इतकी मस्ती बरी नाही!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Feb-2019
Total Views |

 


 
 
 
बारामतीत लावलेले बॅनर हे वास्तवापासून दूर गेलेल्या कार्यकर्त्यांच्या मस्तीचे लक्षण. अर्थात, बारामतीतल्याच नव्हे तर राज्यातल्या मतदारांनाही कोणाची मस्ती कशी उतरवायची, हे चांगलेच कळते. अन् ही गोष्ट राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही लक्षात घेतलेली बरी, कारण इतकी मस्ती बरी नाही!
 

राष्ट्रीय राजकारणातला अर्धशतकीय अनुभव गाठीशी असतानाही बारामतीव्यतिरिक्त अपवाद वगळता कुठेही चांगल्या कामासाठी नाव न घेतले जाणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे शरद पवार! नुकतीच भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी पुण्यातल्या कार्यकर्ता मेळाव्यात पवारांच्या याच बारामतीसम्राटपदाला आव्हान दिले आणि तिथे आगामी ‘लोकसभा निवडणुकीत कमळच फुलणार’ असा विश्वास व्यक्त केला. तद्नंतर अमित शाह यांच्या इशाऱ्याने तंतरलेल्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे वा पवारांचे नाव न घेता समस्त बारामतीकरांचा ठेका घेतल्याच्या आविर्भावात बॅनरबाजी सुरू केली. ‘बारामतीत गोडसेचा पुनर्जन्म होणार नाही, बारामतीत कमळ कधीच फुलणार नाही,’ अशा शब्दात साहेबांच्या मर्जीतल्यांनी मनातली खदखद बाहेर काढली. पण बॅनरबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जीवावर निवडणूक जिंकता येत नाही तर जनतेची कामे करणाऱ्यांच्याच बळावर यशस्वी होता येते, हे ‘पवार अ‍ॅण्ड कंपनी’ला ठाऊक नसावे. तसे जर असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसने दोन खासदारांपासून २८२ खासदारांपर्यंत झेप घेणाऱ्या भाजप अन् कार्यकर्त्यांकडून नक्कीच काहीतरी शिकावे. कारण, गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत सत्तेतल्या भ्रष्टाचाराबरोबरच कार्यकर्त्यांच्या अन् गढी-गडवाल्यांच्या ‘असल्या’ उचापत्यांमुळेच घड्याळाचे काटे उलटे फिरले. जवळपास १५ वर्षे सत्ता भोगलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था अतिशय दारुण झाली. सत्ता गाजवण्यासाठीच आपला जन्म झाल्याच्या अहंगंडांत वावरणाऱ्यांना जनतेच्या मनातली स्वतःची जागाही समजली.

 

