विचार करण्याची वेळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Feb-2019
Total Views |

 

 
 
 
ज्या भारतभूमीत हिंदू धर्माचा जन्म झाला, जिथे हिंदू अजूनही बहुसंख्य आहेत, तिथेच हिंदू समाजावर एखाद्या प्रदेशात अल्पसंख्य म्हणवून घेण्याची वेळ येणे, हे कोणत्याही परिस्थितीत आनंददायी नव्हे तर विचार करण्याजोगेच म्हटले पाहिजे. हिंदू धर्म व संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या भारताला ही स्थिती परवडणारी नाही.
 

देशातील आठ राज्यांत घटत्या संख्याबळामुळे हिंदू समुदायालाही अल्पसंख्याकांचे हक्क व अधिकार मिळण्याच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच संबंधित राज्यांना निर्देश दिले. लक्षद्वीप (२.५ टक्के), मिझोराम (२.७५ टक्के) नागालॅण्ड (८.७५ टक्के), मेघालय (११.५३ टक्के), जम्मू-काश्मीर (२८.४४ टक्के), अरुणाचल प्रदेश (२९ टक्के), मणिपूर (३१.३९ टक्के) आणि पंजाब (३८.४० टक्के) ही या राज्यांची नावे असून गेल्या काही वर्षांत तिथला हिंदू टक्का कमालीचा घसरलेला दिसतो. याच अनुषंगाने अ‍ॅड. अश्विनीकुमार उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली व त्यावरच न्यायालयाने आदेश दिले. दरम्यान, न्यायालयाने या अर्जावर सुनावणी करत राज्यांना आवश्यक ती पावले उचलण्यास सांगितल्याने व आता आपल्यालाही ‘अल्पसंख्याक’ वर्गाला असलेल्या सोयी-सवलती मिळतील म्हणत अनेकजण सुखावल्याचे दिसते. पण ज्या भारतभूमीत हिंदू धर्माचा जन्म झाला, जिथे हिंदू अजूनही बहुसंख्य आहेत, तिथेच हिंदू समाजावर एखाद्या प्रदेशात अल्पसंख्य म्हणवून घेण्याची वेळ येणे, हे कोणत्याही परिस्थितीत आनंददायी नव्हे, तर विचार करण्याजोगेच म्हटले पाहिजे. हिंदू धर्म व संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या भारताला ही स्थिती परवडणारी नाही. कारण जगाचा भूतकाळ आणि वर्तमानकाळ दोन्हीचा अभ्यास करता हिंदूंनी नेहमीच सहिष्णुतेची कास धरत सर्वच पंथ-संप्रदायांना आणि आक्रमकांनाही आपलेसे केल्याचे लक्षात येते. मात्र, महाभारतकालीन राष्ट्राचा विस्तार आणि विद्यमान अवस्था पाहता, जिथे जिथे हिंदू लोकसंख्या कमी कमी होत गेली, तो तो भूभाग मुख्य भूमीपासून वेगळा होत गेल्याचे दिसते. परिणामी हिंदुंच्या अन्य धर्मांत बळजबरीने वा प्रलोभने दाखवून होणाऱ्या धर्मांतर वा घटत्या लोकसंख्येपुरताच हा मुद्दा मर्यादित न राहता, तो देशाच्या सुरक्षेशी संबंध सांगणारा होतो.

 

