क्षोभ कमी होणार नाही!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Feb-2019
Total Views |

 

 
 
 
जवानांना लाथा मारणारा आणि आता थेट दहशतवादी कारवायात सहभागी होणारा काश्मिरी युवक हीच मोठी डोकेदुखी आहे. सरकारसमोरचा पेच आता उर्वरित देशवासीयांच्या भावना की, जम्मू-काश्मिरी अवामला सोबत ठेवणे असा असेल.
 

पुलवामा येथे झालेल्या सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला काही दिवस लोटूनही त्यामुळे देशभरात निर्माण झालेला दु:ख आणि क्षोभ कमी होण्यास तयार नाही. यापूर्वी असे हल्ले झालेले नाहीत, असे मुळीच नाही. मात्र, अश्रूंच्या मागे दडलेला जनक्षोभ काही केल्या कमी होण्यास तयार नाही. ‘लोकल’ ही मुंबईची जीवनवाहिनी. शनिवारी नालासोपाऱ्यात स्वत: लोकांनी लोकल रोखून धरली होती. ‘नक्षेपर से नाम मिटा दो पापी पाकिस्तान का’ अशा घोषणा देत लोक ट्रॅकवर पाच तासांहून अधिक काळ ठिय्या मांडून बसले होते. पोलिसांनी विशेष तुकडी बोलवून सौम्य लाठीमार केला तेव्हा कुठे लोक पांगले. स्थानकावरून लोक पांगले असले तरी, लोकांच्या मनातला क्षोभ काही केल्या जायला तयार नाही. सोशल मीडिया, चौकातले फलक, बॅनर्स अशा शक्य त्या मार्गांनी अजूनही लोक आपला शोक आणि संताप व्यक्त करीतच आहेत. कोणी शिल्पकाराने जुहू चौपाटीवर जवानांना श्रद्धांजली वाहणारी वालुकाशिल्पे तयार केली आहेत. तर खेळात राजकारण नको म्हणणाऱ्या मुंबई क्रिकेट क्लब ऑफ इंडियाने क्रिकेटपटू असलेल्या इमरान खानचा फोटो काढून फेकला. महाराष्ट्रात ज्या ठिकाणी शहिदांवर अंत्यसंस्कार करण्यात आले त्याठिकाणीही मोठ्या प्रमाणावर लोकांनी गर्दी केली होती. शहिदांच्या चिता जसजशा पेटल्या तसतशा बदल्याच्या घोषणा आसमंतात घुमून राहिल्या. ज्यांनी आपला एक मुलगा गमावला अशा पित्यानेहीआपला दुसरा मुलगा देशासाठी देऊ पण, बदला घ्या,’ असे म्हणत हंबरडा फोडला.

 

काश्मीर मुद्दा आणि पाकिस्तानसोबतचे संबंध अशा सर्वच बाजूंचा सर्व बाजूंनी विचार करणारे सरकार आज दिल्लीत आहे. देशहितासाठी जम्मू-काश्मीरमध्ये सरकार सोडून देणारी मंडळी आज सत्तेत आहेत. सर्जिकल स्ट्राइकसारखा विषय करून दाखविणारी मंडळी आज सत्तेत आहेत. आजचे सरकार कुठलीही कारवाई करण्यासाठी मागे-पुढे पाहणार नाही, असा विश्वास आहेच. पण त्याचबरोबर आज जे काही देशभरात चालू आहे त्याची योग्य ती दखल घ्यावीच लागेल. सत्ता कुठल्याही राजकीय पक्षाची असो. आज जो काही क्षोभ लोकांमध्ये आहे, तो विरून जाईल असे मुळीच म्हणता येणार नाही. पुलवामात सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार, असे पंतप्रधानांनी यापूर्वीच सांगितले आहे. लष्कर, सरकार यांच्यावर विश्वास ठेवायलाच हवा. आपल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असेच आपले लष्कर आहे. मात्र, हा बदला लवकर घेतला गेला नाही, तर त्यातून निर्माण होणारे परिणाम भयंकर असू शकतात, हे ध्यानात घेतले पाहिजे. काश्मीर पर्यटनावर बहिष्कार घालण्यापासून ते पाकिस्तानला मदत करणाऱ्या चीनच्या मालाची खरेदी विक्री रोखण्यापर्यंत अशा विविध प्रकारच्या मागण्या आजही करण्यात येत आहेत. हा हल्ला केला गेला नाही तर देशवासीयांच्या मनात जे निर्माण होईल ते त्यांच्या भावना खच्ची करणारे असलेच पण, त्याचबरोबर काश्मीरच्या बाबतीत जे काही सुरू आहे, त्या प्रयत्नांना खिळ बसविणारेही असेल. इतके होऊनही फारूक अब्दुल्ला म्हणतात की, “तुम्ही काश्मिरी युवकांच्या मनात जे काही सुरू आहे, ते समजून घेतले पाहिजे.”

