तुम्ही केला तो औचित्यभंगच; वासुदेव कामत यांचा पालेकरांना टोला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Feb-2019
Total Views |


मुंबई : प्रख्यात चित्रकार प्रभाकर बरवे यांच्यावरील चित्रप्रदर्शनावेळी ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांच्याकडून मुख्य विषयाला टाळून नयनतारा सहगल आणि त्याच अनुषंगाने अन्य विषयांवर बोलण्याचा जो प्रकार घडला आणि त्यानंतर पालेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ज्याप्रकारे विधाने केली, त्यावर आता सांस्कृतिक वर्तुळातून टीकेची झोड उठली आहे. ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत, सुहास बहुलकर, अभिनेते योगेश सोमण यांच्यासह अनेक मान्यवरांनी ‘पालेकर, तुम्ही केला तो औचित्यभंगच!’ असे म्हणत पालेकर यांच्या ड्रामेबाजीवर जोरदार टीका केली आहे.

बॉम्बे आर्ट सोसायटी, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि संस्कार भारतीचे अध्यक्ष प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांनी या प्रकरणावर दै. ‘मुंबई तरुण भारतशी बोलताना आपल्या भावना तीव्र शब्दांत व्यक्त केल्या. ते म्हणाले की, “आधुनिक भारतीय चित्रकलेच्या क्षेत्रात स्वत:ची स्वतंत्र व वैशिष्ट्यपूर्ण चित्रशैली प्रस्थापित करणारे चित्रकार प्रभाकर बरवे यांच्या चित्रप्रदर्शनाच्या निमित्ताने जो वाद उपस्थित केला गेला आहे, तो दुर्दैवी आहे. वास्तविकरित्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला प्रभाकर बरवे यांच्या चित्रकला क्षेत्रातील योगदानाबद्दल बोलणे अपेक्षित होते. परंतु, त्याबद्दल चर्चा करण्याऐवजी काही वेगळ्याच मुद्द्यांवर राजकीय स्वरुप देऊन या व्यासपीठावरून मांडण्याचा प्रयत्न केला गेला. सोबतच उपस्थित कलाप्रेमी व नागरिकही प्रभाकर बरवे यांच्याबद्दल ऐकण्यासाठी  जमले होते, पण त्यांचाही हिरमोड झाला.”

 
 
आजचा अग्रलेख
 
 

कामत पुढे म्हणाले की, “आपण काय बोलावे यासंबंधी आयोजकांनी आपल्याला कल्पना दिली नव्हती, असा दावा अमोल पालेकरांनी केला. परंतु, त्यांच्यासारखा अनुभवी व जाणता वक्ता व्यासपीठाचे महत्त्व लक्षात घेऊन विवेकबुद्धीने बोलेल, अशी संयोजकांची अपेक्षा असते. औचित्यभंग करूनही बोलण्याचे जसे पालेकरांना स्वातंत्र्य आहे, तसेच तसा औचित्यभंग झाल्यास तो दर्शवण्याचे आयोजकांनाही स्वातंत्र्य आहे. घडल्या प्रकाराबद्दल नंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या. मुख्य म्हणजे कार्यक्रम प्रभाकर बरवे यांच्यासंबंधित असला तरी ते बाजूला पडले आणि अमोल पालेकरच चमकू लागले, अशी खंतही रसिकांनी व्यक्त केली. प्रभाकर बरवे यांच्यावरील या चित्रप्रदर्शनाच्या निमित्ताने त्यांच्या चित्रकलेतील महत्त्वपूर्ण योगदानाची माहिती वाचकांपर्यंत, दर्शकांपर्यंत पोहोचवण्याच्या ऐवजी प्रसारमाध्यमांत भलत्याच मुद्द्यांना महत्त्व दिले व चर्चाही चालवली गेली, ही दुर्दैवी गोष्ट आहे. पालेकरांनी जे मुद्दे मांडले ते स्वतंत्रपणे इतर व्यासपीठावर मांडण्याचे स्वातंत्र्य त्यांना आहे व त्यावर साधकबाधक चर्चाही होऊ शकते. परंतु, हे करण्याऐवजी अशा वातावरणात हे मुद्दे मांडून त्यांनी ती चर्चा विशुद्ध कलात्मक न ठेवता राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केले,” असे ते म्हणाले.