दुसरीकडे देशात नजीकच्या काळात घडलेल्या काही काही घटना पाहता एक निराळेच चित्र उभे ठाकते. पूर्वोत्तरातील ख्रिश्चनबहुल राज्यांमध्ये चर्च वा मिशनरी संस्थांकडून धर्मांतरासाठी मोठ्या प्रमाणावर ताकद लावली जात असल्याचे वळोवेळी चर्चिले जाते. कधीकाळी याच भागातून तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरुंसमोर स्वतंत्र ‘इसाईस्तान’चीही मागणी करण्यात आली होती, ही बाब नक्कीच दुर्लक्ष करण्यासारखी नाही. हेच पंजाबातही मूठभर खलिस्तानवाद्यांमुळे का होईना ४०-४५ वर्षांपूर्वी झालेच होते. केरळसारख्या मुस्लिमबहुल राज्यात तर आजही धर्मांध मुस्लिमांच्या संस्था व संघटना देशाबाहेर ‘तुमचे-आमचे’ कोणीतरी आहे, असे सांगत सर्वसामान्य मुस्लिमांना फितवत, फुस लावत स्वतःच्या कच्छपी लावण्याचा प्रयत्न करताना दिसतात. जम्मू-काश्मिरमध्ये तर पाकिस्तानधार्जिण्या फुटीरतावादी प्रवृत्तींमुळे रोजच तणावाची परिस्थिती उद्भवल्याचे अनुभवायला येते. हिंदू लोकसंख्या घटली की कसले संकट घोंघावू शकते, त्याची चुणूक दाखवणाऱ्याच या घटना. अहिंदु लोकसंख्येची वाढ हा राष्ट्राच्या अखंडतेला आव्हान देणारा आणि सार्वत्रिक एकात्मतेपुढे प्रश्न उभे करणारा मुद्दा असल्याचेच या सगळ्या घटना व प्रसंगातून समजते. लोकसंख्येबाबतचा हा एक मुद्दा झाला तर दुसरा मुद्दा येतो तो घुसखोरांचा. देशात बांगलादेशी घुसखोरांचे प्रमाण सीमावर्ती राज्यात सर्वाधिक असल्याचे निरनिराळ्या आकडेवारीतून नेहमीच पुढे येते. आसाम आणि पश्चिम बंगालची जमीन जणू काही या घुसखोरांना आंदण दिल्यासारखीही भासते. शिवाय बांगलादेशी घुसखोरांबरोरच काही काळापासून म्यानमारमधून पलायन करुन भारतात घुसलेल्या रोहिंग्या मुस्लिमांनीही या राज्यांत बस्तान बसवल्याचे आढळते.

 
बांगलादेशी वा रोहिंग्यांमुळे स्थानिक लोकसंख्येसाठी असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्ती, सरकारी योजना, रोजगार आदी गोष्टींवर घुसखोरच डल्ला मारताना दिसतात. ज्यावर वेळीच अंकुश लावणे, प्रसंगी या घुसखोरांना त्यांच्या त्यांच्या देशांत हाकलून लावणे गरजेचे असल्याचे स्पष्ट होते. पण ममता बॅनर्जींसारखे नेतृत्व मात्र याकडे गांभिर्याने न पाहता आक्रस्ताळेपणा करत मतलब साधण्यातच धन्यता मानते, जे दुर्दैवी आहे. शिवाय गेल्या काही दिवसांपासून आसामसह जवळच्या प्रदेशात नागरिकत्व विधेयकावरुनही बराच गदारोळ सुरु आहे. म्हणजेच केंद्र सरकारने आणलेला कायदा अमान्य करण्याकडेच गोंधळ घालणार्‍यांचा कल असल्याचे दिसते. सोबतच घुसखोरी, धर्मांतरादी प्रकारांमुळे जसे हिंदु-मुस्लिम-ख्रिश्चन लोकसंख्येचे असंतुलन निर्माण झाल्याचे पाहायला मिळते, तसेच यातून सामाजिक, धार्मिक प्रश्नही उद्भवतात. मुस्लिमांची लोकसंख्या विचित्र पद्धतीने वाढू लागली की, त्याचे पर्यावसन बहुतेकदा धार्मिक सलोखा बिघडवणारेच ठरते. जाणूनबुजून हिंदुंच्या भावना दुखावण्याचे, हिंदू धर्ममान्यतांना, अस्मितांना ठेस पोहोचवण्याचे प्रकार घडू लागतात. यातूनच दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण होते. अशावेळी जिथे जिथे ‘मिनी पाकिस्तान’ तयार झालेत, तिथे तिथे हिंदुविरोधी दडपशाही सुरु होते. कधी एकट्या-दुकट्या हिंदू कुटुंबाचे हाल होतात तर कित्येकांचा बळीही जातो. उत्तर प्रदेशातील कैराना, केरळातील मुस्लिमबहुल मल्लापुरम जिल्ह्यातील अशा घटना हा त्याचाच दाखला. उल्लेखनीय म्हणजे, जगातल्या अन्य इस्लामी देशांच्या तुलनेत भारतात मुस्लिमांना सर्वच प्रकारचे स्वातंत्र्य आणि बरोबरीचे स्थान उपभोगायला मिळत असतानाची ही स्थिती आहे.
 

