इंग्रजांनी ६० जनांना गोळ्या घातल्या. त्यात खाज्याजी यांचं शीर कापुन लटकावले गेले होते. अश्या राष्ट्रभक्ताचे स्मारक व्हावे ही सगळ्यांची इच्छा होती. ती आज या निमित्ताने पूर्ण होत आहे.
 
 
या स्मृती संस्थेच्या मार्फत जनजाती बंधूंच्या मुलांचे शिक्षण, संगोपन व्हावे व त्यांना अत्याधुनिक शिक्षण मिळावे म्हणून प्रयत्न केले पाहिजे.
 
आदिवासी समाजासाठी राज्य सरकार कार्यरत असून या समाजासाठी आम्ही वनपट्टे निर्माण केले आहेत. आम्ही पेसा क्षेत्र निर्माण करून वनवासी समजाला त्यांचे हक्क मिळवून देत आहोत. या स्मारकानिमित्त 15 कोटी रुपयांच्या आराखड्याला आम्ही आज मान्यता दिली अशी जाहीर करतो, असे सांगून त्यांनी सर्वांना सुखद धक्का दिला.
 
पुलवामा घटनेचा निषेध करत काही लोक आपल्या देशाविरोधात उभे राहतात, येथील लोकांचा बुद्धिभेद करतात व त्यांच्याकडून समाजात फूट पाडतात. अश्या लोकांपासून सावध राहिले पाहिजे. असे त्यांनी यावेळी सांगितले.
 
काय बोलले मा. भैय्याजी?
भाषेच्या, जातीच्या आधारावर इंग्रजांनी भेद निर्माण केले. देशातील लोकांची एकता इंग्रजांच्या राजवटीसाठी धोकादायक होती. आदिवासी हेच या देशाचे मूलनिवासी असल्याचे विधान करून त्यांच्यावर अन्य लोकांनी अन्याय केल्याचे भासवले जाते. सामाजिक सद्भावनेसाठी हा धोका असल्याचे भैयाजी आपल्या भाषणात म्हणाले.
 
देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा त्या लढ्यात सर्व समाज उतरला होता. राणा प्रतापासोबत युद्धात भिल्ल समाज उभा राहिला. शिवाजी महाराजासोबतही तत्कालीन वनवासी समाज खंबीरपणे उभा होता.
 
पुढल्या काळात बिरसा मुंडा यांच्या सोबत वनवासी समाज देशासाठी पुन्हा उभा राहिलेला दिसून आला. मध्य भारतात तंट्या भिल यांच्या नेतृत्वात भिल्ल समाज पुन्हा एकवटला. खान्देशात खाज्याजी नाईक व फत्तेसिंग उभे राहिले. यावरून हे लक्षात येते की भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात वनवासी समाजानेही उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यामुळे देशासाठी आता तरी जातीच्या भिंती मोडून सर्व समाज एक झाला पाहिजे. देशात फक्त 'देशभक्त' आणि 'देशद्रोही' याच खऱ्या जाती असल्याचे त्यांनी सांगितले.
 
मधल्या काही कालखंडात समाज विकास व सेवांपासून वंचित राहीला. आजच्या संवेदनशील सरकारने समाजाच्या खालच्या स्तरापर्यंत विकास व योजना पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. पण केवळ सरकारवर अवलंबून राहून चालणार नाही. प्रत्येकाने आपल्या कर्तव्याची जाण ठेऊन समाज हितासाठी कार्य केले पाहिजे. तसेंच शासनाच्या सोबत सामाजिक संस्थांनी उभे राहण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
 
भैयाजींच्या भाषणानंतर लगेचच कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी रामेश्वर संस्थानचे महंत नारायनस्वामींसह रा.स्व. संघाचे अखिल भारतीय धर्मजागरण प्रमुख शरदराव ढोले, देवगिरी प्रांत धर्मजागरण प्रमुख नंदू गिरिजे, जिल्हा संघचालक राजेश आबा पाटील, वनवासी कल्याण आश्रमाचे चैत्राम पवार, क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृतिसंस्थेचे अध्यक्ष भाईदास सोनवणे, उपाध्यक्ष यशवन्त कुवर, संजय महाराज, सुखदेव बुधा सोनवणे, युसुफ तडवी, समीर तडवी, सोमनाथ भिल, व विविध क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते. तसेच आमदार सुरेश भोळे, आमदार गुलाबराव पाटील, जि.प. अध्यक्षा स्मिता वाघ, खासदार ए.टी. नाना पाटील इ. नेतेमंडळी उपस्थित होती.
@@AUTHORINFO_V1@@