राजन विचारेंच्या विरोधात गणेश नाईक ? धकधक थांबली, होणार थेट लढत?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Feb-2019
Total Views |
 


ठाणे (भटू सावंत) : युतीचे घोडे गंगेत न्हाले आणि विद्यमान खा. राजन विचारेंसह अनेकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. २ लाख, ८० हजार इतके मताधिक्य पुन्हा गाठायचे असल्यास युती हवीच आणि गेलेली खासदारकी परत मिळवायची झाल्यास, भाकर परतायलाच हवी, अशा विचारावर युती-आघाडी येऊन ठेपल्याने आता आघाडीत उमेदवार बदलीच्या चर्चांना उधान आले आहे.

 

१६ व्या लोकसभेत राष्ट्रवादीच्या संजीव नाईक यांचा २ लाख, ८१ हजार, २९९ इतक्या प्रचंड मताधिक्याने पराभव करण्यात राजन विचारे यशस्वी झाले होते. संजीव नाईक यांनीदेखील मोदी लाटेत सव्वातीन लाख मते मिळवली. नाईक यांना १५व्या लोकसभेपेक्षा १० टक्के मतदान कमी झाले. दरम्यान, दीर्घकाळ ठाण्याचे पालकमंत्रिपद भूषवलेल्या बेलापूर, ऐरोली आणि मीरा-भाईंदर या विधानसभा मतदार संघात पकड असलेले गणेश नाईक यांच्या युतीच्या विरोधात उतरवण्याच्या हालचाली वेग धरत आहेत.

 

१९९६ नंतर ठाणे लोकसभा मतदार संघ शिवसेनेकडे गेला. काशीनाथ म्हाळगी, राम कापसे यांनी या मतदार संघाचे दीर्घकाळ प्रतिनिधीत्व केले होते १८८४-८५ दरम्यान काँग्रेसच्या शांताराम घोलप यांचा अपवाद वगळता ठाणे लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व सेना-भाजपच करत आले आहे. मीरा-भाईंदर, ओवळा माजिवडा, कोपरी पाचपाखाडी, ठाणे, ऐरोली, बेलापूर अशी सहा विधानसभा क्षेत्रे ठाणे लोकसभा मतदार संघात मोडतात. यात ऐरोली वगळता सर्व विधानसभा क्षेत्रे सध्या युतीच्या ताब्यात आहेत. त्यामुळे लोकसभेपाठोपाठ विधानसभेच्यादेखील निवडणुका महाराष्ट्रात होत असल्याने आमदारकीचे उमेदवारदेखील खासदारकीच्यावेळी सक्रिय होतात.

 

गेल्या पाच वर्षांत मतदारांमध्ये झालेली वाढ लक्षात घेता व त्यातही सर्वाधिक जास्त शहरी मतदार असलेल्या या लोकसभा मतदार संघात तुल्यबळ उमेदवार देण्याशिवाय गत्यंतर नसल्याने गणेश नाईक यांच्या उमेदवारीची दाट शक्यता दिसत आहे. यामुळे रालोआच्या उमेदवाराला तुल्यबळ लढतीला तोंड द्यावे लागणारच पण, त्याचबरोबर विद्यमान खासदारांना उमेदवारी मिळाली, तर सततच्या टीकेने उद्विग्न झालेल्या भाजप मतदार व पक्ष कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्याची कसरत विचारे यांना करावी लागणार आहे. मोदींचा विकासाभिमुख कार्यकाळ, रालोआच्या विचारसरणीचे मतदार या एकीकडे जमेच्या बाजू असताना, दुसरीकडे आगरी व कथित धर्मनिरपेक्षकार्ड पुढे करून संजीव नाईक या धाकट्या पाल्यापेक्षा गणेश नाईक या मोठ्या पाल्याला लोकसभेच्या रणभूमीत उतरवण्याची कूटनीती आखली जात आहे. त्यामुळे यंदा ठाणे लोकसभा मतदार संघातील लढाई रंजक होताना पाहायला मिळेल.

 

यंदाही आप, मनसेमुळे मतविभाजनाची शक्यता

गेल्या लोकसभेत आम आदमी पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी मिळून एक लाख मते खेचली होती. यावेळी हे दोन्ही पक्ष फारसे चर्चेत नसले तरी, यांचे उमेदवार कोण, याही बाबतीत कुतूहल आहे. ‘आप’ने गेल्या वेळेस कमावलेली ४१ हजार मते यावर्षी कोण पळवणार, यावरूनदेखील विजयी उमेदवाराच्या मतांवर परिणाम होईल, हे नक्की.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@