दिल्लीचा ढोंगबाज!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Feb-2019
Total Views |


सत्तेची चटक लागलेल्या निलाजर्‍या राजकारण्याचा वस्तुपाठच केजरीवालांनी आपल्या या वागण्यातून अन् भ्रष्टाचारविरोधाच्या ढोंगातून दाखवून दिला. पण, काँग्रेसला मात्र केजरीवालांची ही धडपड मानवल्याचे दिसत नाही, म्हणूनच तिकडून काही प्रतिसाद मिळत नसल्याची निराशा व हतबलताही केजरीवालांनी बोलून दाखवली.

 

'मगर सिक्कों की खनक देखकर...' या जवळपास दीडशे वर्षांपूर्वी गालिबने लिहिलेला हा शेर आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रत्यक्षात आणून दाखवल्याचे दिसते. त्याला कारण ठरले ते केजरीवालांचे “काँग्रेसला आघाडीसाठी विनवण्या करून करून मी थकलो, पण समोरून काहीही प्रतिसाद मिळाला नाही,” हे बोल. २०११ साली अण्णा हजारेंचे दिल्लीच्या जंतरमंतरवरील आंदोलन ऐन भरात असताना देशाला पहिल्यांदा अरविंद केजरीवालांची ओळख झाली. केंद्रातील काँग्रेस आघाडी सरकारच्या काळातील भ्रष्टाचाराविरोधात आणि जनलोकपालच्या नियुक्तीसाठी अण्णा हजारेंनी सुरू केलेल्या आंदोलनावेळी लोकांची जमवाजमव करण्यापासून ते प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांचे लक्ष वेधून घेण्यापर्यंतची कामे अरविंद केजरीवाल करत. देशातील काँग्रेस सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराच्या, घोटाळ्यांच्या हकिकती अण्णा हजारे आणि अण्णांचे पट्टशिष्य झालेले केजरीवाल अतिशय बारकाईने जनतेसमोर आणून ठेवत असत. तिथपासूनच देशाला लाचखोरीपासून, भ्रष्टाचारापासून मुक्ती देणारा मसिहा म्हणून अण्णा हजारेंच्या बरोबरीने केजरीवालांचेही नाव पत्रकार जगतात, बुद्धिजीवी वर्तुळात घेतले जाऊ लागले. अण्णांचे आंदोलन जणू काही केजरीवाल आणि कंपूने प्रायोजित केले की काय, असे वाटण्यासारखीही परिस्थिती या काळात निर्माण झाली. पुढे यथावकाश आश्वासनांची पुरचंडी घेऊन अण्णांनी आपले आंदोलन संपवले आणि राळेगणसिद्धीच्या मंदिरात बस्तान मांडले. पण, अण्णांच्या मागे निराळेच काहीतरी शिजत होते, ज्याची हजारेंनाही बहुतेक कल्पना नसावी.

अण्णांचे आंदोलन सुरू असतानाच,“आम्ही राजकारणाच्या दलदलीत पाय ठेवणार नाही,” असे अरविंद केजरीवाल देशाला मोठमोठ्याने ओरडून सांगत असत. पण, स्वतःच्याच शब्दांशी प्रामाणिक नसलेल्या अण्णाशिष्य अरविंदाने आपल्या गुरुला पद्धतशीर ‘बनवले’ आणि राजकारणाच्या चिखलात उडी मारत आम आदमी पक्षाची स्थापना केली. पुढे राजकारणाला स्वच्छ करण्याच्या इराद्याने त्यांनी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवली आणि ती जिंकलीही. पण, लोकपाल विधेयकाला मंजुरी न मिळाल्याने राजीनामा देण्याची नौटंकी करत केजरीवालांनी आपल्यातला गोंधळी दिल्लीच्या जनतेसमोर पहिल्यांदा पेश केला. तेव्हापासून ते कालपरवा उपराज्यपालांच्या निवासस्थानाबाहेर धरणे देण्यापर्यंत दिल्लीसह संपूर्ण भारतानेही अरविंद केजरीवालांच्या अराजकवादी, लोकशाहीद्रोही तमासगिरीचा अनुभव घेतला. एका राज्याचा मुख्यमंत्री असलेली व्यक्ती अशाप्रकारे सर्वच संकेत गुंडाळून रस्त्यावर उतरत कधी केंद्र सरकारविरोधात, कधी पोलीस प्रशासनाविरोधात मोर्चा काढण्याची, उपोषण करण्याची ही पहिलीच वेळ होती. जग चुकीचे आणि आपणच सत्याचे पाठीराखे म्हणत कुठेही फतकल मारून बसणार्‍या केजरीवालांना म्हणूनच सर्वोच्च न्यायालयानेही झापले. लोकप्रतिनिधी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी असतो, बिघडविण्यासाठी नव्हे, अशा शब्दांत न्यायालयाने केजरीवालांची कानउघाडणी केली. पण, न्यायालयालाही जुमानण्याची आवश्यकता नाही, अशी प्रवृत्ती मनी बाळगलेल्या केजरीवालांनी तेही ऐकले नाही. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने खडसावल्यानंतरही केजरीवाल अजूनही जनतेच्या नावाने चळवळीतल्या म्होरक्यासारखे इकडे-तिकडे भटकताना दिसतात. हे घटनेसह, संवैधानिक संस्थांना आव्हान देण्यासारखेच. पण, एकदा का मोदी व भाजपविरोधाचा बुक्का लावला की, संबंधित व्यक्तीने केलेला प्रत्येकच गुन्हा माफ असतो ना? म्हणूनच केजरीवालांनी कितीही गदारोळ केला, आडव्या-तिडव्या मागण्या केल्या तरी ‘संविधान बचाओ’ म्हणणारे वा माध्यमातले मूखंडही कधी त्याविरोधात आवाज उठवताना दिसत नाहीत.

