घरातल्या पाकप्रेम्यांचे काय?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Feb-2019
Total Views |



‘अनेकता में एकता’चा ध्यास घेऊन हजारो वर्षांपासून भारतीयांनी आपला हा वारसा जपला आणि मिरवलाही. पण ज्यांनी आपली बुद्धी देशाबाहेर गहाण टाकत पाकिस्तान्यांपुढे लोटांगणे घातली, त्यांना हे कसे समजणार, कसे जाणवणार? ते पाकिस्तानचेच गोडवे गाणार!! सिद्धूनेही तेच केले.


चाळीसहून अधिक भारतीय सैनिकांच्या चिंधड्या करणाऱ्या दहशतवादी हल्ल्यानंतर अवघा देश बदला घेण्याच्या, संतापाच्या भावनेने पेटून उठलेला असतानाच अस्तनीतल्या निखाऱ्यांनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली. पुलवामातील भीषण हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्या गळाभेटीचे कर्ज डोक्यावर असलेल्या नवज्योतसिंग सिद्धूने दहशतवादाला देश आणि धर्म नसल्याची टिमकी वाजवली. आपल्या देशात कोणताही दहशतवादी हल्ला झाला की, भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याची स्पर्धा ‘मातृभूमीशी प्रामाणिक असले काय अन नसले काय’चा कृतघ्नपणा करणाऱ्यांकडून सुरू होते. स्वदेशाऐवजी, हुतात्म्यांऐवजी, भारतीयांऐवजी असल्या लोकांना पाकिस्तानचाच पुळका येताना दिसतो. सुरुवातीला दहशतवादाचा ‘आम्ही निषेध करतो’चे एखादे वाक्य फेकायचे आणि नंतर मात्र ‘पाकप्रेमा’चे जाहीर प्रदर्शन मांडायचे चाळे ही मंडळी नेहमीच करतात. नवज्योतसिंग सिद्धूनेही कॉमेडी शोमधून दात विचकायचे अन् टाळ्या वाजवण्याचे काम करता करता पाकिस्तानचे कौतुक करण्याचा मार्ग चोखाळला. भाजपमध्ये अशी काही संधी नसल्याने मग सिद्धूने आम आदमी पक्षापासून ते काँग्रेसचा हात हातात घेण्यापर्यंतचाही प्रवास केला. अर्थात, हे दोन्ही पक्ष आपल्यासारखाच विचार करणारे असल्याचा साक्षात्कार झाल्यानेच सिद्धूने हे केले असावे. आप आणि काँग्रेसचे खेटे घातलेल्या या इसमाने दरम्यानच्या काळात दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकच्या नापाक भूमीवर आपल्या पावलांचे ठसे उमटवण्याचेही उद्योग केले.

 

इमरान खानच्या पंतप्रधानकीच्या शपथविधीला गेलेल्या सिद्धूने शांततेची कबुतरे उडवण्याची नौटंकी करत पाकिस्तानसारखा देश नसल्याचे म्हटले. अर्थात सिद्धूचे म्हणणे एकादृष्टीने बरोबरच आहे की, कारण दहशतवादाला रसदपुरवठा करुनही, दहशतवाद्यांना आपल्या भूमीचा वापर करायला देऊनही, दहशतवादी हल्ले करूनही नामानिराळे राहण्याचा, स्वतःलाच दहशतवादाचा बळी म्हणवण्याचा निर्लज्जपणा बाणवलेला पाकिस्तानसारखा देश जगाच्या पाठीवर अन्यत्र कुठे असेल, म्हणा? अन् अशा उलट्या बोंबा मारणाऱ्या देशाच्या पंतप्रधानाला, लष्करप्रमुखाला कवटाळणार कोण, तर सिद्धू!! पाकव्याप्त काश्मीरच्या कथित पंतप्रधानाच्या मांडीला मांडी लावून बसणार कोण, तर सिद्धू!! धारातीर्थी पडणाऱ्या सैनिकांचा अवमान करत दहशतवादाचा कोणताही देश नसल्याचे तारे तोडणार कोण, तर सिद्धू!! दुसरीकडे पाकिस्तानचे नाव काढले की हळव्या होणाऱ्या नवज्योतसिंग सिद्धूला फुटणारे उमाळे काही आजचेच नाहीत. २०१८ सालच्या ऑक्टोबरमध्येही हिमाचल प्रदेशातील लिटरेचर फेस्टिव्हलवेळी सिद्धूने पाकिस्तानवर स्तुतिसुमने उधळण्याची कामगिरी केलीच होती. सिद्धूने “दक्षिण भारतात गेलो वा तिथल्या शहरांत-गावांत फिरलो की, भाषेपासून खानपानापर्यंत प्रत्येकच गोष्ट बदलते,” असे म्हणत पाकिस्तानात मात्र असे काही होत नसल्याचे उद्गार काढले होते. वस्तुतः भारतीयत्व अंगात मुरलेल्या प्रत्येकालाच इथल्या सामाजिक, सांस्कृतिक वैविध्याची पुरेशी जाण आहे. ‘अनेकता में एकता’चा ध्यास घेऊन हजारो वर्षांपासून भारतीयांनी आपला हा वारसा जपला आणि मिरवलाही. पण ज्यांनी आपली बुद्धी देशाबाहेर गहाण टाकत पाकिस्तान्यांपुढे लोटांगणे घातली, त्यांना हे कसे समजणार, कसे जाणवणार? ते पाकिस्तानचेच गोडवे गाणार!! सिद्धूनेही तेच केले. पण आपल्या असल्याच कृत्यांमुळे तमाम देशवासीयांच्या मनातून आपण उतरत चालल्याचे सिद्धूला खरेच का कळत नसेल? की कळत असूनही पाकिस्तानकडून वा अन्यत्र कुठूनतरी अर्थपूर्ण संबंध जपले जात असल्याने इथल्या जनतेच्या भावनांनाही वाऱ्यावर सोडण्याची हिंमत सिद्धूसारखी बांडगुळे करत असावीत? तसेच जर असेल तर ही मंडळी जिथे जातील तिथे भारतीयांच्या तिरस्काराला, घृणेला, रोषाला बळी पडले, तर ती त्यांचीच जबाबदारी असेल!! कारण, इथे स्वार्थाला सर्वोपरी मानणाऱ्यांपेक्षा राष्ट्राला सर्वोपरी मानणाऱ्या सुपुत्रांचाच जयजयकार होतो, सिद्धूसारख्यांचा नव्हे!!

