हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Feb-2019
Total Views |



आज तारखेप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. त्यानिमित्ताने छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याच्या उभारणीपासून ते त्याच्या संरक्षणापर्यंत केलेला शिवपराक्रम, गनिमी कावा आणि कुटनीती, रयतेचा राजा म्हणून कमावलेले अफाट प्रेम आणि निष्ठा, यांचे थोडक्यात चित्रण करणारा हा लेख...

 

महाभाग्यवान मी, महाराष्ट्र माझी मायभूमी, महाराजांचीच ही महतकरणी...‘ शुक्रवारचा दिवस होता, रात्रीची वेळ होती. अवघ्या शिवनेरीच्या मुखावर औत्सुक्य, आनंद अन् काळजी झळकत होती. साऱ्या गडाचे लक्ष लागले होते ते जिजाऊंकडे, शिवनेरीत बांधलेला पाळणा मोठ्या प्रतीक्षेत होता. क्षणातच आनंद उधळीत एक बातमी वाऱ्यासारखी पसरली.... ‘पुत्ररत्न झाले... पुत्ररत्न झाले...’ गडावर सर्वत्र नगारे-चौघडे वाजू लागले. अर्थातच, जिजाऊ मासाहेबांच्या उदरी शिवबांचा जन्म झाला. जणू हिंदवी स्वराज्याचा क्रांतिसूर्य उदयास आला. तो पवित्र दिवस होता, १९ फेब्रुवारी, १६३०.

 

जिजाऊंची आज्ञा शिरसावंद्य

 

शिवरायांचे पिताश्री शहाजीराजे आदिलशहाच्या दरबारी सरदार होते. परिणामी, मराठी राज्याची धुरा जिजाऊंच्या खांद्यावर आली होती. जिजाऊंच्या देखरेखीखाली शिवबांसह मावळ्यांना तिरंदाजी, तलवार चालविणे, घोडेस्वारी व विविध प्रकारच्या युद्धतंत्रातील डावपेच शिकविले जायचे. मराठी साम्राज्याचा आदर्श राजा बनविण्याच्या द़ृष्टीने जिजाऊंनी शिवबांना प्रभू रामचंद्रांचा पराक्रम, भीमार्जुनांचे युद्धकौशल्य, युधिष्ठिराची धर्मनिष्ठा व श्रीकृष्णाच्या युद्धनीतीत पारंगत केले. जिजाऊ या शिवबांच्या केवळ जन्मदात्रीच नव्हे, तर त्यांची त्या स्फूर्ती, प्रेरणा व मार्गदर्शिका होत्या. शिवबांची मातृभक्ती अपरंपार होती, तर जिजाऊंचे पुत्रप्रेम अतूट होते. शिवबा आपल्या मातोश्रींची आज्ञा शिरसावंद्य मानत. जिजामातांची एक शिकवण होती. ती म्हणजे प्रणाम करायचा तो फक्त माता-पिता व परमेश्वराला. त्याचं ते तंतोतंत पालन करायचे. एके दिवशी शिवबा हे शहाजीराजेंसह विजापूरच्या आदिलशहाच्या राजदरबारी गेले असता, शहाजींनी शिवबांना बादशहाला मुजरा घालण्याचा इशारा केला. तथापि शिवबाने बादशहाला मुजरा घालण्यास नकार दर्शविला. शिवबा हे खऱ्या अर्थाने मातृभक्त होते. अत: ‘आईसारखे परमदैवत दुसरे नाही’ हे पूर्णसत्य आहे. एके दिवशी मासाहेबांनी ‘मला कोंढाणा हवा आहे’ अशी इच्छा व्यक्त केली असता, महाराजांनी लगेच तानाजी मालुसरे यांना कूच करण्यास सांगितले. त्याचदिवशी नेमका त्यांच्या घरी विवाहसोहळा होता. तथापि त्याची पर्वा न करता, स्वामींच्या आदेशाचे पालन करत कोंढाण्यावर चढाई करून तो जिंकून दिला. या युद्धात तानाजी धारातीर्थी पडले. परंतु, ‘गड आला पण सिंह गेला’ याची इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद झाली. अशा तर्‍हेने जिजाऊंच्या प्रेरणेतून शिवबा व त्यांच्या परमप्रिय मावळ्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची मा जगदंबेसमोर शपथ घेतली. शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजीराजे यांनी स्वकियांची बंडाळी मोडीस काढून शंभरहून अधिक युद्धे जिंकली, म्हणूनच शिवकालीन कालखंडाचा उल्लेख इतिहासात ‘शिवशंभू’ असा आहे.

