पवार कुटुंबातील चारजण लोकसभेच्या रिंगणात उतरणार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Feb-2019
Total Views |

 

 
 
 
 

खुद्द शरद पवारांसह पार्थ, अजित पवारांच्या नावांचीही जोरदार चर्चा

 

मुंबई : बहुप्रतीक्षित लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आणि नेता आपापल्या म्यानांतील शस्त्रास्त्रांची चाचपणी करू लागला आहे. २०१४ च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीत पुरते पानिपत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली असून यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील बलाढ्य भाजपला टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादीने निर्णायक ‘सुलतानढवा’ करण्याचे योजले आहे. पवार घराण्यावर भिस्त असलेल्या राष्ट्रवादीमध्ये यावेळी स्वतः अध्यक्ष शरद पवारांसह, कन्या खा. सुप्रिया सुळे, पुतणे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अजित यांचे चिरंजीव पार्थ पवार असे चारचारजण खासदारकीच्या निवडणुकीत उतरणार असल्याचे वृत्त आहे.

 

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत राष्ट्रवादीचे मोठे नुकसान झाले आणि त्यामुळे राज्यात पक्षाचे अवघे ४ खासदार निवडून येऊ शकले. त्यानंतर झालेल्या विधानसभा, महापालिका, जिल्हापरिषदा-पंचायत समित्या आणि नगरपालिकांच्या निवडणुकांतही राष्ट्रवादीची कामगिरी निराशाजनक राहिली. पुण्यासह पिंपरी-चिंचवडसारखे अनेक बालेकिल्ले पक्षाने गमावले. त्यामुळे पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्यानातील अखेरचे शस्त्र म्हणून स्वतःसकट कुटुंबातील चारजण लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसअंतर्गत विश्वसनीय सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. या रणनीतीनुसार, स्वतः शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, आ. अजित पवार व अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार असे चौघे लोकसभेच्या चार जागा लढवू शकतात. यातून संबंधित चार जागा जिंकून राष्ट्रवादीचा ‘आकडा’ वाढवणे, त्याद्वारे महागठबंधनात प्रभाव वाढवणे आणि राज्यातील पक्षाच्या इतर उमेदवारांनाही प्रोत्साहन देणे, या तीन गोष्टी साध्य कराव्या, असा शरद पवार यांचा मनसुबा असू शकतो. पैकी सुप्रिया सुळे या विद्यमान लोकसभेत पवार कुटुंबातील एकमेव निवडून आलेल्या खासदार आहेत.

 

२०१४ मध्ये शरद पवार यांनी लोकसभेची निवडणूक न लढवता राज्यसभेत जाणे पसंत केले. त्यापूर्वी २००९ मध्ये त्यांनी आपला पारंपारिक आणि सुरक्षित बारामती मतदारसंघ आपल्या कन्या सुप्रिया यांच्यासाठी सोडला व ते स्वतः शेजारच्या माढा मतदारसंघातून लढले. २०१४ च्या निवडणुकीत याच माढा व बारामती मतदारसंघांतून राष्ट्रवादीचे अनुक्रमे विजयसिंह मोहिते-पाटील व सुप्रिया सुळे हे अगदीच काठावरील मताधिक्याने निवडून आले. विशेषतः बारामतीत रासपच्या महादेव जानकर यांनी सुप्रिया यांना दिलेली कडवी लढत राज्यभर चर्चेचा विषय ठरली. हे निकाल आणि त्यानंतर विधानसभा, महापालिका आदींचे निकाल पाहता आता पुन्हा शरद पवार यांनीच रिंगणात उतरावे, आणि पक्षाची प्रतिष्ठा सावरावी, असा मोठा मतप्रवाह राष्ट्रवादीत आहे. नुकत्याच पुण्यात झालेल्या पक्षाच्या बैठकीत पवारांनी माढ्यातून लढावे, असे साकडे खुद्द तेथील खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनीच घातले होते. त्यावर पवार यांनीही ‘माझा असा कोणताही विचार नाही, परंतु कार्यकर्त्यांच्या मागणीचा विचार करू’ असे आणखी बुचकळ्यात टाकणारे उत्तर दिले होते.