 

हे झाले केजरीवालांबद्दल. पण, आज आम आदमी पक्षाच्या प्रमुखपदी बसलेल्या या माणसाने काँग्रेसशी आघाडी करण्याची गोष्ट करत कमालच केली, तसेच कार्यकर्त्यांच्या भावभावना व आकांक्षांनाही पद्धतशीरपणे चुना लावला. कारण, जनतेला ओरबाडून खाणार्‍या काँग्रेसचा पंजा कसा दलालीच्या पैशाने बरबटलेला आहे, संपुआ सरकारने कसे जनतेला वरपासून-खालपर्यंत लुटले आणि देशाच्या सत्तास्थानी कसे लुच्चा-लफंग्यांचे कोंडाळे जमा झाले, हे केजरीवाल सर्वांसमोर मांडत असत. सोबतच सोनिया गांधींचे जावई आणि प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वडेरा यांच्या हरियाणातील जमीन घोटाळ्याचा मुद्दाही अरविंद केजरीवाल आणि प्रशांत भूषण यांनीच उकरून काढला होता. हरियाणाचे तत्कालीन मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा यांनी वडेरांना घोटाळ्याकामी कशी मदत केली, हेही केजरीवाल तेव्हा सांगत असत. आता मात्र केजरीवाल आपणच केलेले आरोप गिळत काँग्रेस व काँग्रेसी जावयाचे प्रताप विसरल्याचे दिसते. ज्या काँग्रेसचा भ्रष्टाचार गाडायला आपला अवतार झाला आणि विचारवंती गोटातूनही आपल्याकडे त्याच नजरेने पाहिले गेले, त्याच काँग्रेसला अरविंद केजरीवालांनी ‘समविचारी’ म्हटले. मोदीविरोधाची काविळ झालेल्या अरविंद केजरीवालांना आता सत्तेसाठी काँग्रेसशी गळाभेट घेणेही नैतिक वाटू लागले. म्हणूनच अंमलबजावणी संचालनालयाने वडेरांवर कारवाई सुरू केली, तेव्हाही केजरीवालांनी विरोधाची भूमिका घेतली. सत्तेची चटक लागलेल्या निलाजर्‍या राजकारण्याचा वस्तुपाठच केजरीवालांनी आपल्या या वागण्यातून अन् भ्रष्टाचारविरोधाच्या ढोंगातून दाखवून दिला. पण, काँग्रेसला मात्र केजरीवालांची ही धडपड मानवल्याचे दिसत नाही, म्हणूनच तिकडून काही प्रतिसाद मिळत नसल्याची निराशा व हतबलताही केजरीवालांनी बोलून दाखवली. अर्थात, नंतर शीला दीक्षित यांनी मात्र केजरीवालांनी आमच्याशी आघाडीसाठी कधीही संपर्क साधला नाही, असेही म्हटले, ही गोष्ट अलहिदा. दुसरीकडे केजरीवालांनी कोलकात्यात ममता बॅनर्जींनी घेतलेल्या सत्तातुरांच्या मेळाव्यालाही हजेरी लावली होती. काही वर्षांपूर्वी या सगळ्यांवरच ‘सब मिले हुए है’ म्हणत त्यांनी आरोपबाजी केली होती. पण, सत्तेच्या हव्यासापायी केजरीवालांना त्याचीही आठवण होत नसावी. म्हणतात ना, ‘सत्तातुराणाम् ना भयं ना लज्जा!’ पण, जनतेने मात्र जसा दिल्ली महापालिका निवडणुकीवेळी केजरीवालांना धडा शिकवला, तसाच ती आताही शिकवेल, हे नक्की!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@