मांजराची मुलायम पावले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Feb-2019   
Total Views |

 

 
 
 
 
आपल्या प्रभावक्षेत्रात काँग्रेस बलशाली होण्यापेक्षा भाजप अधिक ताकदीने निवडून आल्यास हवी आहे. लोकसभेच्या अखेरच्या बैठकीपुर्वी उत्तर प्रदेशात काँग्रेसने प्रियांका गांधींचा नवा पत्ता फेकलेला आहे आणि तो भाजपपेक्षाही आपल्याला त्रासदायक ठरू शकतो, हे ओळखूनच मुलायमसिंग यांनी अखेरच्या भाषणात काँग्रेसला अपशकून केला आहे. ते आशीर्वाद खोटे नसून वास्तविक आहेत. त्यातून मुलायमना आपल्यासारख्या विविध विरोधी पक्षांना सुचवायचे आहे, की आपली रणनिती भाजपच्या विरोधातली असतानाही काँग्रेसला पुरक असता कामा नये. तो अशा छोट्या पक्षांसाठी आत्मघात असेल, असा त्यातला खरा इशारा आहे.
 

असे म्हणतात, की मांजराला कितीही उंचावरून फेकले वा ते आपोआप पडले तरी आपल्या चार पायावर सहज उभे रहाते. त्याला जखमा इजा होत नाही. कारण त्याची पावले कमालीची मुलायम असतात. बहुधा तीच गुणवत्ता उपजत असल्याने यादव घराण्यात पाऊणशे वर्षापुर्वी जन्मलेल्या नेत्याच्या जन्मदात्यांनी त्याचे नाव मुलायम ठेवलेले असावे. कारण गेल्या अर्धशतकात सामान्य कार्यकर्त्यापासून देशातल्या सर्वात मोठ्या राज्याचा प्रभावशाली नेता होताना मुलायमसिंग यादव यांनी नेहमी प्रतिकुल परिस्थितीतही आपल्या पायावर उभे राहून दाखवलेले आहे. जनता दलाची सत्ता असताना अयोध्येत कारसेवकांवर गोळ्या झाडण्यातून रोषाला पात्र झालेले मुलायमसिंग यांनी त्यांच्या कट्टर विरोधक कल्याणसिंग यांच्याशी राजकीय संगत करून दाखवलेली आहे आणि चतुराईने त्याच कल्याणसिंग यांच्यावर मात करण्यासाठी कांशीराम यांना हाताशी धरून भाजपाची सत्ता संपवलेल सुद्धा आहे. तेच मुलायमसिंग नंतर मायावतींचे कट्टर विरोधक म्हणून उभे ठाकले आणि आपल्या मुलाने त्याच त्या मायावतींशी हातमिळवणी केली असतानाही तटस्थपणे बघत राहिलेलेही आहेत. अशा मुलायमसिंगांनी लोकसभेच्या अखेरच्या बैठकीत निरोपाचे भाषण करताना नरेंद्र मोदींचे गुणगान करावे आणि पुन्हा त्यांचीच बहुमताने सत्ता येण्याच्या शुभेच्छा द्याव्यात; याला हसण्यावारी नेता येत नाही. वय झाल्याने मुलायम बरळले असे काहींना वाटले तर नवल नाही. पण डुख ठेवून डावपेच खेळण्यात त्यांच्यासारखा धुर्त राजकारणी अलिकडल्या उत्तर प्रदेशात कोणी झालेला नाही, हेही तितकेच सत्य आहे. असे मुलायम सिंग अकस्मात वा बोलण्याच्या ओघात मोदींना शुभेच्छा देऊन गेले, असा समज म्हणूनच गैरलागू आहे. ती त्यांनी केलेली एक खेळी असू शकते. म्हणूनच त्यात या नेत्याची मुलायम पावले कुठल्या दिशेने पडत आहेत, त्याचा शोध घेण्याला महत्व आहे.

