पाकला पहिला दणका; मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढला!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Feb-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : पुलवामा येथील सीआरपीएफच्या ताफ्यावरील हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला पहिला दणका दिला आहे. भारताने पाकिस्तानला मोस्ट फेवर्ड नेशनचा दिलेला दर्जा काढून घेतला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रीमंडळ व सुरक्षा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच भारत राजनैतिक पातळीवर पाकिस्तानवर बहिष्कार टाकणार असल्याचेही ते म्हणाले.

 

काय आहे मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा?

 

मोस्ट फेवर्ड नेशन म्हणजे व्यापारासाठी सर्वात महत्त्वाचा देश असा होतो. आंतरराष्ट्रीय व्‍यापार संघटना आणि आंतररष्ट्रीय ट्रेड नियमांच्या आधारावर हा दर्जा दिला जातो. यामध्ये मोस्ट फेवर्ड नेशन दर्जा मिळालेल्या देशाला व्यापारासंबंधित फायदा मिळतो. कमी किंमत व व्यापार संबंध वाढविण्यासाठी मदत केली जाते. तसेच आयात-निर्यातमध्ये विशेष सूट मिळते तसेच असा दर्जा असणाऱ्या देशाकडून सर्वात कमी आयात शुल्क आकारले जाते. जागतिक व्यापार संघटनाचा सदस्य बनल्यानंतर भारताने पाकिस्तानला १९९६ मध्ये एमएफएनचा दर्जा दिला होता.

 

भाजपचे परराष्ट्र विभाग प्रमुख विजय चौथाईवाले दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना म्हणाले, "भारताने पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढल्याने याचे थेट परिणाम पाकिस्तानवर होणार आहेत. यात पाकिस्तानचे नुकसानच होणार असून भारतात आयात होणाऱ्या पाकिस्तानी मालावर आता अधिकचा कर लादला जाईल. तसेच आयात होणाऱ्या मालाची विविध टप्प्यावर कडक चौकशी केली जाईल. यामुळे पाकिस्तानला भारताशी व्यापार करताना अडचणी निर्माण होणार आहेत." या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नुकसान होऊ शकते का? असा प्रश्न चौथाईवाले यांना विचारला असता ते म्हणाले, "सर्वच देशांनी भारताला पाठिंबा दर्शवला आहे. यामुळे भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे कोणतेही नुकसान होणार नाही."

 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@