वारली चित्रकलेचा ‘चित्रदूत’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Feb-2019   
Total Views |


संजय देवधर यांना नुकताच राज्य शासनाचाआदिवासी सेवक’ पुरस्कार मिळाला. त्यांनी विशिष्ट संकल्पना घेऊन वनवासी बांधवांचीच सेवा नाही, तर भारतीय आदिम संस्कृतीची सेवा केली असेच म्हणावे लागेल.

 

कलाकार व्यक्ती ही मनस्वीच असते. आजूबाजूच्या घडामोडींकडे पाहण्यासाठी त्याला नैसर्गिकरित्या एक नजर प्राप्त झालेली असते; ती नजर रसिकतेची आणि मानवी संवेदनशीलतेची असते. अशी रसिकता आणि संवेदनशीलता जपत संजय देवधर यांनी वेगळ्या संकल्पनेतून वनवासी बांधवांसाठी कार्य केले आहे. आज संजय गावकरी कॅमलिन कला मंचचे संयोजक, नाशिक कलानिकेतन संस्थेचे संचालक, चित्रकला महाविद्यालयाच्या शाळा समितीचे अध्यक्ष, लोकहितवादी मंडळाच्या कलाविभागाचे सचिव, कलाक्षेत्र दृश्यकला आस्वाद केंद्राचे सचिव आहेत. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी वारली चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती, त्याला १२०० स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यासाठी ‘वंडरबुक रेकॉर्ड’ने त्यांची दखल घेतली. तसेच ‘वारली चित्रकलेतून सामाजिक संदेश’ यासाठी त्यांची ‘जिनिअस बुक ऑफ रेकॉर्ड’ने दखल घेतली.

 

आता हे सर्व वाचल्यावर चटकन लक्षात येते की, संजय यांनी सुरुवातीपासूनच ‘वारली चित्रकला’ या विषयावर लक्ष केंद्रित केले असावे. पण, तसे नाही. देवधर कुटुंब मुळचे कोकणातले. पण, दीडशे वर्षांपूर्वी ते नाशिकला स्थायिक झाले. दामोदर आणि नीलिमा देवधर यांचे सुपुत्र संजय. ते म्हणतात की, “लहाणपणापासून मला चित्रकलेची आवड होती. शाळेत चित्रकला आणि हस्तकला शिक्षकांमुळे चित्र, रंग, रेषा यांच्याविषयी ओढ वाटू लागली. शाळेचे ‘आराधना’ नावाचे हस्तलिखित मासिक निघायचे. शिक्षकांनी त्यावेळी एका कथेवर चित्र काढायला लावले. मला वाटते की, तो क्षणच माझ्या पुढील आयुष्याचा केंद्रबिंदू ठरला. तसेच आई-वडील आणि पुढे पत्नीनेही मला खूप साथ दिली, म्हणून मी या क्षेत्रात थोडेफार काही करू शकलो.”

 

दहावीचे शिक्षण घेतल्यानंतर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये चित्रकलेचे शिक्षण घेण्यासाठी संजय यांनी तयारी केली. पण, त्यांचे गुणवत्ता यादीत नाव आले नाही. त्यामुळे मग त्यांनी मुंबईमध्येच बांद्रा स्कूल ऑफ आर्टमध्ये संजय यांनी प्रवेश घेतला. दोन वर्ष तिथे शिकल्यानंतर त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घेऊन पुढील शिक्षण सुरू केले. पुढे शिक्षण पूर्ण करून नाशिकला आल्यावर ते पत्रकार म्हणून एका दैनिकात रुजू झाले. त्याच कालावधीत कविवर्य कुसुमाग्रजांनी स्थापन केलेल्या ‘लोकहितवादी मंडळा’च्या चित्रकला शाखेसाठी काम करू लागले. वारली चित्रकला शिबीर आयोजित करण्याचे त्यावेळी ठरले. ते साल होते 2004. माधुरी चौक आणि काही वनवासी वारली चित्रकलाकार शिबिरार्थींना वारली चित्रकलेचे प्रशिक्षण देण्यास आले. तिथे संजय यांनी वारली चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले. तो विषय तिथेच संपला नाही. विधिलिखित जे घडणार होते त्याची नांदी सुरू झाली. काही महिन्यांनी महेश्वरी समाजाच्या महिला संजय यांना भेटायला आल्या. महिलांनी सुचवले की, “तुम्ही तर शिकलात ना वारली चित्रकला, आता ती आम्हाला शिकवा.” प्रयत्न करून बघावा म्हणून संजय यांनी महिलांना वारली चित्रकलेचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर त्यांचे सात वर्ग झाले.

