मुंबई संघाला उतरती कळा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 

 
 
 
 
खरंतर मुंबई आणि क्रिकेट हे म्हणजे एका माळेचे दोन मणी. आजही मुंबई म्हटलं की वानखेडे, आझाद मैदान आणि क्रिकेट हे त्रिकूट अगदी सहज डोळ्यासमोर येते. त्यातच मुंबई आणि रणजी सामन्यांचे नाते काही औरच. तब्बल ४१ वेळा मुंबईच्या क्रिकेट संघाने रणजी करंडक पटकावण्याचा विक्रम केला, तर १४ इराणी करंडक जिंकले आणि या प्रवासात या संघाने शेकडो उत्तम खेळाडू भारतीय संघाला दिले. त्यातील सचिन तेंडुलकर, विजय मर्चंट, सुनील गावस्कर, पॉली उम्रीगर, दिलीप वेंगसरकर, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या मुंबईकर खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय मैदानही गाजवले. पण गेल्या काही वर्षांत मुंबई संघाला उतरती कळा लागली आहे. याचे एक कारण म्हणजे खेळाडूंचे प्रथम श्रेणी क्रिकेटकडे होणारे दुर्लक्ष आणि दुसरे म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशनची अंतर्गत धुसफुस. ज्या मुंबई संघाचा रणजी करंडक स्पर्धेत बोलबाला होता, तोच संघ रणजीमध्ये संघर्ष करताना दिसला. याला कारणीभूत आहे ती मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवड समिती. यंदाच्या रणजी संघातील खेळाडूंकडे निवड समितीचे लक्ष नसल्याचा आरोप निवड समितीवर करण्यात आला. दरम्यान, निवड समिती स्थानिक क्रिकेट स्पर्धांना प्राधान्य देत नाही, असा आरोपही काही खेळाडूंच्यावतीने मुंबई क्रिकेट असोसिएशनवर करण्यात आला होता. त्यामुळे मुंबई रणजी संघ आणि २३ वर्षांखालील मुलांच्या संघ निवड समितीतील सदस्यांना पदावरून दूर करण्यात यावे, यासाठीचे एक पत्र नुकतेच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सदस्य क्लबचे प्रतिनिधी खोदादाद याझदेगार्दी यांनी लिहिले आणि पुन्हा एकदा मुंबई संघाच्या अपयशाच्या चर्चेलासुरुवात झाली. सध्या मुंबई क्रिकेटच्या वरिष्ठ निवड समितीच्या अध्यक्षपदी भारताचे माजी जलदगती गोलंदाज अजित आगरकर आहे, तर या समितीत माजी कसोटीपटू नीलेश कुलकर्णीही सदस्य आहेत, असे असताना खोदादाद यांनी लिहिलेल्या पत्रात निवड समितीच्या प्रक्रियेत अनियमितता असल्याचा आरोप केला. तसेच, रणजीसाठी खेळाडूंची निवड होत असताना निवड समितीतील एकही सदस्य हजर नव्हता खेळाडूंची निवड ही प्रशिक्षक करत असल्याचा आरोपही खोदादाद यांनी केला होता. त्यामुळे या दोन्हींच्या निवड समिती सदस्यांना हटविण्यासाठी खोदादाद यांनी विशेष सर्वासाधारण सभा आयोजित केली. त्यामुळे हे प्रकरण आगरकर आणि त्यांच्या साथीदारांना चांगलेच भोवणार आहे, असे दिसतय.
 

द्रविड पॅटर्नची कॉपी

 

भारताचा सर्वात विश्वासू आणि ‘दी वॉल’ या नावाने प्रसिद्ध असलेला भारताचा माजी खेळाडू म्हणजे राहुल द्रविड. राहुल द्रविडने आपल्या कारकिर्दीत भारताला अनेक सामने जिंकून दिले, बऱ्याच सामन्यात तर द्रविड ‘एकला चलो रे...’ प्रमाणे एकटाच तग धरून उभा असायचा. २०१२ मध्ये द्रविडने क्रिकेटच्या सर्व खेळांतून निवृत्ती जाहीर केल्यानंतर आयपीएलच्या राजस्थान रॉयल्स संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. त्यानंतर द्रविडने आपला मोर्चा वळवला तो १९ वर्षांखालच्या खेळाडूंकडे. सध्या द्रविड भारताच्या १९ वर्षांखालच्या संघाच्या प्रशिक्षकाची बजावत आहे. द्रविडच्या या निर्णयाचे सगळ्या स्तरांवर स्वागत करण्यात आले होते. कारण, द्रविडसारखा संयमी खेळाडू भारतात होणे नाही आणि द्रविडची जादू भारताच्या छोट्या शिलेदारांवरही चालली. त्यामुळे द्रविडने तयार केलेला त्याचा हा पॅटर्न सगळ्या देशांमध्ये कॉपी होत आहे. म्हणजे नेहमी द्रविडपासून चार हात लांब राहणाऱ्या आणि द्रविड मैदानात असताना कापऱ्या भरणाऱ्या पाकिस्तान संघाने द्रविड पॅटर्नची कॉपी करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे आपल्या शेजाऱ्यांनी आपल्याकडच्या गोष्टींचं अनुकरण करावे, ही काही नवीन गोष्ट नाही, असो. तर आता, पाकिस्तानने द्रविड पॅटर्नची कॉपी करण्याचा निर्णय घेतला आहे, म्हणजे पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही माजी क्रिकेटपटूंना पाकिस्तानच्या १९ वर्षांखालच्या संघाचे प्रशिक्षक करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पाकिस्तानचा माजी कर्णधार युनिस खान याची पाकिस्तानच्या १९ वर्षांखालील संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात येणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. केवळ पाकिस्तानच नाही तर, ऑस्ट्रेलियाही युवा खेळाडू घडवण्यासाठी रॉड्नी मार्श, अ‍ॅलेन बॉर्डर आणि रिकी पाँटिंग या माजी खेळाडूंची मदत घेत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे माजी खेळांडूमुळे युवा खेळाडूंना एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळते. म्हणजे द्रविडने प्रशिक्षकांची भूमिका स्वीकारल्यानंतर १९ वर्षांखालील संघाने एकामागे एक सगळे सामने जिंकत, रिषभ पंत, मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ आणि विजय शंकर यांच्यासारखे युवा खेळाडूही भारतीय संघाला दिले. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या १९ वर्षांखालच्या संघाने २०१६ साली विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली, तर मागच्या वर्षीचा विश्वचषक जिंकला. दुसरीकडे पाकिस्तानच्या १९ वर्षांखालच्या संघाने २००६ नंतर अंतिम फेरीपर्यंतही मजल मारलेली नाही. त्यामुळे पाकिस्तान द्रविड पॅटर्नची कॉपी करून तरी, यशस्वी होईल का, हा प्रश्न उरतोच...

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@