 

साहेबांसाठी माढा की पुणे?

 

शरद पवार यांनी यावेळी पुण्यातून लढावे, अशीही मागणी होत असून त्यावरही नेतृत्व गांभीर्याने विचार करू शकते, अशी माहिती पक्षांतर्गत सूत्रांनी दिली. विजयसिंह मोहिते-पाटील स्वपक्षावर नाराज असून भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेले दोन वर्षांपासून आहे. त्यामुळे पवारांनी माढ्यातून लढावे, या त्यांच्या मागणीवरही किती विश्वास ठेवावा, हा प्रश्न असल्याचे सूत्राने सांगितले. तसेच, त्यामुळे यावेळी पवारांनी पुण्यातून लढावे, त्यामुळे या वयात पवारांना प्रचारासाठी गावोगाव फिरावे लागणार नाही, तसेच, आसपासच्या मावळ, शिरूर, बारामती आदि मतदारसंघांतही पक्षाला याचा फायदा होईल, असा पक्षाचा कयास आहे.

 

अजित पवारांचे काय?

 

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हेही लोकसभेच्या रिंगणात उतरणार असून शिरूर येथून लढण्याची शक्यता पक्षात दबक्या पावलांनी वर्तवली जात आहे. मात्र, अद्याप त्यावर अधिकृतपणे कोणीही शिक्कामोर्तब केलेले नाही.

 

पवारांची तिसरी पिढी..

 

शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्यापाठोपाठ अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे मावळ येथून लढणार असल्याची चर्चा गेल्या दीड-दोन वर्षांपासून आहे. या निर्णयावर जवळपास अंतिम शिक्कामोर्तब झालेही असल्याचे समजते. असे झाल्यास पवार घराण्याच्या तीन-तीन पिढ्या राजकारणात दिसू शकतील.

 

शिवसेना खासदारांना ‘टेन्शन’

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सर्व मनसुब्यांच्या पार्श्वभूमीवर मावळचे खासदार श्रीरंग बारणे व शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव हे दोघे चिंतीत असल्याचे सेनेच्या वर्तुळातून समजते. कारण, सेनेची भाजपसोबत युती न झाल्यास आणि समोर पवार कुटुंबीय असल्यास हे दोघे निवडून येण्याची शक्यता जवळपास शून्य असल्याचे राजकीय अभ्यासकांचे म्हणणे आहे. मध्यंतरी अनेक सेना खासदारांनी युती व्हावी, यासाठी पक्षप्रमुखांची मनधरणी केली होती, त्याला याच शक्यतांची पार्श्वभूमी होती. बारणे व आढळराव हे दोघेही २०१४ मध्ये मोदीलाटेत भाजप-सेना युतीच्या जोरावर मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते.

 

बारामतीचा पेपर मात्र अवघडच..

 

पवार कुटुंबियांच्या या मोठमोठ्या व्यूहरचनांची चर्चा असताना पवारांचा बालेकिल्ला बारामती मात्र अद्याप असुरक्षितच असल्याचे दिसून येते. २०१४ मध्ये महादेव जानकर यांच्याविरुद्ध लढताना सुळे अवघ्या ७० हजारांच्या मताधिक्याने जिंकू शकल्या. जानकर भाजपच्या कमळ चिन्हावर लढते, तर सुळे यांचा पराभव निश्चित होता, असे येथील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर सुळे यांनी आतापासूनच बारामतीत प्रचार सुरू केल्याचे दिसत आहे. तथापि, जानकर यांनी पुन्हा येथून निवडणूक लढवल्यास सुळे यांची परिस्थिती अवघड होऊ शकते. जानकर निवडणूक लढणार की नाही, याबाबत मात्र अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 

@@AUTHORINFO_V1@@