शिवसेना-भाजप युती : 'या' कारणासाठी दोघे एकत्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Feb-2019
Total Views |
 
 
 

मुंबई : गेल्या २५ वर्षांपासून राज्यात शिवसेना भाजप या दोन्ही पक्षांची युती आहे. मततभेद हे प्रत्येकात असतात. काही लोक सर्वांना एकत्र घेऊन सरकार चालवण्याची नवी संकल्पना राबवत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय विचारांसमोर एक आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे अशावेळी राष्ट्रीय विचारांच्या पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. आम्ही आज व्यापक जनहिताचा विचार करूनच शिवसेना भाजप युती करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. शिवसेना भाजप युतीच्या अधिकृत घोषणेकरिता मुंबईतील ब्लू सी या हॉटेलमध्ये शिवसेना भाजपच्या संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. अमित शाह, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, खा. किरीट सोमय्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आ. अड. आशीष शेलार, शिक्षणमंत्री विनोद तावडे, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे पहिल्या फळीतील नेते उपस्थित होते.

 
मुंबई तरुण भारत - अग्रलेख 
                                                       युती झाली, पण शिवसेनेचे काय? 
 

गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेना भाजप हे दोन्ही पक्ष एकत्रित लढले होते. परंतु विधानसभेत काही कारणांमुळे एकत्र लढता आले नाही. त्यानंतरही आम्ही राज्यात युतीचे सरकार स्थापन केले. गेले साडेचार वर्षे हे सरकार आम्ही यशस्वीरित्या चालवत आहोत. दोन्ही पक्षांचे विचारही सारखेच आहेत. त्यामुळे आम्ही प्रदीर्घ चर्चा करून मतभेद बाजूला सारून युती करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी सर्व निवडणुका दोन्ही पक्ष एकत्र लढतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आम्ही प्रदीर्घ वैचारिक चर्चा केल्या. तसेच पुढील वाटचालीत राज्यातील समस्या एकत्रितरित्या कशा सोडवता येतील यावरही विचार केला. शिवसेनेने अनेक मुद्दे उपस्थित केले होते. त्यातला राममंदिराचा, शेतक-यांच्या समस्यांच्या अनेक प्रश्नांवर तोडगा काढण्यात येत आहे. राममंदिर व्हावे ही दोन्ही पक्षांची इच्छा आहे आणि त्यासाठी केंद्र सरकारही प्रयत्नशील आहे. विवाद नसलेली जमिन न्यासाला देऊन केंद्र सरकार केंद्र सरकारने एकप्रकारे राममंदिराचा मार्ग मोकळा केला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. व्यापक गोष्टींचा विचार करून शेतक-यांच्या हिताचे निर्णय घेण्यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफी आणि पिक विमा योजनेतील काही त्रुटी आमच्या समोर मांडल्या. त्यावरही आम्ही विचार केला असून कृषी विकास केंद्रे सक्षम करण्यावर तसेच शेतक-यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि तक्रार नोंदवण्यासाठी सर्वत्र तक्रार निवारण केंद्र स्थापणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसभेसाठी २३-२५ चा फॉर्म्युला

लोकसभेसाठी शिवसेना २३ जागांवर तर भाजप २५ जागा लढवणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच विधानसभेबाबत मित्रपक्षांशी चर्चा करण्यात येणार आहे. मित्रपक्षांशी चर्चा करून उर्वरित जागा शिवसेना भाजप अर्ध्या अर्ध्या लढेल. तसेच त्यानंतर पदांचे वाटप आणि जबाबदा-या समसमान वाटून घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात काही शंका निर्माण झाल्या उद्धव ठाकरे आणि खा. अमित शाह हे याबात निर्णय घेतील. तसेच व्यापक जनहिताकरिता ही युती झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

५०० चौ फुटांपर्यंत घरांना मालमत्ता करातून सुट 

मुंबई महानगरपालिकेने ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना करमुक्त करण्याचा प्रस्ताव पारित केला होता. त्याला राज्य शासनाची मंजुरी आवश्यक होती. दरम्यान, ५०० चौरस फुटांपर्यंतची घरे करमुक्त करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच आगामी काळात यापेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या घरांचा कर माफ करता येईल का यावरही विचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमची युतीदिलसे

आमची युती ही मनसे नसून ती दिलसे असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षरित्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला टोला लगावला. आमची मने साफ आहेत. युती ही साफमनसे झाली असल्याचे ते म्हणाले.

पक्ष म्हणूनही काम करणार

दोन्ही पक्षांचे सरकार म्हणून राज्यभर काम सुरूच आहे. परंतु आता पक्ष म्हणूनही शिवसेना भाजप काम करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते राज्यभर फिरणार फिरून एकत्र काम करतील. तसेच दुष्काळी भागातही पक्ष म्हणूनही एकत्र कसे काम करता येईल याचाही विचार दोन्ही पक्षांकडून सुरू असल्याचे ते म्हणाले.

