नासा ते व्यासा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Feb-2019   
Total Views |


नासामधील आपली चांगली नोकरी सोडून मायदेशी परतलेल्या डॉ. नागेंद्र यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन आपले आयुष्य योगशास्त्रासाठी समर्पित केले. अशा या ‘योगमहर्षी’चा हा जीवनप्रवास...

 

॥ व्यायामात् लभते स्वास्थ्यं

दीर्घायुष्यं बलं सुखं च।

आरोग्यं परमं भाग्यं

स्वास्थ्यं सर्वार्थसाधनम् ॥

या श्लोकाप्रमाणे व्यायामाला आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. व्यायामाचे विविध प्रकार असले तरी, यातील ‘योग’ हा सुखी व समृद्ध जीवनाचा राजमार्ग आहे. म्हणूनच मोदी सरकार सत्तेवर विराजमान झाल्यानंतर २१ जून हा जागतिक पातळीवर ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. सर्वसाधारणपणे ‘योग’ म्हटले की, आपल्याला बाबा रामदेव यांची आठवण होते. मात्र, योगशास्त्राची आंतरराष्ट्रीयस्तरावरील ओळख ही एकमेव बाबा रामदेव यांच्यामुळेच झाली, असेही म्हणता येणार नाही. कारण, योगाच्या प्रचार-प्रसारासाठी अनेकांनी आपलं सर्वस्व वाहिले आहे. त्यापैकीच एक म्हणजे डॉ. एच. आर. नागेंद्र. त्यांनी स्वत:चा, त्यांच्या योगकार्याचा प्रचार कधी प्रचार केला नाही. त्यामुळे बर्‍याच जणांना त्यांचं नाव कदाचित माहितीही नसेल. म्हणूनच आजच्या ’माणसं’ या सदरात डॉ. एच. आर. नागेंद्र यांच्या या योगप्रवासाविषयी जाणून घेऊया.

 

डॉ. नागेंद्र यांची संशोधक, शास्त्रज्ञ, मेकॅनिकल इंजिनिअर, प्राध्यापक, योग अभ्यासक, लेखक, व्याख्याते अशी अनेक प्रकारे ओळख सांगता येईल. कर्नाटकमध्ये १९४३ साली त्यांचा जन्म झाला. लहानपणापासून बुद्धिमान असणाऱ्या नागेंद्र यांनी बंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्थेमधून (आयआयएससी) मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण करत १९६८ साली पीएच.डी मिळविली. यानंतर लगेचच त्यांना आयआयएससीमध्ये प्राध्यापक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. डॉ. नागेंद्र यांना खूप शिकायची आणि मोठं काहीतरी करायची इच्छाशक्ती असल्याने पीएच.डी मिळाल्यानंतरही त्यांनी शिक्षण थांबविले नाही. १९६९ साली त्यांनी कॅनडामधील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठात पोस्ट-डॉक्टरल रिसर्च फेलो म्हणून काम केलेे. १९७० साली तेथून त्यांनी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या ‘मार्शल स्पेस फ्लाइट सेंटर’मध्ये पोस्ट-डॉक्टरल रिसर्च असोसिएट म्हणून दोन वर्षे काम पाहिले. यानंतर त्यांनी हार्वर्ड विद्यापीठाच्या इंजिनिअरिंग सायन्स लॅबोरेटरी विभागात सल्लागार म्हणून व लंडन येथील इंपीरियल कॉलेज ऑफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीमध्ये व्हिजिटिंग स्टाफ म्हणून काम केले. मात्र, त्यांचे मन या कामात रमत नव्हते. त्यांच्या मनाची कुठे तरी घुसमट होत होती आणि ‘नासा’च्या मोठ्या कार्याप्रमाणे काहीतरी मोठे कार्य करायचे, असे त्यांनी मनोमनी ठरवले आणि ते भारतात परतले.

 

डॉ. नागेंद्र सांगतात की, “मी सत्याच्या शोधात भारतात परत आलो. ‘नासा’सारखे काहीतरी मोठे करायचे हे आधीपासूनच ठरवले होते. योगशास्त्राच्या माध्यमातून सत्याचा मार्ग सापडेल असे एक विद्यापीठ सुरू करायचे, त्यांनी मनोमनी ठरवले. भारतात परतल्यावर डॉ. नागेंद्र यांनी विवेकानंद केंद्रात काम सुरू केले. ‘विवेकानंद ऑफ इंडिया,’ ‘योगकर्म’ आणि ‘योगनिद्रा’ यांसारखी पुस्तके त्यांनी वाचली आणि त्यामुळे स्वामी विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानाकडे आकर्षित झाल्याचे डॉक्टर सांगतात. स्वामी विवेकानंदांकडून प्रेरणा घेऊन त्यांनी १९८६ साली बंगळुरू येथे ‘स्वामी विवेकानंद योग अनुसंधान’ संस्थेची स्थापना केली. त्यांनी सुरू केलेल्या या संस्थेच्या माध्यमातून ते योगाच्या प्रचार-प्रसार व संशोधनामध्ये तब्बल ४० पेक्षा जास्त वर्षे कार्यरत आहेत. आज त्यांचे हे केंद्र जगभरात नावाजले जात असून, आज या केंद्राला योग अभ्यासाचे आंतराष्ट्रीय विद्यापीठ म्हणून मान्यता मिळाली आहे. या ठिकाणाला ‘प्रशांति कुटी’ नावानेही ओळखले जाते. या योग विद्यापीठात जगभरातील लोक योगाचे धडे गिरवतात. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील या विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. येथूनच त्यांनी योगाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली होती आणि डॉ. नागेंद्र हेच मोदींचे योगगुरू!

 

डॉ. नागेंद्र यांनी भारत सरकारच्या अनेक समित्यांवर तज्ज्ञ व मार्गदर्शक म्हणून काम पाहिले आहे. यासोबतच त्यांनी योगसंदर्भात ३० पुस्तके लिहिली असून ११० पेक्षा जास्त लेख लिहिले आहेत. तसेच अभियांत्रिकीमध्ये त्यांचे ३० पेक्षा जास्त शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. एवढंच नाही, तर पीएच.डी करणार्‍या जवळपास २० विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या याच कार्याचा सन्मान म्हणून २०१६ साली भारत सरकारचा मानाचा ’पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. याचबरोबर १९९७ साली आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या ’योग श्री’ या पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले. अशा अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. अशा या ’योग श्री’ला दै. ’मुंबई तरुण भारत’चा मानाचा मुजरा!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@