पुष्पासनी बैसले श्रीनृसिंहसरस्वती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Feb-2019
Total Views |

 

 

श्री नृसिंहसरस्वती स्वामींचे चरित्र म्हणजे ‘श्री गुरूचरित्र’ होय. ‘श्री गुरूचरित्र’ ग्रंथ हा मंत्रग्रंथ आहे. अत्यंत प्रभावशाली असणार्‍या ग्रंथाच्या पठणाने आणि श्रवणाने समानच लाभ प्राप्त होतात. या ग्रंथाची निर्मिती शके १४३२ म्हणजे इ. स. १५१० नंतर झाली. सिद्ध व नामधारकाचा संवाद ‘श्री गुरूचरित्र’ ग्रंथामध्ये आहे.

 
स्वामींच्या लीला सिद्धमुनींनी नामधारकाला कथन केल्या आहेत. आचार कसा असावा, हे विस्तारानेसांगितले आहे. काशियात्रा कशी करावी, हे तपशीलवार सांगितले आहे. कर्मसिद्धांतदेखील यामध्ये मांडलेला आहे. पुनर्जन्म तसेच पूर्वजन्म असल्याच्या कथा यामध्ये आहेत. पापकर्माचे प्रायश्चित्त कोणत्या प्रकाराने घेता येते, ते या ग्रंथात विशद केलेले आहे. पुण्यकर्म महत्त्वाचे असून, त्यामुळे सद्गुरूंची प्राप्ती होते. त्याचप्रमाणे सद्गुरूंच्या सेवेमुळे त्यांच्या कृपेचा लाभ होतो, तसेच सद्गुरूंची सेवा करणं हे श्रेष्ठतम् पुण्यकर्म आहे.

‘श्री गुरूचरित्र’ ग्रंथ जीवनाचा आधारग्रंथ आहे. अध्यात्माच्या मार्गात प्रगती करण्यासाठीचे मार्गदर्शन यामध्ये केलेले आहे. भक्तिभाव, शुद्धभाव व सात्त्विकभाव परमार्थाच्या प्रगतीस पोषक आहे. श्री नृसिंहसरस्वती यांनी स्वामी करंजा ग्रामी अंबामातेच्या पोटी जन्म घेऊन लोकांच्या उद्धारासाठी भ्रमण केले. त्यांनी अनेक लोकांना संकटमुक्त व दु:खमुक्त केले. लोकांना संन्यासाश्रमाचे महत्त्व स्वआचरणातूनपटवून दिले. धर्माला ग्लानी आलेलीअसताना आचरधर्माचे पालन करण्यास सांगितले. त्यांच्या सहवासातयेणार्‍यांचे कल्याण केले. श्रीगुरू म्हणजेच श्री नृसिंहसरस्वती आणि श्री नृसिंहसरस्वती म्हणजेच दत्तप्रभू! दत्तात्रेयांची कृपा प्राप्त करण्यासाठी अनेक दत्तभक्त ‘श्री गुरूचरित्र’ ग्रंथाची पारायणे करतात. प्रभू दत्तात्रेयांचे ध्यान करताना श्रद्धापूर्वक भक्त म्हणतात,

 

बालार्कप्रभमिन्द्रनीलजटिलं भस्माग्ड.रागोज्ज्वलम्।

शान्तं नादविलीनचित्तपवनं शार्दुलचर्माम्बरम् ॥

ब्रह्मज्ञै: सनकादिभि: परिवृतं सिद्धै: समाराधितम्।

दत्तात्रेयमुपास्महे हृदि मुदा ध्येयं सदा योगिभि:॥

 

उगवत्या सूर्याप्रमाणे कांती असणार्‍या, नीलमणीप्रमाणे घननील जटासंभार असणार्‍या, भस्माच्या लेपाने उज्ज्वल दिसणार्‍या, चित्तातील सर्व ऊर्मी नादात विलीन होऊन शांत असणार्‍या व्याघ्रांबरधारी, तसेच ब्रह्मज्ञानी ऋषी, सनक यांनी परिवेष्टिलेल्या, सिद्धांकडून आराधना केली जात आहे, अशा आणि योग्यांकडून आनंदाने हृदयात ध्यान केले जाणार्‍या भगवान दत्तात्रेयांची आम्ही उपासना करतो.

