अर्धा-पाऊण तासाचा खेळ!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Feb-2019
Total Views |


 


भारताविरोधात पाकिस्तान, श्रीलंका वा बांगलादेशने आघाडी उघडली तर काय? असा प्रश्न एकदा एका मुलाखतकर्त्याने के. सुंदर यांना विचारला, तेव्हा सुंदर यांनी दिलेले उत्तर आताही लागू पडेल असेच आहे. “आमच्यासाठी हा केवळ अर्धा-पाऊण तासाचा खेळ आहे,” असे के. सुंदर म्हणाले होते. दहशतवाद्यांना पोसून व हल्ले करुनही तोंड वर करून, ‘तो मी नव्हेच’ म्हणणाऱ्या पाकिस्तानने ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी.


पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या हालचालींनी बिथरलेल्या इमरान खान यांनी मंगळवारी एका ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानविरोधात युद्ध छेडल्यास प्रत्युत्तराची धमकी दिली. म्हशी, गाढवे आणि सरकारी गाड्या विकून आला दिवस ढकलण्याची वेळ आलेल्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी अशी धमकी देणे म्हणजे डबक्यातल्या बेडकाने सिंहाला बेटकुळ्या दाखवण्यासारखेच! शिवाय दैनंदिन गरजा भागवण्यासाठी जगातल्या प्रत्येक राष्ट्रप्रमुखापुढे लाळघोटेपणा करूनही हातावर कोणी चिल्लरही टेकवली नाही, तरी इमरान खानने आणलेला युद्धाचा आव पाहता तो देश कुठल्या नशेत वावरत असेल, याचीही कल्पना करता येते. उल्लेखनीय म्हणजे, पुलवामातील हल्ला झाल्यानंतर तब्बल सात दिवसांनी इमरान खान यांना जाग आली आणि दोन शब्द बोलावेसे वाटले. तेही कसे? तर दहशतवादी संघटना आणि आयएसआयच्या हातातला बाहुला एवढीच किंमत असलेल्या इमरान खान यांना मसूद अझहर वा हाफिज सईदपैकी कोणीतरी तोंड उघडण्याची परवानगी दिली असावी. तेव्हा कुठे इमरान खान यांना काहीतरी बडबडण्याची बुद्धी झाली आणि ते जे काही बोलले, तेही नंतर ‘कोणातरी आका’ने तपासल्यानंतर, सहा मिनिटांच्या ध्वनिचित्रफितीत २० पेक्षा जास्तवेळा काटछाट केल्यानंतरच जगासमोर आले. दुसरीकडे, इमरान खान यांची व पाकिस्तानची माणुसकीशुन्य मानसिकताही या ध्वनिचित्रफितीतून उघडी पडली. भारताने व भारतीयांनी पेशावरमधील शाळेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मृतांप्रति संवेदना व्यक्त केल्या होत्या. काही काही ठिकाणी तर मेणबत्ती मोर्चे, श्रद्धांजली सभेच्या माध्यमातून दुःखासोबतच दहशतवादविरोधी भावनाही प्रकट करण्यात आल्या होत्या. पण, इमरान खान यांना मात्र तेही जमले नाही. भारताचे ४० पेक्षा जास्त सैनिक समरांगणात नव्हे, तर दहशतवादी हल्ल्यात बळी पडले, त्याबद्दल या इसमाला निषेधाचा, सहानुभूतीचा एक शब्दही उच्चारावासा वाटला नाही. असे का? तर दहशतवादाला आपल्याच देशातून पाठिंबा आणि समर्थन मिळत असल्याची माहिती इमरान खानना चांगलीच आहे. मग जे कांड आपणच केले, त्याविरोधात बोलणार कसे आणि बोललो तर ‘आपले आका’ आपली काय हालत करतील, हेही इमरान खानला ठाऊक असेल. म्हणूनच इमरान खानने पुलवामा हल्ल्याविरोधात तोंडातून ‘ब्र’ही उच्चारला नाही, उलट स्वतःच दहशतवादाने पीडित देश असल्याचे रडगाणे गात ‘नव्या पाकिस्तान’च्या नावावर भारताकडे पुरावे मागितले.

