कालाय तस्मै नमः।

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Feb-2019   
Total Views |

 


 
 
 
एका जन्मात प्रारंभीच्या काळात केलेल्या दुष्कृत्यांची फळं त्याच जन्मात उत्तरार्धात भोगावी लागतात, हे सिद्ध करू शकणारी असंख्य उदाहरणं आपल्या आजूबाजूला सापडतील. हे तत्त्व जसं व्यक्तीला लागू होईल, तसंच ते व्यक्तीसमूहांना, समाजांनाही लागू होईल. उदाहरणार्थ, भारतीय उपखंड आणि त्यातील भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश या तीन देशांचा विचार करता येईल. १९४७ साली भारत स्वतंत्र झाला. परंतु, भारताची फाळणी होऊन भारताच्या पूर्व आणि पश्चिमेत पाकिस्तान नावाचं नवं राष्ट्र जन्माला घातलं गेलं. ज्या सिंधू नदीवरून ‘हिंदू’ शब्द निर्माण झाला, ती सिंधू नदी भारतात न राहता ‘परराष्ट्रा’त गेलेली आपल्याला पाहावी लागली. हे दुःख उराशी बाळगून आपण स्वातंत्र्योत्तर वाटचाल सुरू केली आणि आज २०१९ मध्ये या भूप्रदेशाची जी काही परिस्थिती बनली आहे, ती पुरेशी बोलकी आहे. दोन वेगळी राष्ट्रं निर्माण झाली. त्यामुळे आतातरी ही दोन्ही राष्ट्रं स्वतंत्रपणे, शांततेत वाटचाल करतील आणि १५० वर्षं पारतंत्र्य भोगणाऱ्या येथील जनतेच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करतील, अशी आशा होती. पाकिस्तानने जन्म घेताच ही आशा फोल ठरवली. पाकिस्तानच्या वेडाचारातून काश्मीरचा प्रश्न निर्माण झाला, हा सारा इतिहास आपणास ठाऊक आहेच. पुढे या वेडाचाराने टोक गाठले आणि त्याची परिणती बांगलादेशाच्या निर्मितीत झाली.
 

पाकिस्तान हे राष्ट्र भांडून निर्माण केलं गेलं आणि त्या राष्ट्रांतर्गत यादवी माजून पुन्हा बांगलादेश हा नवा देश निर्माण झाला आणि तोही भारताच्या हस्तक्षेपातून. या घटनेला आता जवळपास ४८ वर्षं झाली आहेत. बांगलादेश म्हणजे तेव्हाचा पूर्व पाकिस्तान हा त्यावेळचा मागास, अविकसित प्रदेश. तेव्हाच्या अविभाजित पाकिस्तानातील पंजाब, सिंध हे प्रांत सधन आणि विकसित मानले जात आणि पूर्व पाकिस्तान म्हणजे एक बजबजपुरी! त्यात राजकीय, प्रशासकीय, आर्थिक आणि सर्वच बाबतीत पूर्व पाकिस्तानला सापत्न वागणूक मिळे. अगदी तेथील बंगाली भाषाही पाकिस्तानमध्ये तुच्छ ठरवली गेली. यातून बंगाली अस्मिता जागी झाली आणि भीषण यादवीनंतर, लष्कराकडून झालेल्या अनन्वित अत्याचारानंतरही ‘बांगलादेश’ जन्माला आला. आज ४८ वर्षानंतर हाच बांगलादेश पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून विकासाच्या दिशेने वाटचाल करतो आहे आणि पाकिस्तान हा दिवसेंदिवस अराजकाच्या दिशेने रसातळाला बुडत चालला आहे.

 

ताज्या अहवालांनुसार, बांगलादेशने पाकिस्तानच्या तुलनेत आर्थिक क्षेत्रासह शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रांसह अनेक बाबतीत मोठी झेप घेतली आहे. बांगलादेशाचा गेल्यावर्षीचा विकासदर हा ७.८ टक्के होता जो पाकिस्तानहून (५.८) बराच जास्त होता. बांगलादेशाकडे असलेला परकीय चलनाचा साठा हादेखील ३२ अब्ज डॉलर्सच्या आसपास होता जो पाकिस्तानच्या (८ अब्ज डॉलर्स) जवळपास चौपट होता. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार, २०२१ पर्यंत बांगलादेशची अर्थव्यवस्था ही ३२२ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल. व्यक्तीच्या जीवनमानाच्या विविध निर्देशांकातहीबांगलादेश पाकच्या पुढे आहे. बांगलादेशी नागरिकांचे सर्वसामान्य आयुर्मान हे ७२ वर्षं आहे आणि पाकिस्तानी नागरिकांचे ६६. बालमृत्यूदर, स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर, साक्षरता, रोजगार आदी अनेक बाबतींत पाकिस्तानच्या तुलनेत बांगलादेशने लक्षणीय प्रगती केली आहे. या उदाहरणांसह आणखी अशी अनेक उदाहरणं देता येतील, ज्यातून बांगलादेश हा पाकच्या पुढे जात असल्याचं सिद्ध करता येईल. याचा अर्थ बांगलादेशात सारे काही आलबेल आहे, असं नक्कीच नाही. बांगलादेशाच्या समस्याही जटील आहेत, तेथील धार्मिक मूलतत्त्ववाद्यांचा वाढता प्रभाव चिंताजनक आहे, तेथील अल्पसंख्यांकांवर विशेषत: हिंदूंवर होणारे अत्याचारही संतापजनक आहेत. मात्र, पाकिस्तानच्या तुलनेत ते काहीच नाहीत.

 

स्वातंत्र्यानंतर भारताने लोकशाही स्वीकारली, अंगिकारली. जागतिक स्तरावर मोठमोठे नेते भारतात लोकशाही टिकण्याबाबत एकेकाळी शंका व्यक्त करत होते आणि भारताने गेल्या सात दशकांत राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि असंख्य क्षेत्रात केलेल्या वाटचालीने आज जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. भारत आज जगातील पाचव्या क्रमांकाची बलाढ्य अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे. दुसरीकडे पाकिस्तानने जन्मल्यापासून भारतद्वेष केंद्रस्थानी ठेवून वाटचाल केली. त्याचे परिणाम आज तो देश भोगतो आहे. भारताशी स्पर्धा तर लांबची गोष्ट, बांगलादेशही पाकिस्तानला मागे टाकतो आहे. त्यामुळे एकप्रकारे काळाचं एक वर्तुळ या तीन देशांनी पूर्ण केलं आहे, असं नक्कीच म्हणता येईल.

 
 
@@AUTHORINFO_V1@@