अभियांत्रिकी विषयांचा ज्ञानप्रसारक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Feb-2019
Total Views |

 


 
 
 
पैशाअभावी मुलांना अभियांत्रिकीचे शिक्षण अर्धवट सोडायला लागू नये, यासाठी महेश वाघ याने ‘ई-किडा’ वेबपोर्टल सुरू केले. महेशचे हे कार्य कौतुकास्पद ठरते...
 

अवघ्या २७ वर्षाच्या एका तरुणाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. अन् आता तो तरुण ‘इन्फोमॅटिका एज्युकेशन ट्रस्ट’ या सेवाभावी संस्थेमार्फत महाराष्ट्रातील अनेक मुलांना अभियांत्रिकीचे धडे देऊ लागला. महाराष्ट्रातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षकच उपलब्ध नसल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याचप्रमाणे असंख्य मुलांना पैशाअभावी अभियांत्रिकीचे शिक्षण अर्धवट सोडताना त्याने पाहिले. या भीषण समस्येमधूनच ‘ई-किडा’ या वेबपोर्टलच्या संकल्पनेचा त्याच्या मनात जन्म झाला. अभियंता होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या मुलांसाठी त्याने हे वेबपोर्टल सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध करुन दिले. अभियांत्रिकीची स्वप्ने रंगविणाऱ्या परंतु आर्थिक कारणांमुळे स्वप्न पूर्ण होऊ न शकणाऱ्या, स्वप्नांच्या पूर्ततेत अडथळा येणाऱ्या मुलांसाठी अभियांत्रिकीचे धडे देणारे वेबपोर्टल सुरू करणाऱ्या या ज्ञानप्रसारक तरुणाचे नाव आहे महेश वाघ.

 

महेशचे बालपण हे मुंबईतील नागपाड्यामध्ये गेले. वडील पोलीस असल्याने त्यांचे कुटुंब पोलीस वसाहतीमध्ये राहात होते. त्याचे शालेय शिक्षण त्या परिसरातीलच शाळेत झाले. शाळेत महेश हुशार होता. त्याने पहिलीपासून दहावीपर्यंत पहिला क्रमांक पटकावला. वडिलांनी त्याला स्कॉलरशिपची परीक्षा द्यायला सांगितले ती त्याने दिलीही. दहावी आणि बारावीच्या महाराष्ट्र पोलिसांच्या मुलांमधून महेश पहिला आला. म्हणूनच अभियांत्रिकीचे त्याचे चार वर्षांचे शुल्क मुंबई पोलिसांनी भरले. दरम्यान, अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच टीसीएचला प्लेसमेंट माध्यमातून महेशला नोकरीही मिळाली. तृतीय वर्षाला असताना पब्लिक स्पिकिंग शिकण्यासाठी नेटवर्क मार्केटिंग कंपनीत तो रुजू झाला. त्यावेळी त्याला गणित शिकविण्याची ऑफर मिळाली. फळा नसल्यामुळे शिकविण्याची सुरुवात लोखंडी कपाटावर लिहून केली. अभियांत्रिकीची मुले वाढल्यावर पालिकेच्या शाळेतील वर्गात शिकवायला सुरुवात केली. शिकवणीत करिअर करायचा विचार करून त्यानंतर टीसीएचमधून राजीनामा दिला. स्वत:चा ‘Infometicaनावाचा अभियांत्रिकीचा क्लास सुरू केला व आज महाराष्ट्रात विविध ठिकाणी त्याच्या शाखा असून जवळपास दोन हजार विद्यार्थी त्याच्याकडे इंजिनिअरींगचे शिक्षण घेत आहेत. यादरम्यान करी रोडला २ बीएचके घर घेतले. २०१६ साली काही घटना घडल्या ज्यामुळे त्याचे बरेचसे नुकसान झाले. कोचिंगची रुम जुनी असल्याने तिथे लिकेज झाले. लिकेजमुळे शॉर्ट सर्किट व पुढे आर्थिक झळही बसली.

