ममतादीदींनंतर आता नारायणसामी यांची नाटकबाजी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Feb-2019   
Total Views |
 
 

व्ही. नारायणसामी यांच्या नावाचा उल्लेख करण्याचे कारण म्हणजे, ममता बॅनर्जी यांच्यापासून ‘प्रेरणा’ घेऊन त्यांनी सध्या पुदुचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांच्या कथित ‘मनमानी’ कारभाराविरुद्ध राज निवासाबाहेर ‘धरणे’ आंदोलन सुरू केले आहे. व्ही. नारायणसामी यांना नायब राज्यपाल किरण बेदी यांच्याविरुद्ध ही सर्व नाटकबाजी का करावी लागली, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

 

कोलकाता पोलीस आयुक्त राजीवकुमार यांची चौकशी करण्यास आलेल्या सीबीआय पथकावर आक्षेप घेऊन ममता बॅनर्जी यांनी त्या विरुद्ध तेथील प्रसिद्ध मेट्रो चॅनल भागात ‘धरणे’ धरण्याची ‘नौटंकी’ केली होती. पण, त्यांचे हे नाटक फार काळ चालले नव्हते. सर्वोच्चन्यायालयाने राजीवकुमार यांची चौकशी करण्यास अनुमती दिल्याने ममता बॅनर्जी यांच्या आंदोलनातील हवाच निघून गेली. ममतादीदींच्या त्या नाटकबाजीस भाजपविरुद्ध आघाडी उघडलेल्या पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी पाठिंबा दिला होता. त्यात राहुल गांधी, चंद्राबाबू नायडू, अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव, एम. के. स्टालिन, शरद पवार, एच. डी. देवेगौडा तसेच पुदुचेरीचे काँग्रेसचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांचाही त्यामध्ये समावेश होता. व्ही. नारायणसामी यांच्या नावाचा उल्लेख करण्याचे कारण म्हणजे, ममता बॅनर्जी यांच्यापासून ‘प्रेरणा’ घेऊन त्यांनी सध्या पुदुचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांच्या कथित ‘मनमानी’ कारभाराविरुद्ध राज निवासाबाहेर ‘धरणे’ आंदोलन सुरू केले आहे.

 

मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी, त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी आणि अन्य आमदारांनी राज निवासाबाहेर पथार्‍या पसरून जे आंदोलन सुरु केले, त्याची छायाचित्रेही वृत्तपत्रांमधून झळकली आहेत. व्ही. नारायणसामी यांच्या या आंदोलनास नेहमीप्रमाणे एम. के. स्टालिन, अरविंद केजरीवाल, चंद्राबाबू नायडू आदी नेत्यांनी पाठिंबा दिला. रस्त्यावर मुक्काम ठोकून आंदोलन केल्यामुळे प्रसिद्धी पावलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे व्ही. नारायणसामी यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सोमवारी पुदुचेरीस गेले होते.

 

व्ही. नारायणसामी यांना नायब राज्यपाल किरण बेदी यांच्याविरुद्ध ही सर्व नाटकबाजी का करावी लागली, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. नायब राज्यपाल किरण बेदी या सरकारविरुद्ध नकारार्थी भूमिका घेत आहेत. सरकारने त्यांच्याकडे जे ३९ प्रस्ताव पाठविले, त्याबद्दल त्या काहीच निर्णय घेत नाहीत. या प्रस्तावांत, मोफत तांदूळ वाटपासह विविध कल्याणकारी योजनांचा अंतर्भाव आहे. पण, त्या प्रस्तावांना नायब राज्यपाल मान्यता देत नाहीत, असे काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याचे म्हणणे आहे, तर हा सर्व प्रकार राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे नायब राज्यपालांचे म्हणणे आहे. आपल्यावर बिनबुडाचे आरोप केले जात असून मुख्यमंत्री आणि अन्य आमदार हे कायदा पाळणारे राहिलेले नसून कायदा मोडणारे झाले असल्याची टीका किरण बेदी यांनी केली. खोटेनाटे आरोप करून व्ही. “नारायणसामी हे जनतेची दिशाभूल करीत आहेत. सध्या राज निवासाला सर्व बाजूने घेरले गेले आहे. आम्हाला बाहेर जाता येत नाही आणि भेटीसाठी कोणी आता येऊ शकत नाही,” असे किरण बेदी यांनी म्हटले आहे.

 

सरकारच कायद्याचे पालन करीत नसल्याचे सांगताना, नायब राज्यपाल किरण बेदी यांनी ‘हेल्मेटसक्ती’चे उदाहरण दिले. ‘हेल्मेटसक्ती’ला उघडपणे विरोध करून सरकारच मोटरवाहन कायद्याकडे दुर्लक्ष करीत असल्याकडे किरण बेदी यांनी लक्ष वेधले. मात्र, मुख्यमंत्री आपल्या या नाटकबाजीचा त्याग करण्यास तयार नाहीत. आपले ‘धरणे’ हे हुकुमशाहीविरुद्ध असून मंत्रिमंडळाच्या प्रस्तावांना नायब राज्यपाल जोपर्यंत मान्यता देत नाहीत, तोपर्यंत ते चालूच राहील, असेही व्ही. नारायणसामी यांनी स्पष्ट केले आहे.