 

गोविंद गारे यांनी संजय यांची भेट जीव्या सोम्या म्हशे यांच्याशी करून दिली. ती भेट जणू जीवाशिवाची भेट होती. जीव्या म्हशे यांच्याकडून वारली चित्रकलेचे कंगोरे शिकताना संजय यांना या चित्रशैलीची व्याप्ती जाणवली. ही चित्रकला पर्यावरणाशी समतोल साधून निसर्गाशी मैत्री राखणारी आहे. या कलेचा विस्तार जनमानसात व्हायला हवा, या ध्येयाने त्यांना पछाडले. त्यासाठी वनवासी पाड्यात जाऊन त्यांनी पद्धतशीरपणे वारली चित्रकलेचा अभ्यास सुरू केला. गुजरातसह महाराष्ट्रभर पाड्या-पाड्यातली वारली चित्रकला अभ्यासली. त्यातूनच मग पुस्तक साकारले ‘वारली चित्रसृष्टी’ व पुढे ‘वारली वर्ल्ड आर्ट’ ही दोन्ही पुस्तके म्हणजे चित्रकलेतला संशोधनात्मक दर्जेदार ठेवा ठरली. या पुस्तकांमध्ये केवळ वारली चित्रकलेचाच ऊहापोह केलेला नाही, तर देशभरातील आणि परदेशातील चित्रशैली आणि वारली चित्रशैली यातील साम्य, विरोधाभास, तुलना यांचा अभ्यास केलेला आहे.

 

वारली चित्रकलेसंदर्भात संजय यांनी खूप संशोधन केले. ही चित्रशैली सर्वदूर पोहोचावी यासाठी ते ठिकठिकाणी या चित्रशैलीवर व्याख्याने देऊ लागले. स्पर्धा-शिबिरांचे आयोजन करू लागले. ते ‘चित्रसहल’ नावाची एक अनोखी संकल्पनाही राबवतात, ज्यामध्ये वारली चित्रकला प्रत्यक्ष शिकण्यासाठी वनवासी पाड्यावर नेले जाते. यातून दोन गोष्टी साधल्या जातात. पहिली म्हणजे, शिकणार्‍याला मूळ स्तरातून शिक्षण मिळते. दुसरी म्हणजे नागरी समाजाला वनवासी बांधवांच्या जीवनाचा अंदाज येतो. पुढे त्यांना जाणवले की, जागतिकीकरणाच्या चक्रात प्रत्यक्ष वनवासी पाड्यांमध्ये वारली चित्रकला लोप पावते की काय, असे चित्र दिसते आहे. या बांधवांनी आपला समृद्ध कला वारसा विसरणे, ही भारतीय सांस्कृतिक इतिहासातील घोडचूक ठरणार होती. हे चित्र बदलायला हवे. यासाठी संजय पुढे सरसावले. त्यांनी पाड्या-पाड्यावर जाऊन वनवासी बांधवांना वारली चित्रशैली शिकवायला सुरुवात केली. आज संजय यांनी हजारो बांधवांना वारली चित्रशैलीचे प्रशिक्षण दिले आहे. ही चित्रशैली संपन्नतेने जगावी आणि टिकावी यासाठी त्यांनी वनवासी समाजातच अनेक कलाकार निर्माण केले आहेत. वारली चित्रशैलीला पाड्या-पाड्यात आणि पाड्याबाहेरील जगात विस्तारणारा चित्रदूत म्हणून संजय यांचे कार्य मोठेच आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@