चिनी हुवाईची अमेरिकेला भीती!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Feb-2019
Total Views |

 
 
हे युग इंटरनेटचे आहे. माहितीचे आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाचे कमालीचे महत्त्व क्षणोक्षणी सिद्ध होत असलेल्या या काळात, या तंत्रज्ञानाशी जोडली गेलेली सारीच माणसं आणि त्यांचे विश्व तसे जगासमोर उघडसत्य ठरले आहे. एकदा या तंत्रज्ञानाचा स्वीकार केला रे केला की, कुणीच स्वत:ला जगापासून लपवून ठेवू शकत नाही. तुमचा मोबाईलच तुम्ही आता कुठे आहात, काल कुठे होतात, हे सांगून जातो. आता तर लोकांचे वैयक्तिक विश्वही जगाला कळण्याचे दिवस आहेत. असं म्हणतात की पुढील काळ असा असेल, की तुमच्या घरातला फ्रीज तुम्ही उघडून बघितला आणि त्यात ठेवलेले दूध संपलेले आढळले, तर थोड्याच वेळात तुमच्या मोबाईल फोनवर कुठल्याशा कंपनीच्या दुधाची जाहिरात झळकेल. कारण घरातल्या फ्रीजची प्रणाली तुमच्या मोबाईलशी जोडली गेलेली असेल. एकूण, तुम्हाला कशाची गरज आहे, तुम्ही कुठली गोष्ट विकत घेण्याचा विचार करून इंटरनेटवर ती शोधण्याचा प्रयत्न करीत असाल, तर इतर शंभर कंपन्या, तुम्ही मागणी केलेली नसतानाही, त्यांची त्या प्रकारची उत्पादने घेऊन तुमच्या समोर हजर होतील. त्यांच्या उत्पादनांचा मारा त्यांनी तुमच्या मोबाईल फोनपासून तर फेसबूक पेजपर्यंत सर्वदूर सुरू केलेला असेल. असं म्हणतात की, पुढील काळात एखादी व्यक्ती तिच्या खाजगी मोबाईल फोनवर कोणत्या गोष्टी वारंवार बघते, कुठल्या प्रकारच्या मजकुराचा शोध घेते, याचा अभ्यास करून तिच्यासाठी त्या उपलब्ध करून देणारे तंत्रज्ञान हळूहळू विकसित होत जाणार आहे. अर्थात, त्याची सुरुवात एव्हाना झालीही आहे. कसे कळत असेल कुणाला, आपण आपल्या मोबाईल फोनवर नुकताच कुठल्या उत्पादनाचा शोध घेतला ते? कारण, आपल्या मोबाईल कंपन्या आपली माहिती इतर खाजगी कंपन्यांना विकतात. म्हणनूच मग अनोळखी कंपन्यांकडून कर्जपुरवठ्यापासून तर फ्लॅट उपलब्ध असण्यापर्यंतच्या जाहिरातींचा मारा अगदी थेट फोन करूनही होऊ लागलाय् अलीकडे...
 
 
हा काहीसा त्रासाचा भाग आहे. आपल्या वैयक्तिक स्वातंत्र्याला त्यातून बाधा पोहोचत असल्याचे वास्तवही आहेच. मध्यंतरीच्या काळात गुगलनेदेखील त्याच्या अखत्यारितील डाटा काही खाजगी कंपन्यांना विकल्याचे वृत्त अजून ताजे आहे. गुगलच्या मालक कंपनीचा अध्यक्ष असलेला सर्जी ब्रीन हा मूळ रशियन असला, तरी विद्यमान अमेरिकन शास्त्रज्ञ आणि इंटरनेट क्षेत्रातील व्यावसायिक आहे. वयाच्या सत्तेचाळिसाव्या वर्षात तो जगातल्या तेराव्या क्रमांकाचा श्रीमंत माणूस आहे. कालपर्यंत अमेरिकेने गुगलच्या या उपद्व्यापाला कधी विरोध केल्याचे ऐकिवात नाही. किंवा जागतिक पातळीवरही, थोडीफार आदळआपट करण्यापलीकडे कुणी देश गुगलविरुद्ध उभा ठाकल्याचेही दृश्य कुठे बघायला मिळाले नाही. आपल्या देशाच्या सुरक्षेला यातून धोका उत्पन्न होण्याची शक्यता व्यक्त करीत कुणी गुगलवर बंदी घालण्याची भाषाही बोललेले नाही आजवर. अमेरिकेने त्यावर काही बोलण्याचा तर प्रश्नच नव्हता. पण अलीकडे मात्र, तो देश स्वत:च्या राष्ट्रीय सुरक्षेबाबत अचानक चिंतित झालाय्. अमेरिकेच्या या चिंतेला कारणीभूत ठरली आहे हुवाई नामक एक चिनी कंपनी...
 