 

दत्तात्रेयांची उपासना म्हणजेच श्री नृसिंहसरस्वती स्वामींची उपासना! श्री नृसिंहसरस्वती स्वामींनी नृसिंहवाडीला कृष्णाकाठी साधना, तप केले. ६४ योगिनींच्या पूजेचा स्वीकार केला. ब्राह्मणांचे दारिद्य्र दूर केले. शिरोळला भिक्षापात्र सदैव भरलेलं राहील,अशी सोय केली. आशीर्वादाचा हात सतत ठेवला. जेरे पुजार्‍यांच्या घराण्यावर कृपा करून वंशविस्तार केला. स्वामींनी स्वत:च्या शक्तिसंपन्न अशा मनोहरपादुका वाडीला स्थापन केल्या. ज्यांनी त्या पादुकांचे पूजन केले, त्या घराण्यांवर त्यांनी कृपा केली. औदुंबर, वाडी, कुरुंदवाड हा परिसर पावन केला. पुढे ते गाणगापूरला गेले. तिथे अनेक भक्तांना दयार्द भावाने त्रिविध तापाने होरपळणार्‍यांचे ताप दूर केले. मंदबुद्धीच्या मुलाला हुशार केले. प्रेतामध्ये संजीवनी निर्माण केली. सात्त्विक वृत्तीच्या व्यक्तीने तयार केलेले अन्न ग्रहण करण्याचा उपदेश केला. अन्नानुसार वासना तयार होतात. म्हणून योग्य अन्नाचे सेवन करण्याचे मार्गदर्शन केले. ब्राह्मणाचा कुष्ठरोग बरा करून देह कांतिमान केला. गाणगापूरचापरिसर श्रीगुरूंच्या पदस्पर्शाने पवित्र झाला. अनेकांना सुयोग्य मार्ग दाखवून श्रीगुरूंनी श्रीशैल्यमला गमन करण्याचे ठरवले. श्रीपर्वतावरील यात्रेसाठी एक फुलांचे आसन शिष्यांना तयार करायला सांगितले. त्याप्रमाणे फुलांचे मनोहर आसन तयार करून पाताळगंगा नदीच्या पात्रात ठेवले. शिष्य अत्यंत शोकाकुल झाले. श्रीगुरू पुष्पासनावर बसून समाधीत निजानंदात मग्न झाले. निजानंदगमनाला ‘बहुधान्य’नाम संवत्सर होते. गुरू कन्या राशीत होता. माघ महिना, कृष्ण पक्ष, प्रतिपदा, शुक्रवार आणि शिशिर ऋतू होता. अशा पावन पर्वावर नृसिंहसरस्वती स्वामी निजस्थानाला गेले. सुवर्णपादुका घातलेले स्वामी गंगेच्या प्रवाहावरच अदृश्य झाले. प्रसादाची चार फुले पाताळगंगेच्या प्रवाहातून आली. एकीकडे दु:ख, तर दुसरीकडे प्रसादपुष्पाचा आनंद शिष्यांना झाला.

 

स्वामींचा निजानंदगमन दिवस हाच शैलगमन यात्रेचा दिवस म्हणजेच नृसिंहसरस्वती स्वामींचा महत्त्वपूर्ण दिवस! दत्तभक्त आपल्या लाडक्या स्वामींच्या स्मरणार्थ उपासना, श्री गुरूचरित्र पारायण, ‘दिगंबरा दिगंबरा’ या सिद्धमंत्राचा जप करतात. नृसिंहसरस्वती स्वामींनी देहाने शैलगमन केले असले तरी, गुप्त रूपाने गाणगापूर क्षेत्रामध्ये निर्गुण पादुकांमध्ये नित्य वास करतात. आजही भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. त्यांना दर्शन देतात. श्रीगुरू भक्तांना सांगतात,

 

याप्रमाणे ज्यासी स्फूर्ति । अंतरी चित्ते दृढ होती ॥

त्यासी आम्ही दिसो दृष्टान्तीं। अनुमान न धरा मानसी॥

 

दत्तात्रेय, दत्तप्रभू, गुरूदेव दत्त, श्री नृसिंहसरस्वती स्वामींवर दृढ श्रद्धा ठेवून संशय सांडोन अखंड भक्ती करणार्‍या भक्तांवर ते कृपेचा वर्षाव करतात. त्याचा परमानंद प्रत्येकाने प्राप्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणं आवश्यक आहे. कलियुगात दत्तात्रेय शीघ्र फल देणारे दैवत आहे. निजानंदगमन करणार्‍या स्वामींचे सदैव स्मरण केल्याने आत्मानंदाची अलौकिक प्राप्ती होते, हे निश्चित.

 
- कौमुदी गोडबोले  
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...

facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@