जयद्रथाकडे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Feb-2019
Total Views |


जसजसा सूर्य पश्चिमेकडे झुकू लागला, तसतसा अर्जुनाच्या लढण्याचा आवेश वाढतच होता. कारण, त्याला त्याची प्रतिज्ञा आठवत होती. त्याचा रथ जिकडे जाई तिकडे हाहाकार माजत असे. अर्जुन नृशंस संहार करत सुटला. कृष्णाचे सारथ्य पण खूप प्रेक्षणीय होते. पण, त्याच्या रथाचे घोडे थकले होते. ते तहानलेले होते. सकाळपासून ते लढत होते. अनेक बाण लागून ते जखमी झाले होते. पण, शेवटी ते दैवी असल्यामुळे अजूनही जीवंत होते. त्यांच्या रथाचा वेग कमी झालेला पाहून विंद आणि अनुविंद यांनी अर्जुनास आव्हान दिले. त्याने बाण सोडून त्यांची धनुष्ये तोडली. त्यांनी दुसरे धनुष्य घेऊन युद्ध सुरूच ठेवले. अर्जुनाने बाण सोडून विंदचे डोके उडविले. ते पाहून त्याचा भाऊ अनुविंद चिडला. तो अर्जुनावर चालून आला. त्याचक्षणी त्याने त्याचाही अर्जुनाने शिरच्छेद केला.

 

मध्येच अर्जुन कृष्णाला म्हणाला, “कृष्णा, माझे घोडे खूप थकलेले दिसत आहेत. त्यांना जखमाही झाल्या आहेत. तेव्हा त्यांना थोडी विश्रांती देणे आवश्यक आहे. काय करायचे ते तूच ठरव.” कृष्ण म्हणाला, “तू म्हणतोस ते बरोबर आहे. यांना थोडी विश्रांती द्यायला हवी. त्यांना रथापासून थोडा वेळ तरी बाजूला घेणे भाग आहे.” मग अर्जुन म्हणाला, “कृष्णा, मी रथातून उतरून युद्ध करेन. या अश्वांना तू घेऊन जा आणि थोडी विश्रांती दे.” अर्जुन खरोखर खाली जमिनीवर उतरून युद्ध करू लागला. ते पाहून कौरव सैन्य आनंदित झाले. त्याला सर्वांनी घेराव घातला. पण, त्यांनाच चकित होण्याची वेळ आली. कारण, अर्जुन रथापेक्षाही जमिनीवरून अधिक जोशाने आणि कौशल्याने लढत होता. त्याच्या पराक्रमापुढे ते निष्प्रभ ठरले. त्याची लढाई चालू असतानाच कृष्ण पुन्हा जवळ येऊन म्हणाला, “अर्जुना, इथे कुठेच पाणी दिसत नाही. घोड्यांना तर तहान लागली आहे. काय करायचे?” अर्जुन हसून म्हणाला, “नाही कसे? हे पाहा, इथे पाणी आहे.” असे म्हणून त्याने एक बाण जमिनीत सोडला. त्याच क्षणी युद्धभूमीजवळ गोड आणि स्वच्छ पाण्याचा तलाव निर्माण झाला. अर्जुनाने आणखी काही बाण सोडून त्या तलावास काठ निर्माण केला. सर्व सैनिक हे पाहून आश्चर्याने थक्क झाले. अर्जुनाचा हा पराक्रम पाहून कृष्ण खूश झाला. त्याने घोड्यांना सोडवून त्यांच्या अंगातील बाण काढले. त्यांना पाणी पाजले. पाठीवरून हात फिरवले. कौरव आश्चर्यचकित झाले. त्या तलावावर पक्षीही जमू लागले. सर्वांनी क्षणभर युद्ध थांबवून हा चमत्कार पाहिला व अर्जुनाचे कौतुक केले. ते घोडे थकवा जाऊन पुन्हा ताजेतवाने झाले. कृष्णाने रथ पुन्हा जोडून समोर आणला. पण, या सगळ्या कामात खूप वेळ खर्च झाला होता. अर्जुन आता रथात बसून वेगाने जयद्रथाकडे वार्‍याच्या वेगाने निघाला. दुर्मषण आणि द्रोण या भयंकर सेनानींना ओलांडून अर्जुन आतपर्यंत पोहोचला. जे कौरवांना अशक्य वाटत होते ते अर्जुनाने करून दाखवले. त्याने कृतवर्मालासुद्धा मागे टाकले.

