पॅरिस करार, अमेरिका आणि हॅरिसन फोर्ड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 

 
 
 
दुबईत झालेल्या एका जागतिक परिषदेत भाषण करताना तो म्हणाला, “माणसाला निसर्गाची गरज आहे, निसर्गाचा विनाश करुन आम्ही पुढच्या पिढ्यांना काय देणार आहोत? पॅरिस करारातून बाहेर पहून पर्यावरण विनाशाची टांगती तलवार दुर्लक्षित करणारे लोक इतिहासाच्या नकारात्मक बाजूला उभे आहेत.” लक्षात घेण्याची गोष्ट आहे ती हॅरिसन फोर्डची या बोलण्यामागची समज. तो काही पटकथा लेखकाने लिहून दिलेला फिल्मी डॉयलॉग नव्हे!
 

आपला अमिताभ बच्चन आणि अमेरिकेचा हॅरिसन फोर्ड यांचा जन्म एकाच वर्षीचा. सन १९४२. अमिताभ जितका लोकप्रिय आहे, तितकाच हॅरिसन फोर्ड अमेरिकेत लोकप्रिय आहे. १९७१ साली अमिताभचा पहिला चित्रपट ‘आनंद’ पडद्यावर आला. तेव्हापासून आजपर्यंतचा त्याचा प्रवास आपल्यासमोरच घडतो आहे. अमिताभचे वडील प्रसिद्ध हिंदी कवी हरिवंशराय बच्चन हे नेहरू घराण्याचे मित्र होते. त्यामुळे अमिताभ आणि इंदिरा गांधींचे मुलगे राजीव व संजय हे मित्र होते. राजीव गांधींच्या कारकीर्दित अमिताभने राजकारणात प्रवेश केला. १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत तो अलाहाबाद मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने निवडूनही आलापरंतु, लवकरच बोफोर्स भ्रष्टाचार प्रकरणाच्या तोफा गर्जू लागल्या आणि अमिताभने राजकीय आखाड्यातून अंग काढून घेतलं. त्यानंतर आतापर्यंत एखाद्या समाजसेवी संस्थेला मदत कर, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याला मदत कर, कोल्हापूरातल्या सुंदर नामक हत्तीचं पालकत्व स्वीकार इत्यादी किरकोळ सामाजिक कामं तो करीत असतो. त्याची पत्नी श्रेष्ठ अभिनेत्री जया भादुरी समाजवादी पक्षातर्फे २००४ पासून राज्यसभेवर खासदार आहे. अभिनेता आणि अभिनेत्री म्हणून त्यांचं श्रेष्ठत्व वादातीत आहे. पण राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या त्यांचं वागणं बोलणं सामान्य आहे. म्हणजे त्यांची राजकारणाची, समाजकारणाची एकंदर जाण, समजूत ही बेताचीच आहे, असं वाटतं.

 

हॅरिसन फोर्ड हा बापाकडून आयरिश आणि आईकडुन रशियन ज्यू वारसा असणारा पक्का अमेरिकन आहे. १९६६ पासून अनेक चित्रपटांत त्याने छोट्या-मोठ्या भूमिका केल्या. पण त्याच्या ‘तकदीर का ताला’ उघडला तो १९७७ साली. त्यावर्षी हॉलीवूडचा प्रतिभावंत निर्माता-दिग्दर्शक जॉर्ज लुकास याने ‘स्टार वॉर्स’ या विज्ञान काल्पनिक (म्हणजे सायन्स फिक्शन किंवा अमेरिकन बोलीभाषेत स्की-फी) चित्रपटाची निर्मिती केली. त्यात हान सोलो या नायकाच्या भूमिकेत हॅरिसन फोर्ड होतास्टार वॉर्स अमेरिकेसह जगभर प्रचंड गाजला. आणि त्याने जॉर्ज लुकासबरोबरच हॅरिसन फोर्डलाही उच्च पदावर नेऊन बसवलं. तेव्हापासून २०१५ पर्यंत स्टार वॉर्स मालिकेतले जेवढे पुढचे भाग आले, त्यात फोर्डच्या हान सोलोने लोकप्रियतेचे उच्चांक गाठले. १९८१ साली निर्माता जॉर्ज लुकास आणि त्याचा दिग्दर्शक मित्र स्टीव्हन स्लिपबर्ग, ज्याला हॉलिवूडचा ‘वंडरबॉय’ असं म्हटलं जातं, त्या दोघांनी मिळून ‘रेडर्स ऑफ द लास्ट आर्क’ नावाचा चित्रपट काढला. प्रोफेसर डॉक्टर इंडियाना जोन्स हा त्या चित्रपटाचा नायक पुरातत्त्व शास्त्रज्ञ असतो. या भूमिकेत पुन्हा एकदा होता हॅरिसन फोर्ड. हा चित्रपटही अमेरिकेसह जगभर प्रचंड गाजला. त्याचेही पुढचे भाग निघत गेले आणि हॅरिसन फोर्ड ही नाममुद्रा हॉलिवुडमध्ये अधिकाधिक दीप्तीमान होत गेली.