 

राज्यभिषेक झाला; शिवबा छत्रपती झाले

 

१६७४ साल उजाडलं. मराठी साम्राज्याच्या इतिहासाचं एक नवं पर्व सुरू झालं. शिवराज्याभिषेकासाठी अवघा रायगड नटला. जिजाऊंचा आनंद गगनात मावत नव्हता. मातेला आकाश ठेंगणं वाटू लागलं होतं. या सोहळ्यास देश-विदेशाच्या पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते. गडावर अभूतपूर्व गर्दी उसळली होती. काशीच्या गागाभट्टांकडे पौरोहित्य सोपविण्यात आले होते. ६ जून, १६७४ रोजी मंत्रांच्या उद्घोषात पहाटे शिवराज्याभिषेक संपन्न झाला. जिजाऊंच्या डोळ्यांचं पारणं फिटलं. शिवरायांनी राजसिंहासनावर विराजमान होण्याआधी मासाहेबांच्या चरणी वंदन करून आशीर्वाद घेतला. छत्रपतींची द़ृष्ट काढत जिजाऊ म्हणाल्या, “शिवबा, तुम्ही राजे झालात, छत्रपती झालात...” जिजामातांची अंतिम इच्छा ‘मराठा तितुका मेळवावा’ हे कानी पडताच, छत्रपतींनी मराठी साम्राज्य विस्तारण्याचा संकल्प सोडला जिजामातांना आमचा मानाचा मुजरा।

 

परस्त्री मातेसमान

 

‘स्त्री ही मग कुठलीही असो, प्रत्यक्ष शत्रूच्या मुलखातील जरी असली तरी, ती मातेसमान असते’ हा मोलाचा विचार छत्रपतींनी रयतेला दिला. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला युद्धकैदी म्हणून ताब्यात घेतले असता, शिवरायांनी त्या स्त्रीला मातेसमान वागणूक देऊन आपल्या सैनिकांकरवी तिच्या राज्यात सन्मानपूर्वक पाठविले. या घटनेला शिवकालीन इतिहास साक्षीदार आहे. त्याचप्रमाणे स्त्रीच्या अब्रूशी हेळसांड करणाऱ्या एका गावप्रमुखाचे शिक्षा म्हणून हातपाय तोडण्याचे महाराजांनी फर्मान काढले होते. खरं तर, जिजामातांनी आपल्या पुत्राला संस्कारक्षम घडविलं होतं. शिवबा स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. स्त्रिया स्वसंरक्षण करू शकतील, यासाठी त्यांना तलवारबाजीचे प्रशिक्षण दिले जात असे. शिवबांच्या मनात स्त्रियांविषयी नितांत आदर होता.

 

कल्याणात पहिल्या आरमाराची स्थापना

 

शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने कल्याणनगरी पावन झाली. त्याचं भान ठेवून कल्याणकरांनी आपल्या शहराला स्वच्छ, सुंदर ठेवावे व त्याची छबी स्वच्छ ठेवावी. शिव कालखंडात कल्याण शहराला अनन्यसाधारण महत्त्व होते. भारतातल्या पहिल्या आरमाराची स्थापना छत्रपतींनी कल्याण येथे केली. शत्रूला गाफिल ठेवून गनिमी काव्याच्या माध्यमातून कल्याण खाडीमधून आरमाराद्वारे हल्ले केले जायचे. दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच २४ ऑक्टोबर, १६५७ रोजी शिवरायांनी कल्याणला स्वतंत्र करून दुर्गाडी किल्ल्यावर भगवा फडकवला. मराठी स्वराज्याची मुहूर्तमेढ कल्याण येथे करून शिवरायांनी युद्धकौशल्याच्या बळावर सलग ४० किल्ले सर केले. राष्ट्रभक्तीसह देवनिष्ठा रयतेच्या मनात बिंबविण्यासाठी शिवबांनी जिजाऊंच्या संकल्पनेतून दुर्गाडी किल्ल्यावर भवानीदेवीची प्रतिष्ठापना केली. अत: मासाहेब व शिवबांना कल्याणकरांतर्फे मानाचा मुजरा!