 

आता जयद्रथ अर्जुनाच्या दृष्टिपथात आला होता. तो खूप भयभीत झाला होता आणि अर्जुनाला आता खात्री वाटू लागली की, आपण जयद्रथास मारू शकू. कृष्ण आणि अर्जुन आनंदित दिसत होते. त्यांना जवळ आलेले पाहून दुर्योधन आडवा आला. त्याच्या अंगावर द्रोणांनी दिलेले चिलखत होते. कृष्ण म्हणाला, “अर्जुना, दुर्योधनाला कमी समजू नकोस. तो शक्तिमान आहे. त्याचे बाण खूप दूर पोहोचू शकतात. तू सावध राहा, तो पांडवांचा द्वेष्टा आहे आणि आता क्रुद्ध झाला आहे.

 

तू त्याच्या औधत्यास धूळ चार.” अर्जुन म्हणाला, “कृष्णा, आम्हाला अनेक दु:खे भोगायला लावणारा हा दुर्योधन माझ्यासमोर आला आहे. म्हणून मला आनंदच होतो आहे. मला त्याच सूड घ्यायचा होताच आणि ती संधी आता आयती चालून आली आहे. मी ती व्यर्थ दवडणार नाही.” कौरव सेनेला दुर्योधन स्वत: पुढे आलेला पाहून अधिक स्फुरण चढले होते. दुर्योधनाने अर्जुनाला आवाहन करीत तीक्ष्ण बाणांचा त्याच्यावर वर्षाव केला. त्यांनी अर्जुन व कृष्ण दोघांनाही जखमा झाल्या. अर्जुन पहिले बाण दूर सारतो न सारतो तोच नवा शरवर्षाव त्याच्यावर येऊन आदळत होता. अर्जुन पण रागाने बेभान होऊन सर्पासारखे बाण सोडतच होता. पण, त्या बाणांचा दुर्योधनावरकाही परिणाम होत नव्हता. तो ते सर्व बाण निष्प्रभ करत होता. कृष्ण म्हणाला, “अर्जुना, तुझ्या बाणांची शक्ती आज क्षीण झाली आहे असे दिसते. या दुर्योधनाने मला आणि तुलाही खूप जखमी केले आहे आणि तू त्याचा योग्य समाचार घेऊ शकत नाही असे वाटते. तो तुझ्याहून वरचढ योद्धा आहे हे मान्य करून आता माघार घेणेच चांगले. नशीब आपल्या विरोधात आहे, सूर्यही मावळत चालला आहे. दुर्योधन आज तुझा पराभव करणार आहे, असे दिसते. तो जयद्रथाचे रक्षण करण्यासाठी उतरला आहे आणि तो ते करणारच! जयद्रथ भाग्यवान आहे त्याला असा मित्र लाभला. चल, आपण माघार घेऊया.” यावर अर्जुन म्हणाला, “कृष्णा, तुला सारे ठाऊक असताना तू मला असे टोमणे का मारतो आहेस? आचार्य द्रोण यांनी दिलेले ते दिव्य चिलखत घालून हा दुर्योधन आपल्यासमोर उभा आहे आणि ते चिलखतच माझे बाण निकामी करून टाकत आहे. या उसन्या बळावर तो भेकड माझ्याशी युद्ध करायला उभा आहे. ते चिलखत ज्याच्या अंगावरती आहे तो कधीच जखमी होऊ शकत नाही. आता पाहा, मी ते चिलखतच कसे उडवून टाकतो. त्या चिलखताचा भेद करेल असे दिव्य अस्त्र माझ्याकडे आहे. माझ्या पित्याने इंद्राने ते मला शिकवले आहे.”