 
अमेरिका हा तसा उदारमतवादी देश. सार्या जगावर राज्य करण्याची, किमान सर्वदूर नियंत्रण मिळवण्याची त्याची मनीषा. पण, सध्या हा देश हुवाईच्या संभाव्य दहशतीने पुरता बेजार झाला आहे. त्यामुळे हुवाईला अमेरिकेत व्यवसाय करण्यास बंदी घालण्यापासून जगभरातील इतर देशांनाही तसे करण्यास बाध्य करण्यापर्यंतचे, म्हणजेच दबावतंत्राच्या राजकारणाचे मनसुबे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या मनात आकार घेताहेत. एकीकडे कॅनडीयन सरकारने हुवाईच्या एका वरिष्ठ अधिकार्याला अटक करण्याचा प्रकार असेल किंवा मग अमेरिकन सिनेटसमोर त्या कंपनीच्या अधिकार्यांची झालेली झाडाझडती असेल, हा बलाढ्य देश स्वत:च्या सुरक्षेचा मुद्दा आला की कसा कमालीचा सजग आणि आक्रमक होतो, याचा जगाला नव्याने आलेला हा प्रत्यय आहे. अर्थात, हुवाईवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्याइतपत टोकाला जाणारा अमेरिका हा काही एकमेव देश राहिलेला नाही आता. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ग्रेट ब्रिटन, कॅनडा, जर्मनी, जपान अशा काही देशांनीही याच मार्गाने जाण्याचा निर्णय घेतलाय्. इटलीही त्याच दिशेने जाण्याची शक्यता वर्तविली जात असताना, या कंपनीला सर्वाधिक अपेक्षा असलेल्या भारताची या संदर्भातली भूमिका आता महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
 