वस्तुतः याला शरद पवारांचे राजकारणही तितकेच जबाबदार असल्याचे लक्षात येते. राज्यातल्या मालदार ठिकाणी आपल्याला मानणारा मनसबदार उभा करायचा, त्याने काहीही केले तरी, त्याला पाठीशी घालायचे, सत्तास्वार्थासाठी वेड्यावाकड्या चाली चालायच्या, धर्मनिरपेक्षतेचा जप करत जातीयवादाचा अजेंडा राबवायचा हा पवारांचा राजकारणातला गुणावगुण. अर्थात, अशा खेळ्यांनी पवारांना मागे मागे फिरणाऱ्या नेत्या-कार्यकर्त्यांचे टोळके तर उभे करता आले पण ,जनतेच्या आशा-आकांक्षांना मात्र पूर्ण करता आले नाही. परिणामी २०१४ च्या लोकसभा निवडणुकांत पवारांच्या कंपुतल्या सगळ्याच जहागिरदारांची संस्थाने खालसा झाली, बॅनरबाजीला लोककल्याणकारी कार्य समजणाऱ्यांना अद्दल घडली. इतकेच नव्हे, तर स्वतःचाबालेकिल्ला वगैरे म्हणवल्या जाणाऱ्या मतदारसंघातही कन्या सुप्रिया सुळेंना निवडून आणताना शरद पवारांना धाप लागली. केवळ ७० हजार मतांच्या फरकाने सुप्रिया सुळे विजयी झाल्या. खरे म्हणजे यामुळे तीन-चार लाखांच्या मोठमोठ्या आकड्यांच्या खेळात रमणारे विजयी होऊनही पराभूत तर पराभूत होऊनही महादेव जानकर विजयी ठरले. कारण, लाखोंत खेळणाऱ्यांपुढे हजार-पाचशेची बढत ही तशी चिल्लरच ना! पण हे झाले कधी तर ज्यावेळी भाजप व मित्रपक्ष सत्तेत नव्हते तेव्हा. पण आता मात्र तशी स्थिती नाही, तर यंदा शरद पवारांना सत्तेत राहून स्वहिताची नव्हे ,तर जनहिताची कामे करून लोकांच्या मनात घर करणाऱ्या भाजपला तोंड द्यायचेय. अशा परिस्थितीत विकासाचे कोणतेही मुद्दे नसल्याने ही मंडळी कालबाह्य गोष्टींचाच आधार घेणार. कदाचित आपले बुडते होडके असल्या काड्यांनी तरेल, असेही त्यांना वाटत असावे. म्हणूनच छगन भुजबळ मनुस्मृती दहनाचे कार्यक्रम हाती घेतात, तर बारामतीतले कार्यकर्ते गोडसेला जीवंत करतात.

 

देशाचे नेतृत्व करण्यासाठी तळमळणाऱ्यांना बॅनरबाजी करत घरातली जागा वाचवण्याची वेळ यावी, ही जशी दुर्दैवी तशीच आत्मपरिक्षण करण्याजोगी गोष्ट. अन् यासाठी केला जाणारा गोडसेच्या नावाचा वापर तर राष्ट्रवादी काँग्रेस वा पक्षाच्या कार्यकर्त्यांची किती वाजली असेल, त्याचीच साक्ष देणारा. बारामतीत ठिकठिकाणी लावलेल्या या बॅनरवरून भाजपला गोडसेवादी ठरवण्याची कसरत पवारांचे निष्ठावान कार्यकर्ते करत असल्याचे दिसते. पण भाजपने कधीही गांधीहत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे समर्थन केले नाही. उलट गेल्या साडेचार वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महात्मा गांधींचेच स्वच्छतेचे, देशाला स्वावलंबी करण्याचे, ग्रामविकासाचे कार्य केले. परिणामी, आतापर्यंत धरण भरण्याचे निराळेच कौशल्य कमावलेल्या पुतण्याला, काकांना अन् कार्यकर्त्यांनाही ‘आपले कसे होणार’च्या भीतीने पछाडले. गोडसेचा संबंध भाजपशी लावणे, हे त्याचेच लक्षण. दुसरीकडे असली बॅनरबाजी करून या लोकांना नेमके काय सुचवायचे आहे? देशभरात भाजपचे २८२ खासदार निवडून आले तिथे तिथे गोडसेचा पुनर्जन्म झाला होता काय? भाजपच्या पारड्यात मतांचे दान टाकणारे सगळेच गोडसेवादी होते काय? तसे तर नाहीच, पण असलेच तर विधानसभा निवडणुकानंतर शरद पवारांनी भाजपला दिलेला पाठिंबाही गोडसेवादीच होता काय? सोबतच देवा-धर्माशी निगडित श्रद्धा वा अंधश्रद्धांना न मानणारे साहेबांचे कार्यकर्ते पुनर्जन्म कसा काय मानतात? असे अनेक प्रश्न उभे राहतात. अर्थातच गांधींचे नाव घेत गांधींचाच वैचारिक खून करणाऱ्यांकडे या प्रश्नांची उत्तरे नसतीलच.