 

शेतकऱ्यांचे कैवारी

 

‘शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे’ हा विचार शिवबांनी रयतेला दिला. छत्रपतींच्या सैन्यात सर्वाधिक शेतकऱ्यांची पोरं होती, हे जाणून त्यांनी शेतकऱ्यांचे हित जपणं, आपलं आद्यकर्तव्य मानले. शेतकऱ्यांना शेतीत प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने शिवबा हे सर्वाधिक उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांना पुरस्कार देऊन गौरवित असत, तर अल्पभूधारक शेतकऱ्यांना शिवकाळात मोफत बी-बियाणे पुरविले जायचे. तसेच शेतसारा किफायतशीर प्रमाणात आकारला जायचा. पडीक जमिनीची मशागत करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्याकडून अर्थसाहाय्य केले जायचे. दुष्काळजन्य परिस्थितीत शेतकऱ्यांना शेतसारा माफ करून त्यांच्या गुरांसाठी मोफत चारा पुरविला जात असे. ‘वृक्षतोड कोणीही करू नये’ असे सक्त आदेश शिवरायांनी काढले होते. शिवबा हे पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यास अग्रक्रम देत असत. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली, तर राज्याला संपन्नता येईल, असे त्यांचे ठाम मत होते. या पार्श्वभूमीवरच शिवरायांना ‘रयतेचा राजा’ म्हणून संबोधिले जाते. शिवाजी महाराजांचा आदर्श शिरसावंद्य मानून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी करत, त्यांना संकटसमयी मदतीचा हात देऊन सुखद दिलासा दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून साकारलेली ‘जलयुक्त शिवार योजना,’ ‘मागेल त्याला शेततळे’ योजना १०० टक्के यशस्वी झाल्या आहेत. रोहयोमंत्री जयकुमार रावल यांनीदेखील शेतकऱ्यांच्या कल्याणार्थ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (मनरेगा) रोजगार उपलब्ध करून देऊन ग्रामस्थांसाठी पायाभूत सुविधांची निर्मिती केली आहे. वास्तवात शिवरायांच्या महाराष्ट्राला सुजलाम्-सुफलाम् करणं, हाच केंद्र व राज्य सरकारचा मानस आहे.

 

गड-किल्ले राज्याची कवचकुंडले

 

राज्याची मदार अधिकतर गड-किल्ल्यांवर आहे, हे जाणून महाराजांनी रायगड, पुरंदर, पन्हाळा, सिंहगड, विशालगड, प्रतापगड आदी किल्ले, कोट व जंजिरे उभारून आपल्या मुलूखांची तटबंदी मजबूत केली. १६४७ मध्ये वयाच्या १७व्या वर्षी शिवरायांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणगड किल्ला जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. खरं तर, तोरणगड हे स्वराज्याचे तोरणच ठरले. इतकेच नव्हे तर कोंढाणा, पुरंदर हे किल्लेही जिंकून त्यांनी पुणे प्रांतावर पूर्ण अधिपत्य प्रस्थापित केले, तर मुरुंबदेवाचा डोंगर जिंकत त्याची डागडुजी करून त्याचे नाव ‘राजगड’ ठेवले. १६५६ साली महाराजांनी रायरीचा किल्ला सर केला व त्यातून कोकण विभागात स्वातंत्र्याचा विस्तार झाला. बाजीप्रभू देशपांडेंनी बलिदान देऊन पावनखिंड जिंकली. वास्तवात गड-किल्ले ही शिवबांची कवचकुंडले होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत शिवरायांच्या किल्ल्यांचे सुशोभिकरण केले जात आहे. पर्यटन विभागामार्फत किल्ल्यांची दुरुस्ती व मजबुतीकरण केले जात आहे. छत्रपतींचा समृद्ध व वैभवशाली वारसा जपून शिवरायांच्या महाराष्ट्राला सर्वद़ृष्टीने बलवान करण्यास केंद्र व राज्य सरकार वचनबद्ध आहे.