 

मात्र, इमरान खान यांनी ज्या ‘नव्या पाकिस्तान’चा दाखला दिला तो नेमका आहे तरी काय? अमेरिकेनंतर आता चीनच्या तालावर नाचणारा नवा पाकिस्तान? परक्या राष्ट्रप्रमुखाला भाड्याच्या गाडीने देशात फिरवणारा नवा पाकिस्तान? रुपयाचे वारेमाप अवमूल्यन करणारा नवा पाकिस्तान? काय आहे काय नव्या पाकिस्तानची परिभाषा? खरे म्हणजे देशाला नवी दिशा ही सर्वच स्तरातल्या आमूलाग्र परिवर्तनातून मिळत असते, तेव्हा कुठे नवा देश उभा राहत असतो. मात्र, पाकिस्तानमध्ये ते कधी झाले नाही आणि पुढेही कधी होणार नाही. कारण, इमरान खान आज कितीही नव्या पाकिस्तानची बांग ठोकत असले तरी, तो जुनाच १९४७ सालचा इस्लामच्या नावावर पैदा झालेला देश आहे. उलट आता तर दहशतवाद्यांना लष्करातील सैनिकांच्या वेषात पेश करायलाही तो देश मागेपुढे पाहणार नाही. पुराव्यांचीच गोष्ट असेल, तर भारताने याआधीच्या प्रत्येक दहशतवादी हल्ल्याचे पुरावे पाकिस्तानकडे सोपवलेले आहेत; २६/११चा हल्ला असो वा पठाणकोट, उरीचा हल्ला. पण, पाकिस्तानने नेहमीच भारताने दिलेले पुरावे नाकारण्याचे कसब दाखवत हात वर केले. पाकिस्तानी हद्दीत भारतीय सीमेजवळ दहशतवाद्यांचे अड्डे आणि प्रशिक्षण केंद्र असल्याची गोष्ट जगजाहीर आहे. म्हणूनच भारताने पुलवामा हल्ल्यानंतर बदला घेण्याचे ठणकावल्यानंतर तिथले दहशतवादी आपापल्या बिळातून बाहेर पडत बोऱ्या बिस्तर बांधून पलायन करते झाले. इतकेच नव्हे, तर जैश-ए-मोहम्मद या पाकस्थित दहशतवादी संघटनेने पुलवामा हल्ल्याची जबाबदारीही घेतली. तरी पाकिस्तान भारताकडे पुरावे मागण्याची नौटंकी करतो, याला चोराच्या उलट्या बोंबा नव्हे तर काय म्हणणार? पाकिस्तानने तर ओसामा बिन लादेनही आमच्या देशात नसल्याचे म्हटले होते, पण नंतर मात्र अमेरिकेने पाकिस्तानात घुसूनच लादेनला ठोकले होते. आताही मसूद अझहर आणि हाफिज सईदसारखे जिहादी धर्मांधांचे म्होरके सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून पाकिस्तानात खुलेआम हिंडता-फिरताना दिसतात. मग देशाच्या प्रमुखपदी बसलेल्या इमरान खान यांची नजर तिथपर्यंत पोहोचत नाही का? एखाद्या दिवशी भारतच या दोघांना जन्नत की जहन्नूममध्ये पाठवेल, तेव्हा इमरान खान यांना कळेल की, अरेच्चा हे दोघे इथेच तर होते!

 