 

हे झाले गोडसेचे, पण हे बॅनर लावण्याची वेळ का आली, याचा विचार करता, भारतीय राजकारणात अनेकदा मतदारांनी आपली ताकद दाखवून दिल्याचे पाहायला मिळते. लोकशाहीचा सच्चा पाईक असलेल्या इथल्या नागरिकांनी भल्या भल्या दिग्गजांनाही मतदानाच्या माध्यमातून कित्येकदा पराभवाचे पाणी पाजले. गांधी कुटुंबीयांचा परंपरागत मतदारसंघ असलेल्या रायबरेलीतून तर खुद्द इंदिरा गांधींचा राज नारायण यांनी पराभव केला होता. भारतीय राजकारणात अशी बरीच उदाहरणे सापडतील. म्हणूनच शरद पवारांना आपली वा कन्येची तशी अवस्था होऊ नये, असे वाटणे साहजिकच. गोडसेच्या पुनर्जन्माचे भाजपशी संबंध लावणारे बॅनर हे याच भयगंडाचे लक्षण म्हणावे लागेल. म्हणूनच शरद पवार साडेचार वर्षांपूर्वीचे आपलेच शब्द गिळत पुन्हा एकदा लोकसभेच्या आखाड्यात उतरुन उरल्या-सुरल्या पक्षाला वाचवण्याच्या कामगिरीवर सहकुटुंब, सहपरिवार जाण्याचे मनसुबे रचत असावेत. त्यामुळेच स्वतः शरद पवार आणि सुप्रिया सुळेंच्या बरोबरीने आता पार्थ पवारांचे नावही संभाव्य उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमधून पुढे येताना दिसते. म्हणजेच ‘पवार’ या एकाच कुटुंबातून प्रमुख लोक जनतेवर लादायचे, नेते म्हणून सादर करायचे आणि हुकूमत गाजवायची हाही डाव साधता येईल. घराणेशाही यालाच म्हणतात ना? पण सांगताना मात्र जनतेच्या इच्छेनेच हे कृत्य केल्याचे मानभावीपणे म्हटले जाते. मात्र, पवारांनी हे लक्षात घ्यावे की, जमाना झपाट्याने बदलत आहे. आता जनतेला एखाद्या कुटुंबात जन्माला आला, म्हणून संबंधित व्यक्ती ‘आपला नेता’ असावी, असे वाटत नाही. तर जो आपले प्रश्न सोडवेल, आपली स्वप्ने सत्यात उतरवेल तोच नेता म्हणून हवा आहे. आणि हे नेतेपद गेल्या साडेचार वर्षांपासून नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीसांकडेच असल्याचे वेळोवळी सिद्धही झाले.

 

म्हणूनच मोदी आणि भाजपला सत्तेवर कायम ठेवण्याचे मत निरनिराळ्या सर्वेक्षणांतूनही समोर आले. समाजमाध्यमांवरही मोदी आणि भाजपचीच चर्चा होताना दिसते. तर शरद पवार वा राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव घेतले की, अध्यक्षापासून नेत्या-कार्यकर्त्यांचा शेलक्या शब्दांत उद्धार केला जातो. कदाचित हे लक्षात आल्यानेच कोलकात्यात पंतप्रधानपदेच्छुक बेरोजगारांच्या मेळाव्याला हजेरी लावल्यानंतरही पवारांना माढ्यातून निवडणूक लढवावी की नाही, यासाठी कार्यकर्त्यांशी चर्चा करावी लागते. पण मोदी मात्र तेव्हाही आणि आताही गृहराज्य गुजरातपासून शेकडो किलोमीटर लांब असलेल्या वाराणसीतून विजयी होण्याचा आत्मविश्वास दाखवतात. पवारांचे कार्यकर्ते मात्र, हे वास्तव लक्षात घेताना दिसत नाहीत. बारामतीत लावलेले बॅनर हे याच वास्तवापासून दूर गेलेल्या कार्यकर्त्यांच्या मस्तीचे लक्षण. अर्थात, बारामतीतल्याच नव्हे तर राज्यातल्या मतदारांनाही कोणाची मस्ती कशी उतरवायची, हे चांगलेच कळते. अन् ही गोष्ट राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही लक्षात घेतलेली बरी, कारण इतकी मस्ती बरी नाही!

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@