पालेकरांचे माकडचाळे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Feb-2019
Total Views |
 

अमोल पालेकर एकेकाळचे प्रसिद्ध वगैरे अभिनेते, दिग्दर्शक असतील, त्याबाबत दुमत नाहीच. पण गेल्या काही काळापासून अमोल पालेकरांना स्वतःचीच किंमत कवडीमोल करून घेण्याचा म्हातारचळ लागल्याचे दिसते. यातूनच ते जिथे जातील तिथे औचित्य सोडून इतरच विषयावर तोंडाची वाफ दवडताना पाहायला मिळतात. बरवे यांच्यावरील चित्रप्रदर्शनातही पालेकरांनी स्थळ-काळाचे भान सोडून विषय भरकटवण्याचाच प्रयत्न केला.

 

ख्यातनाम चित्रकार प्रभाकर बरवे यांच्या निधनानंतर सुमारे २४ वर्षांनी इनसाईड दी एम्टी बॉक्सया चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी जो प्रकार घडला, तो जितका दुर्दैवी तितकाच कलारसिकांच्या मनाला यातना देणाराच म्हटला पाहिजे. चित्रकला क्षेत्रातील प्रभाकर बरवे यांचे योगदान पाहता, सदर कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेल्या अमोल पालेकर यांनी बरवे यांची चित्रकला, शैली, योगदान आदी गोष्टींवर बोलायला हवे होते. पण तसे न होता पालेकरांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावेळी इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांच्या निमंत्रण वापसीवरून उद्भवलेल्या वादावरच उरबडवेगिरीला सुरुवात केली. पालेकरांनी केलेला हा प्रकार औचित्यभंगाचाच होता आणि आयोजकांनीही तशी विनंती करत त्यांना मुद्द्यावर बोला, असे सांगितले. मात्र, टीचभर गोष्टींचेही मोदी सरकारविरोधात भांडवल करण्यासाठी टपून बसलेल्या पालेकरांनी आयोजकांचे म्हणणे धुडकावून लावले आणि या प्रसंगाचा वापर करत मुस्कटदाबी, गळचेपी होत असल्याची भाषा केली. नंतर पत्रकार परिषदेतही अमोल पालेकरांनी अशाच प्रकारे कांगावा करत या घटनेचा संबंध मोदी सरकारशी लावण्याचा प्रयत्न केला. देशात सध्या नरेंद्र मोदी सरकारमुळे खायचे वांधे झालेल्या विरोधकांनी आघाडी उघडल्याचे दिसते. गेल्या साडेचार वर्षांपासून सरकारदरबारी केलेल्या खुशमस्करीतून मिळणाऱ्या रमण्याला मुकलेल्या कथित बुद्धिजीवी, विचारवंतांचाही यात मोठा भरणा आहे. अमोल पालेकरही त्यापैकीच एक. म्हणूनच मोदीविरोधाच्या तमाशात तारस्वरात किरकिरणाऱ्या पालेकरांनी मुंबईतल्या कार्यक्रमात मुद्दा सोडून बोलू नका, म्हणताच थयथयाटाला सुरुवात केली. अर्थात, पालेकरांसारख्या कलाकाराने एका कलाकाराच्या स्मृती जागवणाऱ्या कार्यक्रमाचा मतलबासाठी वापर करून घेत आपली कलाशून्य प्रवृत्ती दाखवली, हे बरेच झाले. निदान आता तरी जनतेला कधीकाळी आपण ज्याला डोक्यावर घेतले, ती व्यक्ती माणूस म्हणून कशी होती-आहे, हे कळेल.

 