 

आज हॅरिसन फोर्ड ७६ वर्षांचा आहे. गडगंज संपत्ती आणि अफाट लोकप्रियतेचा धनी आहे. आतापर्यंत त्याची तीन लग्न झालेली आहेत नि त्याला पाच मुलं आहेत. फरक आहे तो इथून पुढे. हिंदी चित्रपटातले नायक बैलगाडीपासून जंबोजेटपर्यंतचं कोणतंही वाहन लीलया हाताळतात. तसंच तलावारी-भाल्यापासून अत्याधुनिक बंदुका तोफांपर्यंतची कोणतीही हत्यारंदेखील ते लीलया हाताळतात. चित्रपटात सगळंच खोटं असतं, हे त्यांनाही माहित असतं आणि प्रेक्षकांनाही माहित असतं. पण चित्रपटाबाहेर आपल्याला खरीखुरी बंदुक, खरीखुरी नेमबाजी करता यायला हवी, आपण उनाडक्या करीत न फिरता त्यासाठी वेळ द्यायला हवा, असं फक्त एखाद्याच नाना पाटेकरला वाटतं. बाकी कुणालाच वाटत नाही. तिकडे हॅरिसन फोर्ड ‘एअरफोर्स वनया अत्यंत गाजलेल्या चित्रपटात वैमानिकाचं काम करण्यावर थांबला नाही. अमेरिकेच्या वायोमिंग राज्यात जॅकसन इथे त्याच्या स्वतःच्या मालकीची २५०-३५० हेक्टरची रँच म्हणजे शेतमळा आहे. तिथे तो साधं विमान म्हणजे विमानवाहतूक परिभाषेत ज्याला ‘फिक्स्ड् विंग एअरक्राफ्ट’ असं म्हणतात ते आणि चॉपर किंवा हॅलिकॉप्टर अशी दोन्ही वाहनं चालवायला शिकला आणि त्याने त्यांचा रीतसर परवाना घेतलेला आहे. म्हणजे आज तो अमेरिकेचा ‘लायसेन्स्ड् पायलट’ आहे.

 

प्रो. डॉ. इंडियाना जोन्स या पुरातत्त्वशास्त्रज्ञाच्या भूमिकेने फोर्डला उदंड यश दिलं. आपल्याकडच्या डॉक्टर लोकांनी चित्रपट-नाटकात यश मिळाल्यावर डॉक्टरकी सोडून दिली. हॅरिसन फोर्ड उलट ‘आर्किऑलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ अमेरिका’ या अतिशय प्रतिष्ठीत संस्थेचा सक्रीय सभासद झाला. आज तो त्या संस्थेचा एक मान्यवर विश्वस्त आहे. इंडोनेशियन सरकार आपल्या देशातील पुरावशेषांची नीट काळजी घेत नाही, असे तो इंडोनेशियाच्या सांस्कृतिक मंत्र्याला तोंडावर म्हणाला. मंत्री महाशय गरम झाले आणि त्यांनी हॅरिसन फोर्डसह त्याच्या गटाला इंडोनेशियातून हद्दपार करण्याची धमकी दिली. हॅरिसन फोर्ड, दलाई लामा आणि त्यांची तिबेटच्या स्वातंत्र्याची मागणी यांना जाहीर पाठिंबा देतो. ज्या हॉलिवूडने त्याला प्रतिष्ठा आणि पैसा दिला, त्या हॉलिवूडच्या सध्याच्या भंपकपणावर टिका करायला तो कचरत नाही. सध्याचे हॉलिवूड चित्रपट म्हणजे ‘व्हिडिओ गेम्स’ आहेत; मानवी भावभावना, मानवी जीवन त्यात दिसतच नाही, असं तो बेधडक म्हणतो. अमेरिकन राजकारणात दोनच प्रभावी राजकीय पक्ष आहेत. डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन. आपण डेमोक्रॅटिक आहोत, असं हॅरिसन फोर्ड जाहीरपणे सांगतो. आपल्याकडचे कलावंत हे डाव्या पक्षांना आणि त्यामुळे काँग्रेसला धरुन-धरुन असायचे. आजही काही नट-नटी आपण अल्पसंख्याक समाजाचे आहोत म्हणून आपल्यावर अन्याय होतोय वगैरे आवया उठवत असतात. प्रत्यक्षात त्यांना फक्त सत्तेची भाषा कळते. आज ते कुंपणावर आहेत, पण २०१९ ची निवडणुक जर मोदींनी जिंकली (आणि ते जिंकणारच आहेत) तर हेच लोक आपण जन्मजात भगवे असल्याचा बहाणा करीत सत्तेच्या उबेत शिरण्याचा प्रयत्न करतील.

