‘गळाभेट’ आणि ‘गळ्यात पडणे’; मोदींची लोकसभेत जोरदार टोलेबाजी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Feb-2019
Total Views |

 

 
 
 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोळाव्या लोकसभेत शेवटच्या सत्रातील शेवटच्या भाषणात कोपरखळ्या मारत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना अक्षरश: घायाळ केले. कोपरखळ्या मारताना त्यांनी एकदाही राहुल गांधी यांचे नाव घेतले नाही. पण, ‘समझनेवालों को इशारा काफी है’, या उक्तीनुसार मोदींनी आपले मन मोकळे केले. मोदींच्या भाषणादरम्यान सभागृह अनेकदा हास्यकल्लोळात बुडाले होते.
 

गेल्या पाच वर्षांत भारताच्या दृष्टीने एक खूप मोठा बदल झाला आहे आणि तो म्हणजे जागतिक पातळीवर भारताची बाजू मजबूत झाली आहे, गांभीर्याने ऐकलीही जाते. कारण गेल्या तीस वर्षांत केंद्रात पहिल्यांदाच पूर्ण बहुमताचं सरकार आलं. पूर्ण बहुमत असणारं सरकार ही आमची ओळख आहे. आतापर्यंत जागतिक पातळीवर भारताची ही ओळख नव्हती. त्यामुळे भारताचं खूप नुकसान झालं. गेल्या पाच वर्षांत देशाची ही ओळख वाढली आणि हे यश त्या सव्वाशे कोटी जनतेचं आहे, ज्यांनी २०१४ मध्ये पूर्ण बहुमताचं सरकार आणलं, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारच्या कामांचा लेखाजोखा आज संसदेत मांडला.

 

१६ व्या लोकसभेचं हे शेवटचं सत्र आणि त्याचा आजचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे मोदींचं हे १६ व्या लोकसभेतलं शेवटचं भाषण होतं. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या कामांना मोदींनी पुन्हा एकदा उजाळा दिला. ते म्हणाले, आमच्या कार्यकाळात २१९ विधेयके आली आणि त्यातली २०३ पारित झाली. ‘आधार’ला याच सभागृहाने खूप मोठी ताकद दिली. नोटबंदी, जीएसटीसारखे मोठे निर्णय घेतले. सामाजिक न्यायाच्या दिशेनेही या सभागृहाने पावले उचलली. सवर्ण आरक्षण कायदा आणला. समाजातल्या मागास वर्गासाठी कायदा आणला. देशाने गेल्या पाच वर्षांत डिजिटल जगात आपली जागा निर्माण केली. अवकाश संशोधनात जागतिक पातळीवर भारताला मोठं यश मिळालं.’

 

आर्थिक घोडदौड

 

आमच्या सरकारने साडेचार वर्षांत जी अभूतपूर्व कामगिरी केली आहे, त्याच्या परिणामी भारत पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. आज जगात भारताचे महत्त्व वाढले आहे आणि प्रतिष्ठाही वाढली आहे. ही बाब लक्षात घेतली पाहिजे, असेही मोदी यावेळी बोलताना म्हणाले. जागतिक तापमानवाढीविरोधात भारताने मोठी लढाई लढली आहे. आज जगात सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनल्यानंतर देशाचा आत्मविश्वास वाढला आहे, असंही मोदींनी सांगितलं.

 

मानवतेचं मूल्य

 

मानवतेचं मूल्य जपण्यासाठी भाजपाच्या नेतृत्वातील रालोआच्या सरकारने विशेष प्रयत्न केले असे सांगताना मोदी यांनी, नेपाळ, मालदीव, बांगला देशाला केलेल्या मदतीचा उल्लेख केला. मानवतेच्या दृष्टीने भारताने हे काम केलं आणि जगात आपली प्रतिमा उजळवली, असं ते म्हणाले. भाजपा सरकारच्या कार्यकाळात आम्ही संसदेत संविधान दिवस साजरा केला, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२५ वी जयंती अतिशय थाटात अन् उत्साहात साजरी केली, अशी माहितीही त्यांनी दिली.

 

कुठे आला भूकंप?

 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर नरेंद्र मोदी यांनी आपल्या शेवटच्या भाषणातही टीकास्त्र सोडलं. मोदी म्हणाले, आम्ही ऐकून होतो की भूकंप येणार, पण पाच वर्षे झालीत, कोणताही भूकंप आला नाही. लोकशाहीची शक्तीच इतकी मोठी आहे की तिने भूकंपही पचवला.’ संसदेत की विमानं उडवण्यात आली, पण संसदेची उंचीच एवढी आहे की त्या उंचीपर्यंत कोणतंही विमान जाऊ शकत नाही, असं सांगत त्यांनी राहुल गांधी यांना जोरदार टोला हाणला.

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@