 
एका बाजूला हा कठीण काळ पुढ्यात उभा ठाकलेला असताना तीन महिने कोचिंग क्लाससाठी त्याला कुठेही रूम मिळाली नाही. नंतर रुम मिळाल्यावरच त्याने पुन्हा क्लासेस सुरू केले. २०१४ ला तो सांगलीला व्याख्यानमालेला गेला असता तिथे शिक्षक टिकत नाही तसेच खेड्यात शिक्षक यायला तयार नाहीत, असे त्याला समजले. भारतातील गावागावात फिरत असताना तेथील इंजिनिअरिंग महाविद्यालयांमधील परिस्थिती तसेच शेतकरी, कष्टकरी समाजातील मुलांचे आर्थिक पाठबळ नसताना इंजिनिअरिंगचे शिक्षण घेताना होणारे हाल बघून आपण ज्या परिस्थितीतून गेलो, ती परिस्थिती इतर विद्यार्थ्यांवर ओढवू नये म्हणून सरकार अथवा इतर कोणावरही अवलंबून न राहता स्वत:च्या आयुष्यभराची कमाई लावून वर्षभरापूर्वी महेशने हा ‘ई किडा’ प्रकल्प सुरु केला आहे. यासाठी त्याने अडीच कोटी रुपयांची गुंतवणूक केली. पण हे काही सहजशक्य झाले नाही. आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला व त्या सोडवण्यासाठी ५० लाखांचे कर्जही घ्यावे लागले. नवीन प्रकल्प असल्यामुळे चांगल्या शिक्षकांनी आधी शिकवण्यास नकार दिला पण, नंतर त्याने शिक्षकांना आपले म्हणणे पटून दिले. २०१६ मध्ये महेशने युट्युब चॅनल सुरू केले आणि गेल्या अडीच वर्षात सुमारे पाच लाख सबस्क्रायबरदेखील मिळाले. या चॅनलमध्ये कॉमर्स आणि अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाचे व्हिडिओंचा समावेश होता. सुरुवातीला मोफत असल्यामुळे शिक्षकांचा आणि इतर टीमचा पगार देणे त्याला शक्य होत नव्हते. एका विषयासाठी एका विद्यार्थ्याकडून एक हजार रुपये शुल्क आकारले. पुढे युट्यूबवरील व्हिडिओच्या व्ह्यूजचेही पैसे मिळू लागले.
 

‘ई-किडा’ या संकेतस्थळासाठी महेश वाघ याला जवळपास अडीच कोटी रुपयाची गुंतवणूक करावी लागली, हे आपण वर पाहिलेच. पण हे एवढ्यानेच होणारे काम नाही, तर या संकेतस्थळाद्वारे नवनवीन गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अजूनही पाच कोटी इतकी गुंतवणूक करावी लागणार आहे. भारतातील सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असे ‘ई- किडा’हे संकेतस्थळ उपलब्ध असून याच्यावर इंजिनिअरिंग अभ्यासक्रमातील सर्व विभागातील सर्व विषयांचे नोट्स तसेच व्हिडिओ व प्रश्नोत्तरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. “जर एखादा नवा उद्योग सुरू करायचा असेल, तर एक ते दोन वर्षे आधी काम करा. कामातून स्वत:ला शिस्त लागते, कसाप्रकारे संघर्ष करावा लागतो हे कळते. तसेच अनुभव मिळतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या क्षेत्राची माहिती असेल त्याच क्षेत्रात उतरा. पैसे कमवायला काम करू नका, तर समाज परिवर्तन करण्यासाठी काम करा,” असे महेश सांगतो. पुढील काळात महेश एमपीएसी व यूपीएसी परीक्षांवर, बँकेच्या परीक्षांसाठी युट्युब चॅनेल सुरु करणार आहे. स्किल डेव्हलपमेंट, स्पर्धा परीक्षांवर लक्ष केंद्रित करणार आहे. प्रस्थापित उद्योजक व राजकारणी आपली पोतडी भरण्यात रममाण असताना २७ वर्षांच्या एका मराठी तरुणाने हे पाऊल उचलणे कौतुकास्पद व गौरवास्पद आहे.

 
- नितीन जगताप
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@