डॉ. गो. बं. देगलूरकर यांना 'श्रीगुरुजी' राष्ट्रीय पुरस्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Feb-2019
Total Views |


 

 

यावर्षी वाङमय आणि सेवा क्षेत्रासाठी पुरस्कार घोषित

 

नांदेड : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचा यंदाचा परमपूजनीय श्रीगुरुजी पुरस्कार जाहीर झाला आहे. पुण्याचे विचारवंत डॉ. गोरक्षनाथ बंडामहाराज देगलूरकर व मध्य प्रदेशातील सामाजिक कार्यकर्त्या भारती ठाकूर यांना यावर्षीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. रा. स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक स्वर्गीय माधव सदाशिव गोळवलकर तथा श्रीगुरूजी यांच्या स्मरणार्थ १९९६ पासून राष्ट्र जीवनाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो.

 

परमपूजनीय श्रीगुरुजी पुरस्कार विविध दहा क्षेत्रातील पाच गटात हे पुरस्कार देण्यात येतात. दरवर्षी एका गटातील दोन पुरस्काराचे वितरण करण्यात येते. यावर्षी वाङमय आणि सेवा क्षेत्रासाठी पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. पुरस्कारप्राप्त डॉ. गोरक्ष बंडामहाराज देगलूरकर यांनी भारतीय संस्कृतीचा श्रेष्ठ वारसा, मंदिरांचे कालजयी व विलोभनीय स्थापत्य तसेच मूर्तीशिल्प यांचे अलौकिकत्व या विषयांवर संशोधनपर भाषणे व विपूल लेखन केले आहे.

 
 

सेवा क्षेत्रात श्रीगुरुजी पुरस्कार घोषित झालेल्या श्रीमती भारती ठाकूर मध्यप्रदेशातील लेपा ता.कसरावद जि. खरगोण येथील रहिवासी आहेत. त्यांनी तरुण वयातच केंद्र सरकारची सेवा व सुखी जीवनाचा त्याग करुन गोलाघाट,आसाम भागात विवेकानंद केंद्राच्या वतीने शिक्षीका म्हणून कार्यरत आहेत. निमार अभ्युदय रुरल मॅनेजमेंट अँड डेव्हलपमेंट असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत वसतिगृह, गोशाळा, शिवणकेंद्र उपलब्ध करून प्रशिक्षण देत स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

 

येत्या ३ मार्चला नांदेडमध्ये हा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती जनकल्याण समितीचे प्रांताध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर यांनी दिली. या सोहळ्यात अतुल कोठारी हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व रूपये एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप असल्याचे डॉ. साताळकर यांनी सांगितले. यावेळी संघाचे जिल्हा संघचालक डॉ. सुधीर कोकरे, जनकल्याण समितीचे अरुण डंके, डॉ. प्रकाश पोपशेटवार, स्वागताध्यक्ष अजित मेहेर व चंद्रकांत देगावकर उपस्थित होते.

 

डॉ.साताळकर यांनी सांगितले की, "जनकल्याण समितीच्या श्रीगुरुजी पुरस्काराचे यंदाचे २४ वे वर्ष असून गेल्या तेवीस वर्षात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत असलेल्या ६४ व्यक्ती /संस्थाना परमपूजनीय श्रीगुरूजी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यामध्ये अगदी नावाजलेल्या/दिग्गज व्यक्ती अथवा संस्थांबरोबरच जोमाने/नेटाने त्या त्या क्षेत्रात काम करीत पुढे येण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्यांचा समावेश आहे."

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@