 
सरकार गेली तीन वर्षे तेच तर करीत आले आहे. आपल्याच राज्यात दगडफेक करून रोजगाराच्या संधी गमावून हा तरुण काय मिळवू इच्छितो, हे अनेकांसाठी अनाकलनीय आहे. हे अनाकलनीय असले तरी दुर्बोध मात्र नक्कीच नाही. पाकिस्तान ही धर्माच्या नावाखाली दहशतवादी निर्माण करणारी मोठी फॅक्टरी झाली आहे. भारताला ज्यादिवशी इस्लामी दहशतवादाची झळ बसली त्याच दिवशी इराणलाही बसली. इराणनेही याच शब्दात पाकला सुनावले आहे. कोणाच्याही एकछत्र अंमलाखाली न राहिलेला हा देश संपूर्ण जगासाठी डोकेदुखी होऊन बसलेला आहे. दोन महासत्तांच्या मांडीवर जाऊन बसल्याने या देशाचे सरळसोट निर्मूलन करणे कोणालाही अवघड होऊन बसले आहे. खुद्द ओसामा बिन लादेनही इथेच दडून बसला होता. काश्मीरमधील फुटीरवाद्यांना पाकिस्तानची फुस आहे. ही फुस कशाच्या आधारावर तर धर्माच्या आधारावर. या काश्मिरी तरुणांना धर्माच्या नावाखाली भडकविण्याचे उद्योग आजचे नाही. मात्र, जिथे राजसत्ता खिळखिळी झाली आहे, दहशतवादी, आयएसआय अशा सत्ताबाह्य शक्तीनीं पाकिस्तान ताब्यात घेतला आहे, त्या देशाबरोबर त्यांचा ‘आझाद काश्मीर’ सुखाने राहू शकतो, हे अत्यंत मूर्खपणे विचार केल्याचे प्रतीक आहे.
 
 
दूरगामी विचार करणारे या तरुणांच्या भावना लक्षात घ्या आणि सबुरीने घ्या, असेच सांगणार. मात्र, उर्वरित देशवासीयांनी या मंडळींना जवानांचे अपमान करताना उघड उघड पाहिले आहे. जवानांना दगड मारणारे काश्मिरी, जवानांना लाथा मारणारे काश्मिरी, जवानांच्या वाहनांवर चालून जाणारे काश्मिरी हेच या देशाचे आजचे वास्तव आहे. संपूर्ण देश आज शोक आणि संतापात बुडालेला असताना या मंडळींकडे सहानुभूतीने कोण आणि कसे पाहणार? भाजपच काय पण काँग्रेसचाही दृष्टिकोन या मंडळींना सोबत ठेवण्याचा होता. पुढचा काळ कठीण असेल आणि सरकारची परीक्षा पाहणाराच असेल. जवानांच्या बसवर जीप नेऊन आदळविणारा दहशतवादी तरुण लष्करी कारवाईत दुखावला होता, असे त्याच्या वडिलांचे म्हणणे आहे. तसे असले तरीही हा तर्क मानण्यासारखा नाही. काश्मिरी जनमानसाची मानसिकता कशी आणि कुठे बहकत गेली आहे, याचेच हे प्रतीक आहे. भारताने मानवतावादी दृष्टिकोनातून विचार केला तरी, ही पिढी पुढच्या काळात काश्मिरात दहशतवादी प्रशिक्षणाचे तळ निर्माण करतील. आज एका भारतीय युवकालाच भारतीय जवानांच्या अंगावर सोडण्यात पाकिस्तानला आलेले यश या काश्मिरी युवकांच्या प्रतिसादाचाच परिणाम आहे, हे विसरून चालणार नाही. एकंदरीतच सरकारची वाटचाल यापुढे धोरणात्मकच असावी लागेल. जम्मू-काश्मीरचा प्रश्न लडाखला बाजूला काढून सोडविण्याचा जो काही प्रयत्न सध्या सुरू आहे, तो दखलपात्र नक्कीच आहे; पण उर्वरित देशवासीय की, जम्मू-काश्मीरची अवाम हाच सरकारसमोरचा सर्वात मोठा पेच असेल.
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/आणिtwitter.com/MTarunBharat

 

 
 
@@AUTHORINFO_V1@@