 

२०१२ सालात त्यांच्याच पक्षाने उत्तर प्रदेश विधानसभा जिंकलेली होती आणि अतिशय चतुराईने त्यांनी आपल्या लाडक्या पुत्राच्या हाती सत्तासुत्रे सोपवून महत्वाकांक्षी सख्ख्या भावाला खड्यासारखे बाजूला केले. ते करताना आपल्याकडे कमीपणा घेण्यालाही त्यांनी मागेपुढे बघितले नाही. २०१२ सालात बंगालच्या ममता बॅनर्जी यांचे काँग्रेसशी फिसकटले होते आणि त्यांनी सोनियांना आव्हान देण्यापर्यंत मजल मारलेली होती. त्यासाठी ममता मुलायमच्या घरी पोहोचल्या आणि आपल्या नेहमीच्या शैलीत त्यांनी परस्पर राष्ट्रपतीपदाचा उमेदवार घोषित करून टाकलेला होता. तेवढ्यापुरते पत्रकारांच्या समोर मुलायम यांनीही ममताला दुजोरा दिला आणि पाठ वळली तर विषय संपवून टाकला होता. २००८ मध्ये हेच मुलायमसिंग डाव्यांना मोठा आधार वाटलेले होते. अणूकराराच्या निमीत्ताने डाव्यांना मनमोहन सरकार पाडण्यासाठी घाई झालेली होती आणि त्यांच्या रणनितीमध्ये मुलायमचा पाठींबा गृहीत होता. मात्र, प्रत्यक्ष लोकसभेत बहुमत दाखवायची वेळ आली तेव्हा मुलायम बाजू बदलून काँग्रेसच्या पाठींब्याला उभे राहिलेले होते. नंतरही परकीय गुंतवणूकीचा विषय आल्यावर त्यांनी टिकेची झोड उठवून सभात्यागातून व राज्यसभेत प्रत्यक्ष मतदानातून त्याच प्रस्तावाचे समर्थनही केलेले होते. आपल्या विविध चेहऱ्यापैकी मुलायम कुठला मुखवटा लावून कधी बोलत असतात, ते त्यांच्या निकटवर्तियांनाही समजणार नाही, अशी कायम स्थिती राहिलेली आहे. कधीकाळी अमरसिंग यांच्यामुळे आझमखान मुलायमपासून दुरावले होते आणि नंतर त्याच आझमखानसाठी अमरसिंग बाजूला पडलेले होते. त्यामुळे मुलायमच्या कुठल्या शब्दावर विश्वास ठेवावा आणि कधी त्यात फ़ार काही अर्थ शोधू नये; याचा अंदाज लागू शकत नाही. आपल्याकडे शरद पवार आणि उत्तरप्रदेशात मुलायम सारखेच आहेत. म्हणूनच त्यांनी मोदीच पुन्हा पंतप्रधान संबोधण्यातला अर्थ गहन असू शकतो.

 

मागल्या विधानसभा निवडणूकीत पुत्राने सत्ता टिकवण्यासाठी काँग्रेस व राहुलशी युती केलेली मुलायमना आवडली नव्हती, त्याचेही कारण आहे. मुळातच काँग्रेसच्या पायाचे दगड घेऊन आपल्या पक्षाचा पाया घातलेल्या मुलायमना त्यातला धोका उमजला होता. पण पुत्रानेच पित्याचे ऐकले नाही आणि आता पुन्हा काँग्रेसशी आघाडी नको म्हणून कानाला खडा लावलेला आहे. मायावती वा मुलायम यांचे प्रादेशिक पक्ष उत्तर प्रदेशात काँग्रेसचाच मतांचा गठ्ठा बळकावून बसलेले आहेत. त्यांनी त्याच पक्षाशी युती करणे म्हणजे आपला पायाच काँग्रेसला आंदण देण्यासारखे आहे. हे मुलायम छानपैकी जाणून आहेत. म्हणूनच काँग्रेसचे पुरोगामीत्व त्यांना निवडणूकीतली भागी म्हणून नको असते. निकाल लागल्यावरची आघाडी त्यांना मान्य असते. कारण भाजप हा समोरचा शत्रू आहे आणि काँग्रेस अस्तनीतला निखारा आहे, याची त्या अनुभवी नेत्याला जाण आहे. किंबहुना त्यासाठीच त्यांनी अत्यंत नेमक्या मुहूर्तावर आपले हे आशीर्वाद मोदींना दिलेले आहेत. भाजपने शत्रू म्हणून समाजवादी पक्षाचे जितके नुकसान केलेले नाही, त्यापेक्षा काँग्रेसने आपल्याला अधिक त्रास दिलेला आहे, असे त्यांनी याहीपुर्वी अनेकदा बोलून दाखवलेले आहे. सहाजिकच त्यांना आपल्या प्रभावक्षेत्रात काँग्रेस बलशाली होण्यापेक्षा भाजप अधिक ताकदीने निवडून आल्यास हवी आहे. लोकसभेच्या अखेरच्या बैठकीपुर्वी उत्तर प्रदेशात काँग्रेसने प्रियांका गांधींचा नवा पत्ता फेकलेला आहे आणि तो भाजपपेक्षाही आपल्याला त्रासदायक ठरू शकतो, हे ओळखूनच मुलायमसिंग यांनी अखेरच्या भाषणात काँग्रेसला अपशकून केला आहे. ते आशीर्वाद खोटे नसून वास्तविक आहेत. त्यातून मुलायमना आपल्यासारख्या विविध विरोधी पक्षांना सुचवायचे आहे, की आपली रणनिती भाजपच्या विरोधातली असतानाही काँग्रेसला पुरक असता कामा नये. तो अशा छोट्या पक्षांसाठी आत्मघात असेल, असा त्यातला खरा इशारा आहे.