 

सध्याच्या घडीला बहुतांश प्रसारमाध्यमात चित्रकलेवर लिहिले, बोलले जात नाही. प्रभाकर बरवे यांच्यासारख्या अनेक चित्रकारांनी चित्रकला क्षेत्रात आपले अमूल्य असे योगदान दिले आहे, पण ते आता पुढे येताना दिसत नाही. काही वर्षांपूर्वी प्रसारमाध्यमांतून चित्रकलेशी संबंधित सदर, लेख प्रकाशित होत असत. एकीकडे अशी स्थिती असताना प्रभाकर बरवे यांच्यावरील चित्रांचे प्रदर्शन भरवल्यावर त्यावर बोलणे अपेक्षित होते. पण तसे घडले नाही. प्रभाकर बरवे यांच्याऐवजी पालेकर स्वतःचेच म्हणणे रेटताना दिसले. म्हणजेच कार्यक्रम बरवे यांच्याबद्दलचा पण काय बोलायचे हे ते स्वत:च ठरवून आले व त्यांनी औचित्याचा भंग केला. हे पाहून आयोजकांनी मुद्द्यावर बोला असे सांगितले तरी पालेकरांनी खिलाडूपणा घेत आपली भूमिका न सोडण्याचेच कृत्य केले. अन् अशा परिस्थितीला ते मुस्कटदाबी म्हणतात, जे दुर्दैवी आहे,” अशा शब्दांत वासुदेव कामत यांनी या प्रकरणावर भाष्य केले.

 

 
 
 
 

सांस्कृतिक मंत्रालयाचे स्पष्टीकरण

 

केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने याबाबत आपले स्पष्टीकरण देताना म्हटले की, “एनजीएमएच्या दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरु येथे असलेल्या सल्लागार समित्या अजून विसर्जित केलेल्या नाहीत. या सल्लागार समित्यांचा कार्यकाळ नुकताच संपला आहे. (मुंबई आणि बेंगळुरु येथील सल्लागार समित्यांचा कार्यकाळ १५ नोव्हेंबर, २०१८ पर्यंत होता. तसेच दिल्ली येथील सल्लागार समितीचा कार्यकाळ १७ जानेवारी, २०१९ पर्यंत होता.) या सल्लागार समित्यांची पुर्नबांधणी प्रक्रिया सध्या सुरू आहे. याआधीच्या सल्लागार समितीच्या शिफारसीनुसार, (मुंबई येथील एनजीएमएमध्ये जे डिसेंबर, २०१९ पर्यंत कार्यरत आहेत) त्यांना सन्मानित केले जाईल आणि कलाकारांचे प्रदर्शन आयोजित केले जाईल. भविष्यात होणार्‍या प्रदर्शनांसंबंधीत निर्णय नवीन सल्लागार समिती घेईल.”

 

कायमस्वरुपासाठी असलेल्या संग्रहांबाबत, एनजीएमएने हे स्पष्ट केले आहे की, स्वत:जवळील संग्रहांचे प्रदर्शन आयोजित करण्याबाबत एनजीएमएकडून प्रस्ताव मांडण्यात येईल. कला क्षेत्रातील दिग्गजांनी साकारलेल्या कलाकृतींचाही यात समावेश असेल. सुरुवातीच्या दोन वर्षांच्या कालावधीत, एखाद्या कलाकाराने कालांतराने त्याच्या कलेत केलेल्या प्रगतीचे प्रदर्शन करण्यासाठी, तसेच तात्पुरत्या काळासाठी असलेल्या प्रदर्शनांसाठी कमी जागा उपलब्ध असते. अशी शंका काही कलाकारांनी उपस्थित केली होती. कलाकारांकडून आलेल्या सूचनांवर एनजीएमए विचार करत आहे, असे स्पष्ट करण्यात आले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@