 
खरंतर हुवाई ही स्मार्ट फोन्सच्या निर्मितिक्षेत्रात जगभरातील एक नामांकित कंपनी. 5 जी या, इंटरनेटच्या विश्वातील वेगवान तंत्रज्ञानासोबतच पुढील काळातील अत्याधुनिक मोबाईल फोन निर्माण करणारी हुवाई. मागील काळातील सततचे संशोधनकार्य, त्यातून नावीन्यपूर्णतेच्या दिशेने झेप घेण्याची तडफ, प्रचंड गुंतवणूक, समर्पित भावनेने केलेली मेहनत, सचोटी याचा परिणाम म्हणून जगाच्या दोन पावलं पुढे राहण्यात या कंपनीला यश मिळालं. स्थापनेनंतरच्या केवळ 32 वर्षांच्या काळात हुवाई आज सार्या जगात स्वत:चा दबदबा निर्माण करून आहे. फाईव्ह जी, या आगामी काळातील अत्याधुनिक व वेगवान इंटरनेट व्यवस्थेत तर, अपवाद वगळता स्पर्धकांविनाच हुवाईची घोडदौड सुरू राहणार आहे. वैश्विक स्तरावर तिची अनिर्बंध मुशाफिरी असणार आहे. मग आता प्रश्न असा उपस्थित होतो, की या कंपनीने असे नेमके केले, की सार्या जगाला स्वत:च्या सुरक्षेबाबत चिंता वाटावी? तर, या चिंतेचे मूळ चीनच्या एका कायद्यात दडले आहे. 2017 मध्ये तयार करण्यात आलेल्या एका कायद्यानुसार चिनी इंटेलिजन्स विभागाला, तिथल्या कुठल्याही कंपनीला कुठलीही माहिती मागण्याचा अधिकार प्राप्त होतो. या विभागाने मागितलेली कोणतीही माहिती उपलब्ध करून देणे संबंधित कंपन्यांसाठी बंधनकारक आहे. सध्याच्या फोर जीच्या चक्रव्यूहातच डाटा चोरीचे, डाटा विकण्याचे प्रकार आवरण्यापलीकडे गेलेले असताना, फाईव्ह जीच्या विश्वात स्वत:ला या मोबाईलच्या स्वाधीन करणे म्हणजे स्वत:हून स्वत:ची सारी माहिती चीनला उपलब्ध करून देणे अन् त्यायोगे आपणच आपली सुरक्षा त्या देशाकडे गहाण टाकणे ठरणार आहे, हे सजग अमेरिकेला चटकन लक्षात आले. चिनी कायद्यातले खाचखळगे, त्यामागील गनिमी कावेही सहज लक्षात आले. त्यांनी लागलीच कठोर पावलं उचलली. कॅनडात हुवाईच्या वरिष्ठ अधिकार्यावर थेट अटकेची कारवाई झाली, तर अमेरिकन सिनेटने या कंपनीच्या अधिकार्यांना धारेवर धरले. अमेरिकन राजकीय आणि प्रशासनिक नेते फक्त इथेच थांबले नाहीत. त्यांनी जगभरात हुवाईविरुद्ध आरोळी ठोकली. या कंपनीसोबत व्यापार न करण्यास अप्रत्यक्षपणे सार्या विश्वाला सांगणे सुरू केले. आता सारेच या मुद्यावर, त्या दृष्टीने विचार करताहेत.
 
 
हे खरेच की, माहितीच्या युगात ‘डाटा’ अधिक महत्त्वाचा ठरतोय्. तो चोरण्याचे, विकण्याचे प्रकार म्हणूनच मोठ्या प्रमाणात घडताहेत. पण, हुवाईसाठीचे अमेरिकाकृत निर्बंध राष्ट्रीय सुरक्षेला निर्माण होणार्या संभाव्य धोक्याचे कारण पुढे करून घालण्यात आले असले, तरी स्वत:च्या देशातील स्पर्धक कंपन्यांपुढील स्पर्धेची आव्हाने बाद ठरविण्याचा व्यापारी दृष्टिकोनही त्यामागे असण्याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही. तरीही हुवाईच्या माध्यमातून उभ्या ठाकणार्या संभाव्य धोक्याबाबत जगाला सचेत करण्याचा विडा उचलल्यागत अमेरिकेचे वागणे चालले आहे सध्या. आगामी काळातील ‘डाटा वॉर’चा महत्त्वाचा संदर्भ न डावलता तो देश स्वत:चे हित कसे बेमालूमपणे जपतो, हेही शिकण्याजोगे आहे. तर दुसरीकडे, हुवाईचा संस्थापक हा कधीकाळी चीनच्या लष्करात वरिष्ठ अधिकारीपदावर राहिलेला माणूस आहे, हे वास्तवदेखील धोक्याचा गंभीर इशारा देणारे ठरते.
 
 
 
 
या सर्व प्रकरणात आता भारताचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. भारत हे प्रचंड मोठे मार्केट असणार आहे हुवाईसाठी. जितक्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या उत्पादनांची विक्री होईल, धोकेही तेवढेच मोठे अन् गंभीर असणार आहेत. या पार्श्वभूमीवर, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात न माघारता देशहिताचा डिप्लोमॅटिक निर्णय, हीच काळाची गरज असणार आहे भारतासाठी. कारण सध्याच्या डेली हंट, न्यूज डॉग, युसी न्यूज आदी, भारतात मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणार्या अॅप्समधील चिनी कंपन्यांच्या गुंतवणुकीच्या पार्श्वभूमीवर हुवाईचे आव्हान किरकोळ नाहीच तसे...
@@AUTHORINFO_V1@@