 

अर्जुनाने धनुष्यावर बाण चढवला आणि मानवास्त्राचे स्मरण करून तो ते सोडणार इतक्यात अश्वत्थामा मध्ये आला आणि त्याने त्या बाणाचे दोन तुकडे केले. द्रोणाचार्यपुत्र अश्वत्थाम्याने आपले अस्त्र निष्फळ केले, हे अर्जुनास समजले. एकदा ते निष्फळ झाले व पुन्हा वापरले, तर ते उलटून वापरकर्त्यालाच मारते, हेसुद्धा अर्जुनास माहिती होते. मग अर्जुन म्हणाला, “माझ्या गुरूबंधूंनी ते अस्त्र निष्फळ केले तरी, आता बघच मी दुर्योधनालाकसे हरवतो ते. या दुर्योधनाला त्या चिलखताविषयी काहीच माहिती नाही, असे दिसते. एखाद्या स्त्रीने पुरुषाचे कपडे घालावे तसे ते त्याने घातले आहे. जसे बैलाच्या पाठीवर किती मौल्यवान वस्तू लादल्या आहेत याची त्याला जाणीव नसते, तसे हे मौल्यवान चिलखत या दुर्योधनाने धारण केले आहे.” असे म्हणून अर्जुनाने एकामागून एक तीक्ष्ण बाण दुर्योधानावरती सोडले. जो भाग चिलखताने झाकलेला नव्हता, तिथे ते बाण दुर्योधनाच्याअंगात असे घुसले आणि तो जखमी झाला. बाण सोडण्यासाठी हाताचा पंजा आणि बोटे उघडी ठेवली होती, त्यावर नेम धरून ते बाण रुतले आणि दुर्योधनास वेदना असह्य होऊन तो रणांगण सोडून पळून गेला. हे पाहून हसत हसत कृष्ण आणि अर्जुन जयद्रथाच्या दिशेने वळले. त्यांचा रथ सुचिमुखी व्यूहाकडे गेला. कारण, सूर्य आता मावळतीकडे झुकला होता आणि वेळ व्यर्थ घालवून उपयोग नव्हता.

 

कृष्ण म्हणाला, “अर्जुना, काय करावे ते मला समजत नाही. कारण, सर्व बाजूंनी आपण वेढलेलो आहोत. तू असे कर जितक्या मोठ्याने तुला शक्य होईल तितका तुझ्या गाण्डिव धनुष्याचा टणकार कर. मी पण माझा पांचजन्य शंख फुंकतो. हे आवाज ऐकून हे सर्व लोक भेदरून जातील आणि आपल्याला उत्तेजन पण मिळेल.” गाण्डिव धनुष्याचा टणकार हवेत विरतो न विरतो तोच कृष्णाने आपला पांचजन्य शंख जोराने फुंकला. त्या दोन्ही आवाजांनी जणू काही आकाश दुभंगून गेले. जयद्रथाच्या सैन्याला अर्जुन जवळ येताना दिसत होता. पण कौरवांनी जबरदस्त हल्ला चढविला. भूरिश्रवा, शाल्व, राधेय, वृषसेन, कृप, शल्य आणि अश्वत्थामा यांनी मिळून एकट्या अर्जुनावर हल्ला केला. अर्जुनाने अश्वत्थाम्याच्या दहापट बाण सोडून तो हल्ला परतवला. कौरवांच्या प्रत्येक योद्ध्यास अर्जुनाने जखमी केले. बराच वेळ निकराने तुंबळ युद्ध सुरूच होते. सूर्य अधिकाधिक मावळतीकडे झुकू लागला, तसे अर्जुन आणि कृष्ण चिंतेत पडले. पण त्यांनी तसे चेहर्‍यावरती दाखवले नाही. ते शर्थीने लढत राहिले. (क्रमश:)

 - सुरेश कुलकर्णी 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@