मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जेएनपीटीच्या शिवस्मारकातील शिव पुतळ्याचे अनावरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Feb-2019
Total Views |



उरण : उरण जवळील दास्थान फाट्यावर जेएनपीटीद्वारे शिवस्मारक संकल्पित करण्यात आले असून त्यातील साठ फूट उंच भव्य शिव पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाहतुक मंत्री नितीन गडकरी आणि अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. ब्राँझ मध्ये बनविलेल्या या शिवशिल्पाचे वजन तीन हजार सातशे किलो आहे. राज्यातील सर्वात मोठ्या शिव स्मारकांपैकी हे एक स्मारक असेल. या शिव पुतळ्याचे शिल्पी दिनकर थोपटे असून प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे यांच्या निर्देशात हे स्मारक तयार होत आहे. अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी ही शिव स्मारकाची संकल्पना मांडली होती. समर्थ रामदास स्वामींचाही पुतळा या स्मारकात असेल.

 

शिव पराक्रमाचे चित्र प्रदर्शन, शिवकालीन किल्ल्यांच्या प्रतिकृती आणि स्व.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्यावरील प्रदर्शन हेदेखील या शिव स्मारकाचे आकर्षण बिंदू असतील. या स्मारकात सात हजार वर्ग मीटरचा बगीचा, आर्ट गॅलरी, भित्तिचित्र प्रदर्शन यासह इतर अनेक वैशिष्ट्ये संकल्पित करण्यात आली आहेत. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केंद्रीय अवजड उद्योगमंत्री शिवसेनेचे अनंत गीते, महाराष्ट्राचे बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खा. श्रीरंग बारणे, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार मनोहर भोईर आणि स्वाध्याय परिवाराचे अप्पासाहेब धर्माधिकारी हे देखील मंचावर उपस्थित होते. कार्यक्रम जवळपास दोन तास उशिरा सुरू झाला तरी लाखोंची गर्दी गडकरींची प्रतीक्षा करीत होती. गडकरी आणि मुख्यमंत्री फडणवीस मुंबईतून कार्यक्रमस्थळी समुद्रमार्गे याच मुंबई - जे.एन.पी.टी. नेव्हीगेशन चॅनेलमधून स्पीडबोटीने उपस्थित झाले.

 

जे.एन.पी.टी. च्या विविध योजनांचा शुभारंभ

 

आज या कार्यक्रमात केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जे.एन.पी.टी. च्या महत्वाच्या योजनांचा शुभारंभ करण्यात आला. त्यात प्रमुख मुंबई जे.एन.पी.टी. नौवहन मार्ग (नेव्हीगेशन चॅनेल) च्या समुद्रात खोलीकरण प्रकल्प आहे. यामुळे या मार्गावर आणि जे.एन.पी.टी. बंदरात अधिक क्षमतेच्या साडे बारा हजार टी. ई. यु. क्षमतेची मालवाहू जहाजे हाताळता येणार आहेत. या प्रकल्पात या मार्गावर समुद्रातलाची खोली १५ मीटरने वाढविण्यात येणार आहे. साहजिकच या प्रकल्पामुळे जे.एन.पी.टी. जगातील पहिल्या ३० मोठ्या बंदरात गणले जाईल. या एका प्रकल्पामुळे जे.एन.पी.टी. बंदराची क्षमता दुप्पट होणार असल्याचे सांगितले जात आहे.

 
एवढी मोठी जहाजे आणि त्यातील अधिकचा माल वेळेत हाताळता यावा म्हणून जे.एन.पी.टी. च्या इतर व्यवस्थांचेही विस्तारीकरण सुरू आहे. त्यामुळे मालवाहू जहाजे लवकर रिकामी करणे आणि निर्यातीच्या मालाने लवकर भरणे वेगवान आणि सोपे होणार आहे. वेळेची बचत हे एक मोठा मुद्दा असेल. त्याचबरोबर जे.एन.पी.टी. सेझ हा महत्वाकांक्षी प्रकल्पही या योजनेत समाविष्ट आहे. मुक्त व्यापार भंडारण क्षेत्र (एस.ई. डब्लू.झेड.) असे नाव असलेल्या या प्रकल्पात अजस्त्र वाखारींच्या माध्यमातून आयात आणि निर्यात माल तात्पुरता साठवून ठेवता येणार आहे. त्यामुळे बंदरात पडून असलेल्या मालाचे नैसर्गिक व अन्य आपत्तीमुळे होणारे संभाव्य नुकसान टळेल. या प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्या स्थानिक नागरिकांना याच प्रकल्पात अथवा जे.एन.पी.टी. च्या इतर प्रकल्पात रोजगार दिला जाईल.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@