हिंदुस्थान प्रकाश संस्थेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ जोशी यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Feb-2019
Total Views |


पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बाळकृष्ण पुरुषोत्तम तथा राजाभाऊ जोशी यांचे वृद्धापकाळाने पुणे येथे सोमवारी रात्री दीड वाजता निधन झाले. श्वास घेण्यास त्रास जाणवल्यामुळे त्यांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

 

मृत्युसमयी त्यांचे वय ८९ वर्षे होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी आणि तीन विवाहित कन्या आहेत. मूळ मुंबई येथील गिरगावचे स्वयंसेवक असलेले राजाभाऊ नंतर पार्ल्यातील जय-विजय सोसायटीत वास्तव्याला आले. त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले होते. पुढे ‘व्होल्टास कंपनी’मध्ये अनेक वर्षे वेगवेगळ्या उच्च पदांवर त्यांनी नोकरी केली. नोकरीच्या निमित्ताने काही काळ पटनामध्येसुद्धा ते वास्तव्यास होते. महाराष्ट्रात खूप प्रसिद्धी पावलेल्या पुणे जिल्ह्यातील तळजाई येथे झालेल्या संघाच्या महाशिबिरानंतर राजाभाऊंनी संघ कार्यात अधिक सक्रियपणे भाग घेतला.

 

राजाभाऊ जोशी एक चांगले गीतगायक होते. तसेच ते संगीतप्रेमीसुद्धा होते. त्यांचे संघटनकौशल्य खरोखरच आगळेवेगळे होते. उत्तम विनोदबुद्धी जपलेल्या राजाभाऊंच्या बैठकीत हास्यविनोदात विषय होत असे. ‘विश्व जगत में युवक गरज उठो गंभीर ध्वनी से’ हे त्यांचे आवडते संघगीत होते. भाईंदरमधील उत्तन येथील संघ प्रेरणेतून उभ्या राहिलेल्या ‘केशवसृष्टी’ या प्रकल्पाच्या उभारणीसाठी राजाभाऊंनी आर्थिक सहयोग मिळवून दिला होता. साप्ताहिक ‘विवेक’ आणि अन्य उपक्रम चालविणार्‍या ‘हिंदुस्थान प्रकाशन संस्थे’चे ते बराच काळ अध्यक्ष होते. तसेच ते संघदृष्ट्या पार्ले भागाचे माजी भागसंघ चालक होते. निवृत्तीनंतर राजाभाऊ पुणे येथे वास्तव्याला आले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@