मानवाधिकार कार्यकर्त्यांचा खोटारडेपणा उघड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Feb-2019
Total Views |

मानवाधिकाराला धार्मिक रंग

 

सर्वांना जीवन जगण्याचा अधिकार आहे. मानवावर अत्याचार झाल्यास तसेच त्याच्या अधिकारांवर गदा आल्यास मानवाधिकार कायद्याचा वापर करून पीडितास दिलासा दिला जातो. मानवाधिकारांना जागतिक मान्यता आहे. भारतात मानवाधिकार कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. पण हे ढोंगी कार्यकर्ते सामान्य नागरिकांवर होणार्‍या अत्याचाराविरोधात मानवाधिकार कायद्याचा वापर न करता राष्ट्रघातक शक्तीच्या संरक्षणासाठी करतात, हे वारंवार समोर आले आहे.
दुर्दैवाने बुद्धिजीवी आणि विचारवंत या गोंडस नावाखाली भारतात ते जन्मले आहेत असे लोक या कायद्याचा वापर करताना दिसून येतात.
 
 
जम्मू-काश्मीर हे भारताचे अवघड जागेवरचे दुखणे आहे. कलम ३७० हे या समस्येचे मूळ आहे, असे आता पटायला लागले आहे. भारताची बहुतांश शक्ती ही अनेक दशकांपासून काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी खर्ची पडत आहे.
काश्मीरमध्ये राष्ट्रविरोधी घोषणा दिल्या जातात, आंतरराष्ट्रीय कुख्यात इसिस या दहशतवादी संघटनेचे झेंडे फडकविण्यात येतात. सैनिकांवर दगडफेक केली जाते, तेव्हा कथित मानवाधिकार संरक्षक, बुद्धिजीवी, पुरोगामी आणि वामपंथी कधीही निषेध करताना आढळून येत नाही. परंतु, जेव्हा भारतीय सैन्याने दगडफेक करणार्‍यांवर लाठी चार्ज केला तेव्हा मानवाधिकारवादी, विचारवंत आणि राजकीय पुढारी खडबडून जागे झालेले दिसले.
 
 
मानवाधिकाराच्या आड विकृती
यात मीनाक्षी गांगुली यांनी भारतीय सैनिकांनी केलेल्या लाठी चार्जविरोधात २९ मे २०१८ व १४ जून २०१८ ला मानवाधिकार कायद्याचा वापर करून आक्षेप घेतले, तसे त्यांनी ट्विटरवरसुद्धा प्रसिद्ध केले. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी जून २०१२ मध्ये सिरीयामधील अलहोला येथे झालेल्या नरसंहाराबद्दल दुःख व्यक्त केले आणि युद्धबंदी करावी, असे प्रसिद्धीस दिले. परंतु, या डॉक्टर असलेल्या माजी पंतप्रधानांनी पुलवामा घटनेचा साधा निषेधसुद्धा केला नाही.
 
 
हरदीप पुरी या मानवाधिकार संघटनेचा पदाधिकारी नेहमी चर्चेत राहिला आहे. परंतु सैनिकांवर हल्ले आणि पुलवामा येथे झालेल्या घटनेच्या निषेधासाठी सरसावला नाही.
 
 
सिनेअभिनेतेसुद्धा मागे नाहीत
पाकिस्तानमध्ये गेल्या वर्षी मोठा अपघात झाला होता. यात मृत झालेल्यांच्या वारसांना आर्थिक मदत करण्यासाठी सिनेअभिनेता शाहरूख खान सरसावला. परंतु, भारतामध्ये झालेल्या कोणत्याही आपत्तीमध्ये मदतीसाठी हा अभिनेता कधीही पुढे आलेला दिसत नाही.
 
 
या देशात असहिष्णूता वाढली आहे, असे म्हणणारा अभिनेता अमीर खान याने सैनिकांवर होत असलेल्या दगडफेकीचा कधीही निषेध केल्याचे आढळले नाही.ज्येष्ठ अभिनेता नसिरुद्दीन शहा यांना त्यांच्या मुलाच्या भविष्याची चिंता वाटत असल्याचे त्यांनी सांगितले होते, परंतु, सैनिकांवर होत असलेल्या हल्ल्यांची आणि सैनिकांच्या परिवाराची चिंता त्यांना कधीही वाटली नाही.
 
 
विचारवंतांच्या विचारसरणीवरच प्रश्‍नचिन्ह
देशात विचारवंतांचे पेव फुटले आहे. साहित्यिकांना दाबले जात आहे, असा प्रचार या वर्गाकडून केला जातो. असहिष्णुतेच्या आणि मानवतेच्या गोंडस नावाखाली पुरस्कार वापस करण्याची स्पर्धाच सुरू केली होती. परंतु, सैनिकांचा जीव जातो, त्यांचे परिवार उघडे पडतात, हे या विचारवंतांच्या विचारांच्या कक्षेत येताना दिसत नाही. आतंकवादी किंवा दहशतवादी आणि दगडफेक करणार्‍यांच्या बद्दल हे चकार शब्द बोलताना कधी दिसले नाहीत.
 
 
आतंकवादाला कोणताही रंग, जात, धर्म नसतो. मग मानवतावादी विशिष्ट लोकांसाठी रस्त्यावर का उतरतात? हा प्रश्‍न अशिक्षितांपासून सुशिक्षितांपर्यंत सर्वांना पडला आहे. मानवाधिकाराच्या नावाखाली या देशात थैमान माजविण्याचा शत्रू राष्ट्राचा संकल्प असावा आणि त्यास तडीस नेण्याचे काम अशा घटकांच्या माध्यमातून होत असावे, अशी शंका निर्माण झाल्यास ती अवास्तव ठरणार नाही.
राजकीय पक्षांना मानवाधिकाराचा पुळका
अनेक राजकीय पक्ष राजकारणासाठी राष्ट्रहित चुलीत घालताना दिसतात. आपल्या भाषणात आणि डिबेटमध्ये आतंकवाद किंवा दहशतवाद यावर कधीही भाष्य करताना दिसत नाही. परंतु, दगडफेक करणारे आणि दहशतवादी हे भरकटलेले तरुण असल्याचे वक्तव्य करण्यास मागे-पुढे पाहत नाहीत. जबाबदार लोकप्रतिनिधींना शहीद जवानांपेक्षा हा हल्ला मोदींच्या कारकिर्दीत झाला, याचा आनंद झाला असून त्याचे राजकारण करण्याचीही जणू स्पर्धाच सुरू झाली आहे.
 
 
- निलेश वाणी 
 
@@AUTHORINFO_V1@@