नाणार ग्रामस्थांच्या परवानगीनेच

कोकणात उभारण्यात येणारा नाणार प्रकल्प हा ग्रामस्थांच्या परवानगीनेच उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. ग्रामस्थांचा विरोध हा प्रकल्पाला नसून त्यांच्या जमिनी देण्याला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच या प्रकल्पाबाबत पुढील गोष्टी सध्या थांबवण्यात आल्या आहेत. ग्रामस्थ सांगतील त्याच ठिकाणी हा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रात ४५ जागा जिंकणारच

महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ पैकी ४५ जागा जिंकणारच असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. अमित शाह यांनी व्यक्त केला. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार पुन्हा यावे ही जनतेची इच्छा आहे. आज युतीच्या घोषणेनंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची इच्छापूर्ती झाली. दोन्ही पक्षांनी एकत्र लढावे ही दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती. ती आज साकार झाली असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेने प्रत्येक ठिकाणी भाजपला साथ दिली. मध्यंतरी दोन्ही पक्षांमध्ये काही मतभेद झाले. परंत आता ते विसरून आम्ही पुढे जाणार आहोत. मुख्यमंत्र्यांनीही महाराष्ट्राला भ्रष्टाचारमुक्त राज्य बनविले आहे. त्यांचे कामही कौतुकास्पदच आहे, असे म्हणत शाह यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. येत्या काळात दोन्ही पक्ष एकत्र निवडणुक लढवतील आणि भविष्यात ही युती अधिक मजबूत होईल. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते बुथ स्तरावर एकत्रित काम करून मोठा विजय मिळवतील, असेही ते म्हणाले.

मागण्यांवर सकारात्मक निर्णय

शिवसेनेच्या सर्व मागण्यांवर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच आपले विचार आपली धोरणे एकच असल्यामुळे आम्ही एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राम मंदिर, नाणार, शेतकरी कर्जमाफी, अशा अनेक मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी जागांचे वाटपही समसमान असेल. आज शिवसेना भाजप या दोन्ही पक्षां विरोधात काही अविचारी लोक एकत्र येत आहेत. त्यांच्या हाती देशाची आणि राज्याची धुरा जाऊ नये हा युतीमागील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असल्याचे ठाकरे म्हणाले.

युतीमुळे आघाडी खुश

शिवसेना-भाजपच्या युतीमुळे काँग्रेस राष्ट्रवादी यांची महाआघाडी मात्र खुश झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. युतीचा फायदा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीला होणार असल्याचा विश्वास दोन्ही पक्षांकडून व्यक्त करण्यात आला. युती न झाल्यास शिवसेनेना भाजपची मते आपल्या पारड्यात पाडून घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, त्या मतांचे विभाजन आता टळणार आहे. शिवसेनेला दिलेले मत हे भाजपला दिलेले मत ठरणार असल्यामुळे विरोधकांना आता हे रान मोकळे झाले आहे.

एकनाथ खडसे अनुपस्थित

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे मात्र या संयुक्त पत्रकार परिषदेला अनुपस्थित होते. गेल्या निवडणुकांमध्ये खडसे यांनीच पत्रकार परिषद घेऊन २५ वर्षांपासून असलेली शिवसेना-भाजप युती तोडण्याची घोषणा केली होती. परंतु येत्या निवडणुकांसाठी करण्यात आलेल्या युतीच्या घोषणेच्या वेळी मात्र खडसे अनुपस्थित होते. खडसे हे भाजपच्या कोअर कमिटीचे सदस्य असून त्यांच्या अनुपस्थितीमुळे ते नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. परंतु दि. २१ फेब्रुवारी रोजी जळगावात मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम असून त्याच्या तयारीत आपण व्यस्त आहोत. आपण अजिबात नाराज नाही, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.

पत्रकार परिषदेपूर्वी शाह-ठाकरे चर्चा

पत्रकार परिषदेपूर्वी अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल, युवासेना नेते आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते. दरम्यान, या नेत्यांमध्ये तब्बल २० ते २५ मिनिटे चर्चा झाली.

भाजपने अनेकदा शिवसनेचा अपमान केला आहे. अपमान झाल्यानंतरही शिवसेनेकडून ही युती होत आहे. एखादा पक्ष सत्तेसाठी किती लाचार होऊ शकतो हे यावरून स्पष्ट होत आहे.

- अशोक चव्हाण, खासदार

उद्धव ठाकरे यंनी जे केलं त्याचं उत्तर जनतेनेच त्यांना द्यावं. त्यांना भाजपने सक्तवसूली संचलनालयाची (ईडी) धमकी दिल्यामुळेच झालेली ही युती आहे.

- राधाकृष्ण विखे-पाटील, विरोधीपक्ष नेते, विधानसभा

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@