मुंबईतील चित्रप्रदर्शनातील कार्यक्रम आणि तद्नंतर उद्भवलेल्या वादंगात प्रभाकर बरवे यांचे कार्य मात्र बाजूला सारले गेल्याचे दिसून आले. असे असले तरी प्रभाकर बरवे यांच्याविषयी जाणून घेणे आपले कर्तव्य ठरते. परिणामी जे काम पालेकरांसारख्या वक्त्याने करायला हवे होते, ते काम आता लोकशाहीच्या चौथ्या स्तंभालाच करावे लागेल. मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून शिक्षण घेतलेल्या प्रभाकर बरवे यांचे, ‘मला चित्रकार व कलेचे उपासक होऊन आयुष्यभर कलेची सेवा करण्याची इच्छा आहे,’ असे स्वप्न होते. बरवे यांनी आयुष्यभर हाच ध्यास घेत कलासाधना केली. बनारसच्या वास्तव्यात आलेल्या एकाकीपणामुळे काम भावना आणि हिंसा यांच्याबद्दलचा एक सुप्त ध्यास बरवे यांच्या मनात होता आणि तो त्यांच्या चित्रांमधल्या तत्कालीन संकेतांच्या विरोधात जाऊन केलेल्या बंडखोर मांडणीत दिसून येतो. स्विस चित्रकार पॉल क्ली यांच्या शैलीचा आणि विचारांचाही बरवे यांच्यावर प्रभाव होता. भारतात त्या वेळी अस्तित्वात असलेल्या चित्रकलेबद्दल बरवे फारसे समाधानी नव्हते. पाश्चात्य शैलीतील कोलाज,’ ‘ऑप आर्टया तंत्रांचाही त्यांच्यावर काही काळ पगडा होता. अशा अनेक घटकांनी त्यांची चित्रे घडत गेली. हा स्वतःचा शोध घेण्याचाच एक प्रयत्न होता. प्रभाकर बरवे यांच्या चित्रनिर्मिती प्रक्रियेत उत्स्फूर्तपणाला विशेष महत्त्व होते. कोऱ्या कॅनव्हासच्या पृष्ठभागावर प्रतिमा गोचरहोईपर्यंत ते तिष्ठत राहत असत. विविध वस्तूरुपांची अवकाशात उत्स्फूर्त, पण नीटसपणे मांडणी करून चित्राच्या समग्ररूपाचे भान त्यांच्या चित्रात दिसत असे. पुरातनकालीन वास्तूंसारख्या दिसणाऱ्या इमारती, बांधकामासाठी रचलेल्या विटांचे ढीग, घाटासारखी जलाशये, वाळूचे, मातीचे ढीग, पुरातनकालीन अवशेष, निसर्ग, पुरातत्त्वकालीन वस्तू आणि रोजच्या वापरातल्या वस्तू त्यांच्या चित्रांतून प्रतिमा होऊन अवतरत. सावली हा घटकदेखील प्रभाकर बरवे यांच्या चित्रातून वावरताना दिसतो. कविवृत्तीचे चित्रकार असलेल्या बरवेंच्या चित्रांमध्ये या कविमनाचाही प्रत्यय येई. एनॅमलच्या रंगांचा वापर करून चित्रकारी करणाऱ्या प्रभाकर बरवे यांच्याबद्दल शिल्पकार चरित्रकोशाच्या दृश्यकला - चित्रकला, शिल्पकला, उपयोजित कलाया खंडात विस्तृत माहिती मिळते. प्रसिद्ध चित्रकार सुहास बहुलकर यांनी या ग्रंथाचे संपादन केले असून यात वासुदेव गायतोंडे, गोरेगावकर बंधू, दीनानाथ दलाल, रवी परांजपे, सदानंद बाकरे, राजा रवी वर्मा यांच्यासह कितीतरी चित्रकारांबद्दल, त्यांच्या कलेबद्दल, शैलीबद्दल सांगितले आहे. उल्लेखनीय म्हणजे शनिवारच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुहास बहुलकर हेच भूषवत होते.

 

