‘म’नसे भूमिका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



आगामी काळातलं मनसेचं भविष्य काय आणि नेतृत्व कोण हा त्यांच्यासमोरचा कळीचा मुद्दा. राज ठाकरे यांच्याशिवाय पक्षाला प्रभावी नेतृत्व नाही. त्यातच राज यांची भूमिका, कार्यकर्त्यांशी असलेले संबंध याचा अंदाजही नक्की येत नाही. मित्र पक्ष कोण, कोणाला जवळ करायचं कोणाला लांब करायचं याचं उत्तरदेखील मनसेला सापडताना दिसत नाही.


निवडणुका म्हटल्या की विभिन्न राजकीय पक्षांच्या, त्यांच्या नेत्यांच्या भूमिका आल्याच. त्यात एक प्रादेशिक पक्ष म्हटला, तर त्याची नाळ ही त्या ठिकाणच्या प्रश्नांशी, नागरिकांशी जोडलेली असतेच. आज अशी अनेक राज्य आहेत, ज्या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांची सत्ता तर आहेच पण, देशपातळीवरील नेतृत्वातही त्यांना स्थान आहे. राज्यातल्या शिवसेनेसारख्या पक्षाला स्वबळाच्या फक्त दबक्या डरकाळ्या फोडता येतात, हे या गेल्या काही महिन्यांमध्ये दिसून आलंच. त्यात गेल्या अनेक वर्षांच्या राजकारणानंतरही राज्यात स्वबळावर सत्ता न येणं आणि त्यातही देशात पंतप्रधान हवा असेल, तर राज्यात मुख्यमंत्री आमचाच असं म्हणत फिरणं आणि दुसरीकडे काहीही झालं तरी, स्वबळावर लढण्याच्या बाता मारणं अशा दुहेरी भूमिकेत शिवसेनेसारखा पक्ष सापडला आहे. आपली भूमिका स्पष्ट करणं हे ना त्यांच्या प्रवक्त्यांना जमलं ना साहेबांना. त्यातच त्यांच्यामधून फुटून तयार झालेला पक्ष तरी कसा मागेल राहील, म्हणा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे त्यातूनच निघालेलं पिल्लू असल्यामुळे साहजिकच विचारसरणी म्हणा किंवा भूमिका म्हणा या सारख्याच असणार. आगामी निवडणुकांमध्ये मनसेची भूमिका काय असेल, याबाबत आज मनसेमध्येही संभ्रम असेल असं म्हटलं तरी, वावगं ठरू नये. एकेकाळी आपले मित्र असल्याचे म्हणणारे पक्षाध्यक्ष अचानक मित्राला शत्रू मानू लागलेत. त्यांच्या इतर पक्षांबद्दलच्या भूमिकेतही सातत्य दिसून येत नाही. शिवसेनेशी त्यांचे वाद हे पूर्वीपासूनच आहेत. त्यातच मनसेबाबत दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या पक्षात ‘वन अ‍ॅण्ड ओनली’ असलेले ‘राज.’ त्यांच्या व्यतिरिक्त आज मनसेमध्ये अन्य कोणतं प्रभावी नेतृत्व आहे, असंही म्हणता येणार नाही. त्यातच त्यांची भूमिका, कार्यकर्त्यांशी असलेले संबंध याबाबत काही तर्क-वितर्क न लावलेलेच बरे. शिवसेनेचे पूर्वीच्या काळी असलेले मुद्दे, अगदी त्यांच्यासारखीच ‘खळ्ळखट्याक’ पद्धतीची कार्यशैली यामुळेच आज मनसेसारखा पक्ष लोकांच्या मनात बसला आहे. परंतु, लोकांच्या मनात असतानाही सत्तेच्या जवळ आपण का नाही, हीदेखील त्यांच्या पक्ष नेतृत्वाला विचार करायला लावणारी बाब आहेच.

 

नव्या महाराष्ट्राचं निर्माण करणारी अशी ही नवनिर्माण सेना असंच सर्वांकडून म्हटलं जायचं. पण या नवनिर्माणाचा अर्थ खुद्द पक्षाध्यक्षांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना अद्यापही उमगलेला नाही. केवळ मराठी माणूस यापासून त्यांचा प्रवास सुरू झाला आणि त्याच ठिकाणी येऊन थांबला. मराठी आणि अमराठी उत्तर भारतीय हा वाद मनसेची कायमच मुख्य भूमिका राहिला आहे. अमराठी जनतेला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या लक्ष्य करणे, हा त्यांचा सातत्य ठेवून केलेलाच कार्यक्रम. पण आता अस्तित्वाच्या लढाईत मागे पडत चाललेल्या मनसेच्या याही भूमिकेला बगल देणार्या काही गोष्टी गेल्या काही महिन्यांमध्ये घडल्या आणि अद्यापही घडत आहेतच. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मनसेच्या इशार्‍यानंतर नयनतारा सहगल यांना बाजूला करण्यात आलं. त्यानंतर पक्षाध्यक्षांनी याबाबत एक खुलासा करत आपला सहगल यांना विरोध नसून मराठीच्या प्रेमी म्हणून आपण त्यांचा आदर करतो, असे म्हटले. इतकंच काय, तर आपल्या महाराष्ट्र सैनिकांनीही घटनेचे गांभीर्य पाहून राज ठाकरे यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा, असं म्हटलं. आता या खुलाशांचा अर्थ महाराष्ट्र सैनिकांनी आणि सामान्यांनी कसा घ्यायचा, हे ज्याचं त्यालाच कळायंला हवं. त्यातच दुसरी एक घटना घडली ती म्हणजे उत्तर भारतीय लोकांच्या एका कार्यक्रमात राज ठाकरे यांनी हिंदीतूनच केलेले भाषण. यानंतर मराठी भाषेसाठी आग्रही असलेले अनेकदा हिंदी, इंग्रजी माध्यमांनाही मराठीतूनच मुलाखत दिलेले राज यांची भूमिका अचानक बदलू कशी लागली, हा प्रश्न येतोच. मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक असलेल्या मनसेने अनेकदा मुंबईत मराठी पाट्यांचा मुद्दाही उचलला. आंदोलनं झाली. काही ठिकाणी यशही मिळालं. पण यामध्ये जे सातत्य हवं ते मात्र कमी होत गेलं. निवडणुका आल्या की, पुन्हा एकदा मराठी माणूस, मराठी पाट्यांचा मुद्दा ऐरणीवर येतो आणि हळूहळू पुन्हा एकदा बासनात गुंडाळून ठेवला जातो.