 

एक गोष्ट निश्चित आहे, आज मुलायम जुन्या आवेशात नसतात. ते थकलेले आहेत आणि पक्षावरही त्यांची हुकूमत पुर्वीसारखी राहिलेली नाही. पण पुत्राला आजसुद्धा पित्याच्याच नावाने मते मागावी लागत असतात. तो आपला सुपुत्र कुठले डावपेच खेळतो आहे, त्याला आपण किंमत देत नाही. आपल्या पाठीराख्या मतदाराने निवड करताना काँग्रेसला झुकते माप जाणार नाही, याची काळजी घ्यावी. त्यापेक्षा नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झालेला चालेल, असाच इशारा त्यांनी दिलेला आहे. समाजवादी मतदार किंवा त्यांच्या तळागाळातील कार्यकर्त्याला तो इशारा नेमका समजतो. त्याच्यासाठीच मुलायमनी हे शब्द उच्चारलेले आहेत. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नम्रतापुर्वक अभिवादन केले यातला गर्भित अर्थ स्पष्ट आहे. ही त्या दोघांची मिलीभगतही असू शकते. कारण मुलायम यांचा संघविरोध वा भाजपविरोध अलिकडला असला तरी हयात काँग्रेसविरोधात गेलेली आहे. ते डॉ. लोहियांचे शिष्य आहेत आणि लोहिया म्हणायचे मोठ्या राक्षसाला संपवण्यासाठी छोट्या राक्षसाला सोबत घ्यावे. तशी भाजपची मदत मुलायमनी यापुर्वी अनेकदा घेतलेली आहे. पण भाजपने मुलायम वा अन्य विरोधकांना संपवण्याचे घातपाती डावपेच कधी खेळले नाहीत. काँग्रेसने ते डावपेच कायम खेळलेले आहेत. अणूकराराच्या वेळी पाठींब्याच्या बदल्यात मनमोहन यांनी मंत्रिमंडळात स्थान देण्याचे मान्य केले होते. पण सोनियांनी त्यांना शब्द पाळू दिला नाही, त्याचा डुख मनात ठेवलेला हा नेता उगाच मोदींना पुन्हा पंतप्रधान होण्याच्या शुभेच्छा देत नसतो. त्यात पडद्यामागचे अनेक डावपेच असू शकतात आणि अशा खेळी मोदीही मोठ्या धुर्तपणे पवारांशीही खेळलेले आहेत. उगाच पवारांनी विधानसभेपुर्वी महाराष्ट्रात आघाडी मोडली होती? मांजराची मुलायम पावले ज्यांना ओळखता येतील, त्यांनाच सोनियांच्या शेजारी बसून मुलायमनी मोदींना दिलेल्या शुभेच्छातला संदेश उमजू शकतो.

 
 
@@AUTHORINFO_V1@@