विविध खंडांची प्राकृतिक वैशिष्ट्ये

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Feb-2019   
Total Views |



आपणास माहितच आहे की, पृथ्वीचा जवळजवळ ७१ टक्के पृष्ठभाग हा पाण्याने व्यापला आहे. याचाच अर्थ, पृथ्वीचा जवळजवळ २९ टक्के पृष्ठभाग हा जमिनीने व्यापलेला आहे. हा २९ टक्के पृष्ठभाग सात खंडांमध्ये विभागलेला आहे. आपण आता एक एक करून या खंडांची माहिती घेऊ. सर्वात पहिले आपण आशिया खंडाची माहिती घेऊ.

 

आशिया (Asia) खंड हे पृथ्वीवरील सर्वात मोठे खंड आहे. या खंडाने पृथ्वीच्या एकूण भूभागाच्या सुमारे ३० टक्के, तर पृथ्वीच्या एकूण पृष्ठभागाच्या सुमारे ८.७ टक्के भूभाग व्यापला आहे. याचे क्षेत्रफळ सुमारे ४ कोटी, ४० लाख चौरस किलोमीटर आहे. हे खंड पूर्वेला प्रशांत महासागराला, उत्तरेला आर्क्टिक महासागराला, पश्चिमेला युरोप खंडाला, तर दक्षिणेला हिंदी महासागराला जोडलेले आहे. हे खंड जगातले सर्वात तरुण खंड आहे. तसेच, रचनात्मकरीत्या सर्वात गुंतागुंतीचे आहे. खंडाचा बराचसा भाग हा भूकंपशील आहे तसेच, खंडाच्या पूर्व आणि आग्नेय दिशांना समुद्रपृष्ठभागाखालून नवीन बेटे निर्माण होण्याचे कार्य सतत चालू आहे. आशिया खंडाचा पूर्व भाग हा एक सबडक्शन झोन आहे. खरं तर हा भाग प्रशांत अग्निचक्राचा पश्चिम भाग आहे. त्यामुळेच हा भाग फार भूकंपशील असून अनेक सक्रिय ज्वालामुखीही पूर्व किनारपट्टीवर अस्तित्वात आहेत. हे सगळे असतानाच या खंडावर जगातील सर्वात जास्त पर्वतीय वस्तुमान (Mountain Mass) अस्तित्वात आहे. हिमालय (Himalaya), काराकोरम रांग (Karakoram Range), हिंदू कुश (Hindu Kush) यासारखे पर्वत, तसेच शिवालिक (Shivalik) सारख्या टेकड्यांनी या खंडामध्ये भरपूर उंच-सखलपणा आणला आहे. या खंडामध्ये पृथ्वीवरील जमिनीच्या विविध वैशिष्ट्यांचे सगळ्या टोकाचे भाग आहेत. पृथ्वीवरील सर्वात उंचभूभाग (सागरमाथा - सुमारे ८ हजार ८४८ मीटर), तसेच पृथ्वीवरील सर्वात कमी उंचीचा भूभाग (समुद्रसपाटीखाली ४१३ मीटर, मृत समुद्र, इस्रायल), याचबरोबर सर्वात लांब किनारपट्टीही याच खंडात आहे. या सगळ्या रचनात्मक व भूशास्त्रीय वैशिष्ट्यांबरोबरच आशिया खंडामध्ये जीवाश्म इंधनाचे, म्हणजेच खनिज तेल, नैसर्गिक वायू आणि कोळशाचे भरपूर साठे आहेत (मध्य पूर्वेचे आखाती देश). याचबरोबर अनेक खनिजेही मोठ्या प्रमाणात या खंडामध्ये मिळतात. याच कारणामुळे या खंडाचे जागतिक अर्थकारणात फार महत्त्व आहे.


 
 