 

गनिमी काव्याचा अचूक प्रयोग

 

शिवरायांच्या घोडदळात सुमारे दीड लाख, तर पायदळात दोन लाख सैनिक होते. नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते व खंडेराव कदम हे महाराजांचे सरसेनापती होते. मुघल व आदिलशहा यांच्या तुलनेत सैन्यबळ कमी असूनही तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, जीवा महाला, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, नेताजी शिंदे, येसाजी कंक, कान्होजी जेधे आदी शूरवीर सैनिकांच्या जोरावर छत्रपतींनी शत्रूपक्षांना नामोहरम केले. वास्तविक पाहता, महाराजांचे युद्ध नैपुण्य अद्वितीय होते. अफजलखानाचा वध, सुरतेची लूट, आग्राच्या नजरकैदीतून शिवबांची शिताफीने सुटका, शाहिस्तेखानावरील हल्ला, कोंढाण्याचे युद्ध या सर्व ऐतिहासिक घटनांमधील यश शिवबांच्या ‘गनिमी काव्या’चे फलित होय. राजाप्रति सरदारांची निष्ठा व शिवबांचा त्यांच्यावरील विश्वास हे नातं तर अतुलनीय होतं, याची इतिहासात नोंद आहे.

 

कुशल प्रशासक

 

शिवकालीन राज्यव्यवस्थेची शिस्त खूपच करडी होती. सरकारी नोकऱ्या व सैन्यभरती जाती-धर्माच्या आधारावर न होता, अनुक्रमे गुणवत्ता व युद्ध नैपुण्यावर होत असे. राज्यकारभार पारदर्शक व गतिशील चालावा, यासाठी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले होते. रयतेकडून कर वसुली जमीनदारांमार्फत न करता, सरकारी नोकरांकडून करावी आणि राज्याचा खर्च भागवून नियमितपणे शिल्लक ठेवावी, असे त्यांचे निर्देशहोते. शिवकालात कायद्याचा भंग करणार्‍यांना कडक शिक्षा होत असे. उल्लेखनीय कामगिरी करणार्‍यांचा बक्षिसे व उच्च पदे देऊन सन्मान होत असे. सैनिकांच्या भरतीत महाराज स्वत:च लक्ष घालीत असत. प्रत्येक सैनिकाला सर्वप्रकारची हत्यारे हाताळण्याचे व चढाईचे शिक्षण दिले जायचे. म्हणून शिवरायांची कुशल प्रशासक म्हणून रयतेत ख्याती होती.

 

सर्वधर्मसमभावाचे पुरस्कर्ते

 

शिवकालीन काळात देवालयांप्रमाणेच मशिदींनाही सरकारी तिजोरीतून अर्थसाहाय्य मिळायचे. छत्रपतींनी धर्म व राजकारण यांची फारकत करून रयतेला सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली. शिवधर्म म्हणजे स्वराज्याचे रक्षण, परंपरेचे संवर्धन अन् अंधश्रद्धा निर्मूलन करून रयतेमध्ये आत्मविश्वास व चैतन्य निर्माण करणे होय. प्रत्येकाने दुसर्‍यांच्या धर्मस्थानांचा व धर्मग्रंथांचा आदर करावा, असे छत्रपतींचे धोरण असून ते खऱ्या अर्थाने उदार होते. महाराजांच्या आरमारात दर्यासारंग दौलतखान, इब्राहिम खान यासारखे अनेक मुस्लीम सेनानी होते. त्यांच्या लष्करात विविध पदांवर ७०० हून अधिक पठाण कार्यरत होते. ‘राजधर्म’ हाच सर्वश्रेष्ठ धर्म ते मानत. म्हणूनच त्यांना ‘जाणता राजा’ म्हटलं जातं. चला तर, आपण सर्वजण छत्रपतींच्या महाराष्ट्राला अधिक वैभवशाली बनवूया, म्हणजे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल. जय महाराष्ट्र !

 

- रणवीर राजपूत

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@