‘नव्या पाकिस्तान’च्या बाता मारणाऱ्या इमरान खान यांनी भारतही जुना नाही, हे लक्षात ठेवलेले बरे. जुन्या भारताने ४८ वर्षांपूर्वी पाकिस्तानचे दोन तुकडे केले, तर आता ‘नवा भारत’ त्या देशाचे चार तुकडेही करू शकतो. बलुचिस्तान, पख्तुन आणि सिंधमधील नागरिकांची तशीही पाकिस्तानमधून बाहेर पडण्याची इच्छा आहेच आणि तिथले स्वातंत्र्यकांक्षी भारताकडेच आशेने पाहतात. इतकेच नाही, तर पाकिस्तानला जाणारे पाणीही भारताच्याच कृपेने मिळते. भारताने जर सिंधू जलसंधीनुसार वागायचेच ठरवले, तर पाकिस्तानचे वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही. कोणाला कुठे आणि कसे मारायचे हेही भारताला चांगलेच कळते, तेव्हा पाकिस्तानला इतकीच खुमखुमी असेल, तर त्या देशाची ही इच्छाही नक्कीच पूर्ण केली जाईल. सोबतच भारताला उत्तर देण्याची भाषा करणाऱ्या इमरान खान यांनी दोन्ही देशांच्या लष्करी ताकदीवर नजर टाकली तरी, त्यांना समजेल की, आपण कुठे उभे आहोत. क्षेपणास्त्रे, अण्वस्त्रे, रणगाडे, लढाऊ विमाने, विमानवाहू युद्धनौका, पाणबुड्या, विनाशिका आणि सैनिकांची तुलना करता पाकिस्तान भारताच्या आसपासही फिरकू शकत नाही. शिवाय आताची जागतिक परिस्थिती अशी आहे की, हातचे राखून सौदी वगळता, अमेरिका असो वा रशिया, इस्रायल असो वा जपान सर्वच देश आज भारताच्या बरोबरीने खंबीरपणे उभे ठाकण्यास तयार आहेत. भारताला घाबरून ज्या संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानने धाव घेतली, तिथेही त्या देशाचा टिकाव लागण्याची शक्यता नाही. कारण, गेल्या साडेचार वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगातील बड्या राष्ट्रांशी निर्माण केलेले मैत्रीचे आणि व्यापाराचे संबंध! इमरान खान यांनी आपल्या ध्वनिचित्रफितीतून भारतातील आगामी निवडणुकांचादेखील उल्लेख केला. पण, ज्या देशात निवडणुका जिंकण्याचा फंडाच कोणता पक्ष भारताविरोधात अधिकाधिक विष उगाळतो, हा असतो, त्या देशाने भारतातल्या निवडणुकांवर बोलण्यासारखा विनोद दुसरा कुठलाच नसेल! काश्मिरी तरुणांबद्दल बोलताना ते हातात शस्त्र का घेतात, याचा भारताने विचार करावा, असा आगावू सल्लाही इमरान खान यांनी दिला. पाकपोषित दहशतवादी आणि शिबिरे, पाकची फुस मिळालेले फुटीरतावादी आणि धर्मांध संघटनांकडून चालवले जाणारे मदरसे, यामुळेच हे तरुण हाती बंदुका घेतात. धर्माच्या नावाने मेंदूमेंदूत विखार भरला जातो आणि स्वर्गातल्या ऐशोआरामाची, ७२ हुरांची स्वप्नेही दाखवली जातात. कल्पनेतल्या जगाने भारलेल्या तरुणांना आत्मघात करण्याची तालीम तिथूनच मिळते. इमरान खान यांना याचीही माहिती नाही का? नसेल तर त्यांनी आपले डोळे आणि कान उघडे ठेवून आपल्या आजूबाजूला नीट बघितले पाहिजे. सरते शेवटी १९८६ ते १९८८ दरम्यानच्या भारताच्या लष्करप्रमुखपदी असलेल्या के. सुंदर यांची एक आठवण सांगितलीच पाहिजे. भारताविरोधात पाकिस्तान, श्रीलंका वा बांगलादेशने आघाडी उघडली तर काय? असा प्रश्न एकदा एका मुलाखतकर्त्याने के. सुंदर यांना विचारला, तेव्हा सुंदर यांनी दिलेले उत्तर आताही लागू पडेल असेच आहे. “आमच्यासाठी हा केवळ अर्धा-पाऊण तासाचा खेळ आहे,” असे के. सुंदर म्हणाले होते. दहशतवाद्यांना पोसून व हल्ले करुनही तोंड वर करून, ‘तो मी नव्हेच’ म्हणणाऱ्या पाकिस्तानने ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@