दुसरे येते ते आफ्रिका (Africa) खंड. हे जगातले दुसरे सर्वात मोठे खंड आहे. पृथ्वीच्या एकूण पृष्ठभागाच्या सुमारे सहा टक्के आणि एकूण भूभागाच्या सुमारे २० टक्के पृष्ठभाग यानेच व्यापला आहे. याचे क्षेत्रफळ सुमारे ३ कोटी, ३० लाख चौरस किलोमीटर आहे. याच्या पूर्वेला हिंदी महासागर, दक्षिणेला हिंदी व अटलांटिक महासागराचा संगम आणि त्याच्या दक्षिणेला अंटार्क्टिका खंड, पश्चिमेला अटलांटिक महासागर, तर उत्तरेला भूमध्य समुद्र आणि त्याच्या उत्तरेला युरोप खंड आहे. मादागास्कर (Madagascar) हे बेटसुद्धा याच खंडात आहे. याचबरोबर अनेक द्वीपसमूहांचाही या खंडात समावेश होतो. हे खंड उत्तर व दक्षिण दोन्ही गोलार्धांमध्ये आहे. हे जगातले एकमेव असे खंड आहे, ज्यातून कर्कवृत्त, विषुववृत्त आणि मकरवृत्त जातात. माऊंट किलिमांजारो (Mt. Kilimanjaro) हा निष्क्रिय ज्वालामुखी आणि आफ्रिका खंडातील सर्वात उंच पर्वत टांझानिया देशात आहे. संपूर्ण खंडाला आफ्रिकन प्लेट ही एकच प्लेट आपल्या कवेत घेते. ही प्लेट आफ्रिका खंडाचा भूभाग तसेच आसपासच्या समुद्राच्याही खाली आहे. भूशास्त्रीयदृष्ट्या अरबीद्वीपकल्प (Arabian Peninsula), इराणमधील झॅगरोस पर्वत (Zagros Mountain) आणि टर्कीमधील आनाटोलियाचे पठार (Anatolian Plateau) यासारखे आफ्रिका खंडात नसलेले भागही आफ्रिका प्लेटवरच आहेत. आफ्रिका खंड हे जगातले सर्वात गरम खंड असून खंडाचा ६० टक्के भाग हा वाळवंट आहे. नैऋत्य दिशेला, म्हणजेच गिनियाच्या आखाताच्या आसपास सॅव्हानाची घनदाट वर्षावने आहेत, तर उत्तर आफ्रिकेमध्ये सहारा वाळवंट नावाचे प्रचंड वाळवंट आहे. माऊंट किलिमांजारो या पर्वतात बर्‍याचशा हिमनद्या आहेत. जगातील पहिले होमो सॅपियन (Homo Sapien) मानव आफ्रिका खंडातच निर्माण झाले. आफ्रिकेत सोने मोठ्या प्रमाणात सापडते. याशिवाय बॉक्साईट, कोबाल्ट, हिरे, फॉस्फेट तसेच प्लॅटिनम गटातील मूलद्रव्येही इथे मिळतात.


 
 

जगातले तिसरे सर्वात मोठे खंड आहे उत्तर अमेरिका खंड, जिथे सध्या मी राहतो. या खंडाचे क्षेत्रफळ सुमारे २ कोटी, ७० लाख किलोमीटर आहे. पूर्वेलाआर्क्टिक महासागर, पूर्वेला अटलांटिक महासागर, दक्षिणेला दक्षिण अमेरिका खंड, पश्चिमेला प्रशांत महासागर, तर उत्तरेला आर्क्टिक महासागर आणि उत्तर ध्रुव आहे. खंडाचा संपूर्ण पश्चिम किनारा हा प्रशांत अग्निचक्राचा पूर्व भाग आहे. म्हणजेच तो सबडक्शन झोन आहे आणि त्यामुळे भूकंपशील असून अनेक ज्वालामुखी पश्चिम किनार्‍याजवळ आहेत. हवाईसारखी बेटे, ज्यांत सक्रिय ज्वालामुखी आहेत, या खंडात आहेत. ‘हॉट स्पॉट व्होलकॅनिझम’ प्रकाराचा ‘येलोस्टोन’ (Yellowstone) हा जगातला एक महाज्वालामुखीही या खंडात आहे. गंमतीची गोष्ट म्हणजे, माझ्या राहण्याच्या जागेपासून हा महाज्वालामुखी जवळच आहे. या खंडात आपेलेशियन, रॉकी पर्वतासारखे प्रचंड आकारात पसरलेले पर्वत आहेत. मिशिगन सरोवरासारखी मोठ्या आकाराची सरोवरे आहेत. ग्रँड कॅनियनसारखी प्रचंड आकाराची खिंडही आहे. कोलोरॅडो, कोलंबिया, मिसुरी, मिसिस्सिपी यासारख्या मोठमोठ्या नद्या आहेत. रचनात्मक वैशिष्ट्ये बाजूला ठेवल्यास या खंडामध्ये खनिजांचे मोठ्या प्रमाणात साठे उपलब्ध आहेत. इथे तांबे, शिसे, युरेनियम, सोने, चांदी यासारख्या अनेक मौल्यवान धातूंचे खनन केले जाते. याशिवाय या खंडामध्ये जीवाश्म इंधनाचेही मोठे साठे आहेत. मेक्सिकोच्या आखातात खनिज तेलाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. २०११ साली याच आखातात ‘डीपवॉटर होरायझन’ (Deepwater Horizon) नावाच्या तेलविहिरीवर फार मोठा अपघात झाला. या अपघातात अमेरिकेतील आजपर्यंतची सर्वात मोठी तेलगळती झाली. तर, आपण जगातील सात पैकी तीन खंडांची वरवर माहिती घेतली. पुढील लेखात आपण बाकीच्या खंडांची वरवर माहिती घेण्याचं आपलं काम पुढे सरकवू.

 

(संदर्भ - https://www.britannica.com/ आणि https://www.wikipedia.org/)

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@