 

गेल्या निवडणुकांमध्ये मनसेने जाहीररित्या भाजपला किंबहुना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला होता. मात्र, आता तोच पक्ष आणि तिच व्यक्ती आज मनसे अध्यक्षांना नकोशी झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी हे चोर आहेत, अशी ओरड करणारे राज आज त्याच पक्षांशी आपला संसार थाटण्याच्या विचारात आहेत. ‘राज’कारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नाही आणि कोणीच कोणाचा कायमचा मित्रही नाही, हे यावरून पुन्हा एकदा सिद्ध होतंच. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार असतील किंवा काँग्रेस पक्षाचे काही ज्येष्ठ नेते असतील त्यांच्या राज यांच्याशी सुरू असलेल्या भेटीगाठी आणि महाआघाडीत सामिल करून घेण्यासाठी सुरू असलेल्या चर्चा या याचेच द्योतक आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसारख्या पक्षांमध्ये उत्तर भारतीय लोकांची संख्याही अधिक असताना त्यांच्याशी मनसे किंवा ते मनसेशी कसं सूत जुळवून घेणार, हे वेळच ठरवेल. आज मनसेची असलेली प्रतिमा किंवा मधल्या काळात मनसेला लागलेलं ग्रहण, पक्षाध्यक्षांचा कार्यकर्ते, नेते यांच्याशी तुटलेला संबंध पुन्हा जुळणं सध्या त्यांच्या गळ्याशी आलंय. पक्ष स्थापनेनंतर लगेचच राज्याच्या जनतेने त्यांना विधानसभेत जाण्याची दिलेली संधी, त्यांच्यावर ठेवलेला विश्वास हा हळूहळू कमी होत गेला आणि आज एखाद्या मतदारसंघात उभा करण्यास उमेदवारही मिळू नये, अशा स्थितीत हा पक्ष पोहोचला आहे. मुंबई महानगरपालिकेतही २०१२ च्या तुलनेत २०१७ मध्ये मनसेला मिळालेल्या मतांचा टक्का हा अर्ध्याहून अधिक कमी झाला. ठाणे, पुणे, औरंगाबादमध्ये जागाही कमी झाल्या, तर नाशिक महानगरपालिकेतील सत्ताही मनसेला गमवावी लागली होती. त्यामुळे आज मराठी माणूस किती प्रमाणात मनसेच्या सोबत उभा आहे आणि त्यांचा किती विश्वास मनसेवर शिल्लक आहे, हा प्रश्न उपस्थित होतोच.

 

आगामी काळातलं मनसेचं भविष्य काय आणि नेतृत्व कोण हा त्यांच्यासमोरचा कळीचा मुद्दा. राज ठाकरे यांच्याशिवाय पक्षाला प्रभावी नेतृत्व नाही. त्यातच राज यांची भूमिका, कार्यकर्त्यांशी असलेले संबंध याचा अंदाजही नक्की येत नाही. मध्यंतरीच्या काळात राज यांचे पुत्र अमित ठाकरे हे राजकारणात सक्रिय होताना दिसले होते. मात्र, आता पुन्हा त्या दृष्टीने प्रयत्न झालेले दिसत नाहीत. त्यातच आता त्यांची नेमकी भूमिका काय असेल याबाबतही संभ्रम आहेच. मित्र पक्ष कोण, कोणाला जवळ करायचं कोणाला लांब करायचं याचं उत्तरदेखील मनसेला सापडताना दिसत नाही. कधी बिनशर्त शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या गोष्टी करायच्या, तर कधी त्यांच्या भूमिकेबद्दल संशय घ्यायचा, कधी काँग्रेस-राष्ट्रवादीवर आरोप करायचे, तर कधी महाआघाडीसाठी त्यांच्यासोबत जाण्याचा विचार करायचा, अशी दुटप्पी भूमिका सध्या मनसे गाजवत आहे. राज आणि शरद पवार यांचे संबंध तसे चांगलेच आहेत. पण त्यांना महाआघाडीत घेण्याचा विचार नसल्याचे पवार म्हणाले होते. पण पवार जे बोलतात ते करत नाहीत आणि जे बोलत नाही ते करतात, त्यांच्याही अशा भूमिकेमुळे मनसेचा मधला कावळा झाला नाही, तर देव पावला असंच त्यांना म्हणावं लागेल. पण सध्या सामान्यांच्या अपेक्षा या केवळ मराठीपुरत्या नसून त्या त्या पलीकडच्या आहेत हे त्या पक्षाला जाणून घ्यावं लागणार आहे आणि आपली एक स्पष्ट भूमिकाही ठरवावी लागणार, ही काळाची गरजच आहे. पण सध्या पक्षाच्या विचारांमध्ये आणि भूमिकेमध्ये स्थिरता आणि व्यापकता येणं आवश्यक आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@