माध्यमांचा कंट्रोल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Feb-2019
Total Views |

 


 
 
 
एका समाजमाध्यमातील एका संकेतस्थळावर ‘Raised without Gender’ नावाचा व्हिडिओ पाहण्यात आला. स्वीडन देशामध्ये शिक्षणाच्या बाबतीत शासन पातळीवर काही योजना केल्या गेल्या आहेत. त्यानुसार मुलांना लहान संस्कारक्षम वयात शाळांमधून लिंगनिरपेक्ष शिक्षण दिले जाते. त्यासाठी त्यांचा केवळ अभ्यासक्रमच नव्हे, तर शिक्षक व विद्यार्थ्यांमधला संवाद कसा असावा यावरही बारकाईने लक्ष दिले जाते. शिक्षक मुलांशी बोलताना जाणीवपूर्वक ‘बॉईज अ‍ॅण्ड गर्ल्स’ असे न म्हणता, ‘फ्रेंड्स’ किंवा ‘पीपल’ असा उल्लेख करतात. त्यांच्या खेळवर्गात बाहुल्या नसून प्राण्यांच्या प्रतिकृती असतात, सुपर हिरोंना ‘सॉफ्ट’ असे विशेषण लावलेली पोस्टर्स असतात, किचन सेट, बिल्डिंग ब्लॉक्स, रेसकार ट्रॅक्स, ड्रेसिंग अप, मेकॅनो असे अनेक खेळ मांडलेले असतात आणि कुणालाही कुठलेही खेळ निवडायला प्रोत्साहित केले जाते रंगवण्यासाठी ठेवलेली चित्रेही काळजीपूर्वक कल्पिलेली असतात, त्यात बॅले नृत्य करणारा बॅटमॅन असतो, छोट्या बाळाला अलगद सांभाळणारा आयर्न मॅन असतो आणि आपण झोपेत असताना आपले चुंबन घेऊ पाहणाऱ्या राजपुत्राला हाताने दूर ढकलत मोठ्याने ‘नो’ म्हणणारी स्लीपिंग ब्युटीही असते.
 

मध्यंतरी सातवी-आठवीतल्या मुलांच्या कार्यशाळेत एक गटकार्य दिले होते. मुला-मुलींच्या एकत्रित गटांना काही प्रसिद्ध परिकथा दिल्या. या कथांचा शेवट मात्र कागदावर छापलेला नव्हता. कथा मुलांना लहानपणापासून परिचित अशाच होत्या. मुलांना गटात चर्चा करून या कथांचा शेवट लिहायला सांगितले. एकापेक्षा जास्त शेवट लिहायलाही गटांना मुक्तहस्त होता. मुलांच्या कल्पनाशक्तीला ही खरी चालना होती. सुरुवातीला पुस्तकांतून, चित्रपटांतून, मालिकांतून आपल्यावर सातत्याने आदळून पक्क्या झालेल्या कल्पनांना छेद देणे, त्या जाणीवपूर्वक बाजूला सारणे हे पहिले मोठे आव्हान होते. त्यानंतर आपल्या कल्पना स्वैरपणे मांडून खऱ्या अर्थाने व्यक्त होण्यातला आनंद मुलांनी अनुभवला. काही गटांनी त्यांना दिलेल्या कथांचे एक-दोन नाही, तर तब्बल १५-१६ वेगवेगळे शेवट मांडले होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या गटकार्यानंतर त्याबाबत झालेली चर्चा खूप प्रगल्भ होती. त्यात स्त्री-पुरुषांच्या बदलत्या भूमिका, या कथांमध्ये स्त्रीची सोशिकता, पुरुषाचे शौर्य यासारख्या विशिष्ट गुणांचे केले गेलेले अतिरिक्त कौतुक, एकमेकींच्या बाह्य सौंदर्याबाबत स्त्रियांना वाटणाऱ्या असूयेतून निर्माण झालेल्या समस्या आणि स्त्री-पुरुष सर्वच क्षेत्रांत एकत्रितपणे काम करत असण्याच्या या काळात व्यक्तीकडे लिंगनिरपेक्षपणे केवळ एक व्यक्ती म्हणून पाहण्याची आवश्यकता अशा अनेक मुद्द्यांचा समावेश होता. यातून मुलांना नवीन अंतर्दृष्टी मिळालीच, शिवाय कार्यशाळा घेणाऱ्यांनाही तरुण मनांचा जास्त चांगला ठाव घेता आला. यातून लक्षात आलेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे छापील, दृकश्राव्य व सामाजिक माध्यमे आपले विचार घडवण्यामध्ये किती निर्णायक भूमिका बजावतात. परंतु प्रश्न हा आहे की, आपल्या दैनंदिन आयुष्यावर इतकी व्यापून राहिलेली माध्यमे आपल्याला, विशेषत: तरुणांना तितक्या जबाबदारीने योग्य मार्गदर्शन करत आहेत का?

 

इतक्यात काही छान जाहिराती पाहण्यात आल्या. स्त्री व पुरुषांच्या पारंपरिक भूमिकांना छेद देणाऱ्या या जाहिराती खरेच प्रबोधनपर आहेत. अर्थात, ही जरी चांगली सुरुवात असली तरी, याचे प्रमाण अजून तुलनेने कमीच म्हणावे लागेल. मुलींच्या बाह्य सौंदर्याला व शरीराच्या विशिष्ट ठेवणीला मुले भुलतात, महागड्या गाड्या उडवणारी मुले मुलींना मोहात पाडतात, मुलीच्या ‘न’ करातच तिचा होकार असतो, स्त्रीच स्त्रीची शत्रू असते असले निर्बुद्ध विचार अजूनही मोठ्या प्रमाणावर जाहिराती, मालिका, चित्रपट यातून समाजमनावर लादले जातात. ‘माध्यमे ही समाजाचा आरसा असतात’ असे वाचण्यात येते. मग त्यांनी समाजाची बदलती विधायक बाजू प्रतिबिंबित करण्याची जबाबदारी घ्यायला हवी ना? तरुण मुलांच्या जडणघडणीच्या काळात त्यांच्यावर माध्यमांचा काय परिणाम होत आहे हे पालकांनी जोखत राहिले पाहिजे. विशेषतः सौंदर्याच्या चुकीच्या कल्पनांपायी तरुणांनी तन-मनाचे नुकसान करून घेण्याची उदाहरणे वाढत आहेत. अर्थात, माध्यमांनी काहीही प्रक्षेपित केले तरी ‘रिमोट कंट्रोल’ आपल्या हातात असतो हे पालकांनी लक्षात ठेवावे व आपल्या मुलांनाही याची नीट जाणीव करून द्यावी हे जास्त उत्तम.

 

- गुंजन कुलकर्णी

(लेखिका नाशिक येथे बाल व कुटुंब मनोविकासतज्ज्ञ आहेत.)

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@