 

व्ही. नारायणसामी यांचे ‘धरणे’ गेल्या बुधवारी दुपारपासून सुरू झाले. नायब राज्यपाल लोकनियुक्त सरकारच्या दैनंदिन कारभारात हस्तक्षेप करतात, असा त्यांचा आरोप आहे. या सर्व प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी हस्तक्षेप करावा आणि लोकशाही संकेतानुसार वर्तन करण्याचा सल्ला नायब राज्यपालांना द्यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे. गृहमंत्र्यांना पाठविलेल्या ई-मेलमध्ये, किरण बेदी या ‘समांतर दैनंदिन प्रशासन’ चालवीत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. “किरण बेदी यांना मंत्रिमंडळाच्या निर्णयाची तसेच कायद्याच्या राज्याची पर्वा नाही. त्यांच्या कारकिर्दीत या केंद्रशासित प्रदेशात लोकशाही आचके देत आहे,” असा आरोप त्यांनी केला आहे. “आपण १३ फेब्रुवारीपासून आंदोलन सुरू केले. पण, त्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करून नायब राज्यपाल पोलीस बंदोबस्तात १४ फेब्रुवारीला पुदुचेरीतून बाहेर पडल्या. जाताना आमच्याशी बोलण्याचे साधे सौजन्यही त्यांनी दाखविले नाही,” असे व्ही. नारायणसामी म्हणतात. किरण बेदी यांना परत बोलवावे, अशी विनंती आपण राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री, अर्थमंत्री आणि परराष्ट्रमंत्री यांना केली आहे, असे व्ही. नारायणसामी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

 

 
 

दरम्यान, दिल्लीस गेलेल्या नायब राज्यपाल किरण बेदी वेळेआधीच पुदुचेरीला परतल्या. सध्याचा तिढा सोडविण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करण्याची तयारी दर्शविली होती. पण, मुख्यमंत्र्यांनी काही पूर्वअटी घातल्यामुळे ही बैठकच रद्द करण्यात आली. बेदी या दिल्लीहून २० फेब्रुवारीस परतणार होत्या. पण, आंदोलनाची तीव्रता वाढत असल्याचे लक्षात घेऊन त्या आधीच तेथून परतल्या आणि त्यांनी भेटीची तयारी दर्शविली. व्ही. नारायणसामी यांनीही त्या निमंत्रणाचा स्वीकार केला. पण, काही तासांतच ही संभाव्य बैठक रद्द झाली. आपण कोठे भेटायचे, ही बैठक कशाप्रकारे घ्यायची, त्या बैठकीस कोणी उपस्थित राहायचे आणि कोणी नाही, अशा काही अटी व्ही. नारायणसामी यांच्याकडून घालण्यात आल्याची माहिती किरण बेदी यांनी दिली. व्ही. नारायणसामी हे राजकीय कारणांसाठी आपले आंदोलन करीत आहेत. आपल्याकडे आता कोणतीही फाईल पडून नसल्याचे सांगून राजकीय हेतू साध्य करण्यासाठी मुख्यमंत्री हा सर्व विषय अनावश्यक ताणत आहेत, असे किरण बेदी म्हणतात.

 

व्ही. नारायणसामी यांच्यापुढे नायब राज्यपाल बधत नसल्या तरी, मुख्यमंत्र्यांनी ही जी ‘नाटकबाजी’ सुरू ठेवली आहे त्याला अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, एच. डी. कुमारस्वामी या नेत्यांनी पाठिंबा दिल्याने त्यांना अधिक हुरूप आल्याचे दिसत आहे. असे असले तरी अण्णाद्रमुक आणि भारतीय जनता पक्षाने, व्ही. नारायणसामी यांच्या आंदोलनाचा हेतू राजकीय असल्याचा आणि आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून आंदोलन केले जात असल्याचा आरोप केला आहे.

 

नायब राज्यपाल किरण बेदी यांनी, दुचाकीधारकांना हेल्मेट वापरण्याची सक्ती करण्याचे ठरविल्याचा निर्णय व्ही. नारायणसामी यांना रुचला नाही. दुचाकीधारकांना रस्त्यावर येऊन हेल्मेट घालण्यास सांगणार्‍या किरण बेदी या एखाद्या पोलीस कॉन्स्टेबलसारख्या वागत असल्याची टीका त्यांच्यावर करण्यात आली. रस्त्यांवर हेल्मेट फोडून या सक्तीचा निषेध सत्ताधार्‍यांकडून करण्यात आला. व्ही. नारायणसामी यांच्याकडून जे आंदोलन केले जात आहे, त्यामध्ये ‘हेल्मेटसक्ती’ला असलेल्या विरोधाचाही समावेश आहे. पण, नायब राज्यपाल त्यांच्यापुढे नमत नसल्याचे पाहून त्यांनी राज निवासाबाहेर आपले आंदोलन सुरू केले आहे. ममता बॅनर्जी यांच्या ‘धरणे’ आंदोलनाप्रमाणेच व्ही. नारायणसामी यांचीही अशीच ‘नाटकबाजी’ असल्याने त्याचा किती राजकीय लाभ होईल, ते भविष्यात दिसून येईलच.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@