भारतात ही अशी परिस्थिती असताना जगात नेमके काय झाले आणि काय चाललेय? तर ख्रिस्ती आणि इस्लामी धर्माच्या उदयाआधी अपवाद वगळता जगातल्या सर्वच देशात अग्नीपूजक संस्कृती नांदत असल्याच्या खाणाखुणा आढळतात. ख्रिस्ती आणि नंतर इस्लाम धर्मियांच्या आक्रमक प्रचार-प्रसारामुळे या संस्कृतींचे अस्तित्व धोक्यात आले, तर काही संस्कृती लयालाही गेल्या. अगदी इराणमध्ये असलेल्या पारशी धर्मियांपासून ते ग्रीक, इजिप्त, सुमेर, बॅबिलोनिया, मेसोपोटॅमिया, कुर्द, कॅनॉन, लॅटव्हिया, आफ्रिका आदी असंख्य प्रदेशातल्या मूळच्या वारशाला ख्रिश्चॅनिटी आणि इस्लामने गिळंकृत केले. यापैकी काहींचे आज नामोनिशाणही दिसत नाही तर काही काही संस्कृतीचे पाईक अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या प्रमाणातच अस्तित्वात असल्याचे दिसते. विशेष म्हणजे एका वर्षापूर्वी ‘आयसीसीएस’च्या पुढाकाराने अशा सर्वच लुप्तप्राय अवस्थेत असलेल्या संस्कृतीच्या प्रतिनिधींचे, जे की हिंदू धर्माला आपले मायबाप मानतात, त्यांचे संमेलन ‘केशवसृष्टी’ प्रकल्पात भरवण्यात आले होते. यावेळी या सर्वांनीच लोकसंख्येच्या असंतुलनामुळे आपल्यावर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराची माहिती दिली होती. आज भारताच्या काही राज्यांत हिंदू अल्पसंख्य होत आहे, त्याकडे या दृष्टीनेही पाहायला हवे. कारण कुठलीही मानवी संस्कृती धार्मिक पायावर उभी असल्याचे आणि तो आधार निखळला की, ते राष्ट्रही कोसळल्याचे दिसते.

 

अर्थात गेल्या चौदाशे वर्षातल्या आक्रमण, युद्ध, लढाया, हिंसाचार, रक्तपाताच्या घटनाक्रमातून इराण, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कुवेतसारखे इस्लामी देश विकासाच्या एका टप्प्यावर पोहोचल्याचे जरी दिसत असले तरी, हे चित्र केवळ वरवरचे आहे. आजही या देशांत आपापल्या मतांशी कट्टर असणार्यांचे निरनिराळे गट कार्यरत आहेतच. जसे की, इराणमध्ये शिया, सौदी अरेबियात वहाबी, सुन्नी! हे सगळेच गट परस्परांच्या विरोधात सातत्याने कारवाया करतच असतात, भूमिका घेतच असतात. म्हणजेच ते स्वतःला एकाच इस्लामचे अनुयायी म्हणवत असले, तरी ते एकमेकांशी विशिष्ट मुद्द्यांवरुन संघर्षरतही असतातच. दुसरीकडे ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या तीनही धर्मांतील साम्यही मजेशीर आहे. ‘जुना करार’, ‘नवा करार’, ‘कुराण’, ‘देवाचा पुत्र’, ‘अखेरचा पैगंबर’ या सगळ्याच गोष्टी एकाच ‘अब्राहमिक’ कुळाशी नाते सांगणाऱ्या. तरीही त्यांच्यातल्या त्यांच्यात नेहमीच झगडे सुरु असतात. परिणामी भारताचा विचार करता विशिष्ट भूप्रदेशातली हिंदुंपेक्षा अहिंदुंची वाढती लोकसंख्या एकात्मतेला आणि शांततेलाही अडथळा निर्माण करणारी ठरु शकते. म्हणूनच वर उल्लेख केलेल्या आठ राज्यांतल्या घटत्या हिंदू लोकसंख्येचा या परिप्रेक्ष्यातूनही विचार करणे गरजेचे ठरते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@