 

पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर १२५ कोटी भारतीय शोकसागरात बुडालेले असताना किडक्या प्रवृत्तीच्या लोकांनी झाल्या घटनेतून राजकीय डाव साधता येईल का, असा विचार केला. भारतीय राजकारणात ५० वर्षांपासून सक्रिय असलेल्या आणि एकेकाळी संरक्षणमंत्रिपद भूषवलेल्या शरद पवारांनी, देशाचे रक्षण करण्यात ५६ इंची छाती असलेल्या पंतप्रधानांना अपयश आल्याची टीका केली. शरद पवारांसारख्या अनुभवी माणसाने खरे म्हणजे आपल्या ज्येष्ठपणाचा, पोक्तपणाचा परिचय करून देत अशा आणीबाणीच्या प्रसंगी केंद्र सरकारच्या पाठीशी उभे राहण्याची भाषा करायला हवी होती. पण गेल्या साडेचार वर्षांपासून सत्ता नसल्याने पाण्याविना तडफडणाऱ्या माशासारखी अवस्था झालेल्या पवारांना राजकारण करण्याचा मोह कसा आवरेल? परिणामी, पवारांनी मोदींवर टीका करण्याचाच मार्ग पत्करला. हे पवारांनीच केले असेही नाही, तर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही, “आता ५६ इंची छाती फुगवून उत्तर देणार का,” अशी विचारणा केली. जिंदमधल्या पराभवाने विचित्र मनस्थिती झालेल्या रणदीप सुरजेवालांना दहशतवादी हल्ल्याचेही गांभीर्य राहिले नसल्याचेच यावरून स्पष्ट होते. पवार वा सुरजेवालांच्याही पुढे जात खरा कहर केला तो मुंब्र्याच्या गल्लीत उनाडक्या करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाडांनी. आपला दाढी कुरवाळण्याचा अजेंडा पुढे चालवत आव्हाडांनी, पुलवामातील हल्ला मुस्लीमविरोधी राजकारणाचा परिपाक असल्याची तोंडपट्टी केली. एकीकडे ‘दहशतवादाला धर्म नसतो’चे पालुपद लावायचे आणि दुसऱ्या बाजूला स्वत:च मुस्लिमांचा संबंध अशा हल्ल्यांशी लावायचा, हे कसले लक्षण? म्हणजे यांना वीरांची, वीरमातांची, वीरपत्नींची वा देशाची चिंता नाही, तर मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतांची काळजी. आपण जिथे राहतो, तिथेच घाण करणारी ही मंडळी देशाच्या राजकारणात, समाजकारणात काही एक स्थान राखून असतील तोपर्यंत बाह्य शत्रुंची गरज ती काय, हा प्रश्नही त्यामुळे निर्माण होतो. म्हणूनच परक्या भूमीतील दुश्मनांसह मायभूमीतल्या देशविरोधकांनाही धडा शिकवण्याची मागणी जनतेमधून होते. अर्थात, जनता आपल्या हाती असलेल्या मतदानाच्या अस्त्राचा वापर करून ते करतेही आणि करेलही, हे निश्चित!!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@