 

हॅरिसन फोर्ड डेमोक्रॅट आहे आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणजेच त्यांचं सरकार हे रिपब्लिकन पक्षाचं आहे. २०१५ सालच्या डिसेंबरमध्ये फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेच्या विद्यमाने एक परिषद भरली होती. जागतिक हवामान बदलामुळे पर्यावरणावर म्हणजेच पर्यायाने मानव जातीवर ओढवणाऱ्या गंभीर संकटाबाबत त्या ठिकाणी विचारविमर्श झाला. हवामानातील बदल हा, माणूस जे कार्बन उत्सर्जन करीत आहे; यात कारखाने, कोळसा उद्योग आणि विविध वाहनं हे सगळंच आलं; त्यामुळे घडत आहे. यात चीनचा वाटा सर्वाधिक म्हणजे २९.५ टक्के इतका आहे. त्या खालोखाल अमेरिकेचा वाटा १४.३ टक्के इतका आहे. त्या खालोखाल युरोपियन महासंघ म्हणजे त्यातील २५ देश, मग भारत, रशिया, जपान अशी क्रमवारी आहे. हे कार्बन उत्सर्जन हळूहळू कमी करत पूर्णपणे कसं थांबवता येईल, यावर विचार होऊन प्रत्येक देशाने आपापली कालमर्यादा सांगितली. म्हणजे आम्ही कोळसा, पेट्रोल, डिझेल इत्यादी प्रदूषक इंधनांचा वापर टप्प्याटप्याने कमी करुन जलविद्युत, सौरविद्युत यांचा वापर कसा वाढवत नेऊ याचा कालबद्ध कार्यक्रम मांडला. त्याबाबत चर्चा होऊन ‘पॅरिस करार’ झाला. त्यावर १९५ देशांच्या प्रतिनिधींनी सह्या केल्या. हा करार करण्यात त्यावेळचे अमेरिकेचे डेमोक्रॅटिक राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा मोठाच पुढाकार होता. २०१६ साली अमेरिकेत सार्वत्रिक निवडणूक झाली. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुक प्रचारातच आपल्या पक्षाला हा करार मान्य नसल्याचं जाहीर केलं. पुढे डोनाल्ड ट्रम्प निवडून आले नि राष्ट्राध्यक्ष झाले. २०१७ सालच्या जूनमध्ये राष्ट्राध्यक्ष म्हणून बोलताना ट्रम्प यांनी जाहीर केलं की, “या कराराप्रमाणे वागायचं ठरवल्यास अमेरिकेची सगळी प्रगतीच मंदावेल.तशी ती मंद व्हावी, अशीच चीनची इच्छा आहे आणि त्यामुळे तो मुद्दाम हवामान बदलाचा बागुलबुवा उभा करीत आहे. पण आमच्या सरकारला हे मान्य नाही आणि त्यामुळे अमेरिका या करारातून बाहेर पडत आहे.”

 

आता बाहेर पडत आहोत असं म्हटलं की, लगेच बाहेर पडता येत नाही. तो आंतरराष्ट्रीय करार आहे. त्यामुळे नोव्हेंबर २०२० पर्यंत अमेरिका अधिकृतपणे कराराला बांधील आहे.गंभत म्हणजे त्याच महिन्यात अमेरिकेची सार्वत्रिक निवडणुक आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचा रिपब्लिकन पक्ष पुन्हा सत्तेवर येतील का, हे माहित नाही. राजकारणाचं काय व्हायचं ते होईल. पण पर्यावरणाचं काय? अमेरिकेची प्रगती मंदावू नये म्हणून कार्बन उत्सर्जन असंच चालू राहिलं तर अखेर मानवजातीचंच अस्तित्व धोक्यात येईल, याचं काय? डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या विरोधी पक्षातील आहेत म्हणून नव्हे तर, त्यांचं धोरण पर्यावरणघातक आहे म्हणून हॅरिसन फोर्डने त्यांच्यावर सरसणीत टीका केली आहे. दुबईत झालेल्या एका जागतिक परिषदेत भाषण करताना तो म्हणाला, “माणसाला निसर्गाची गरज आहे, निसर्गाचा विनाश करुन आम्ही पुढच्या पिढ्यांना काय देणार आहोत? पॅरिस करारातून बाहेर पहून पर्यावरण विनाशाची टांगती तलवार दुर्लक्षित करणारे लोक इतिहासाच्या नकारात्मक बाजूला उभे आहेत.” लक्षात घेण्याची गोष्ट आहे ती हॅरिसन फोर्डची या बोलण्यामागची समज. तो काही पटकथा लेखकाने लिहून दिलेला फिल्मी डॉयलॉग नव्हे!

 
 
@@AUTHORINFO_V1@@