दुसरीकडे चित्रप्रदर्शनात उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आलेल्या अमोल पालेकर यांनी बरवे यांच्या एकूणच कलाक्षेत्रातील योगदानाला उजाळा द्यायला हवा होता. मात्र, बरवे यांच्या कलाक्षेत्रातील कामगिरीचा उल्लेख करण्याऐवजी पालेकरांनी व्यासपीठाचा वापर आपली राजकीय भूमिका मांडण्यासाठी केला. अमोल पालेकर एकेकाळचे प्रसिद्ध वगैरे अभिनेते, दिग्दर्शक असतील, त्याबाबत दुमत नाहीच. पण गेल्या काही काळापासून अमोल पालेकरांना स्वतःचीच किंमत कवडीमोल करून घेण्याचा म्हातारचळ लागल्याचे दिसते. यातूनच ते जिथे जातील तिथे औचित्य सोडून इतरच विषयावर तोंडाची वाफ दवडताना पाहायला मिळतात. बरवे यांच्यावरील चित्रप्रदर्शनातही पालेकरांनी स्थळ-काळाचे भान सोडून विषय भरकटवण्याचाच प्रयत्न केला. इथे अमोल पालेकरांच्या अंतर्मनात दडलेल्या मोदीविरोधी खुनशी व्यक्तिमत्त्वाचीदेखील झलक दिसते. खरे म्हणजे नयनतारा सहगल यांच्या निमंत्रणवापसी प्रकरणाचा सर्वच क्षेत्रातून निषेध नोंदवला गेला होता. अगदी साहित्य संमेलनाच्या विद्यमान अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनीही यावर आपले रोखठोक मत मांडले होते. तद्नंतर चला एकत्र येऊची हाळी देत सहगलबाईंना मुंबईला बोलावत पालेकरांच्याच उपस्थितीत माफी मागण्याचे सोपस्कारही पार पडले होते. तेव्हा आतापर्यंत तरी हा विषय संपायला हवा होता. मात्र, विशिष्ट पक्ष वा घराण्यासमोर निष्ठा वाहिलेल्या पालेकरांना प्रत्येकच क्षेत्राचे राजकीयीकरण करण्याची नशा चढल्याचे दिसते. यातूनच मुंबईतल्या कार्यक्रमालाही पालेकरांनी राजकीय रंग देण्याची कुरापत केली, जे कोणाही विचारी माणसाला रुचणारे नव्हते. पण त्यालाच अमोल पालेकर आणि कंपूने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला वगैरेचा रंग दिला. जे चुकीचेच होते. अर्थात, चिमुकल्या मेंदूत चिमुकल्या विचारांची पुरचंडी बांधलेल्या पालेकरांसारख्या विद्वानाला ते कसे कळेल, म्हणा? पण या एकूणच प्रकारामुळे सदर कार्यक्रमाच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला गेला आणि परिणामी, संबंधित ठिकाणी विशुद्ध कलात्मक चर्चा रंगलीच नाही, हे आणखी एक दुर्दैव.

 

प्रत्यक्ष घटनास्थळाची ही अवस्था असताना दुसरीकडे प्रसारमाध्यमांनाही प्रगल्भपणाचा गंध नसल्याची प्रचिती त्याच दिवशी आली. घटना घडल्यापासून कंठाळी आवाजात वृत्तांकन करताना बहुतेकांनी विवेकाला सोडचिठ्ठी दिल्याचे पाहायला मिळाले. माध्यमांनी या घटनेला सरकारविरोधी प्रचाराचा भाग म्हणून चालवले. पण, या सगळ्या घटनाक्रमातून अन्याय झाला तो प्रभाकर बरवे आणि त्यांच्या कार्यावर. माध्यमांकडून प्रभाकर बरवे यांच्या कार्याकडे दुर्लक्ष करण्यात आले व त्यामुळे ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेच नाही. नेमका कार्यक्रम काय, कोणाचा, कोणी आयोजित केला या गोष्टी गौण मानत पालेकरांच्या सरकारविरोधातील आरोपांचा तोबरा चघळण्यालाच सर्वांनी पत्रकारिता म्हणून सादर केले. वस्तुस्थितीचे गांभिर्य हरवलेल्या प्रसारमाध्यमांची बेजबाबदार वृत्तीच यातून दिसून येते. एका बाजूला प्रभाकर बरवे यांच्यावरील चित्रप्रदर्शनाचे आयोजन करुन कलाक्षेत्रात मूलभूत काम करणारे आयोजक तर दुसऱ्या बाजूला त्यावर पाणी फेरणारे अमोल पालेकर आणि मधल्यामध्ये परिस्थितीचे गांभिर्य नसलेली प्रसारमाध्यमे पाहता जनतेच्या जाणिवांना समृद्ध करण्याची इच्छाशक्तीच या लोकांनी गमावल्याचे दिसते. अर्थात पालेकरांसारख्या मंडळींचीही तीच मनिषा असल्याने ते बावचळ्यागत वागताना दिसतात. पण आताचा काळ बदलला आहे आणि तुमचे माकडचाळे पाहायला कोणाला वेळ नाही, हेही त्यांना ठणकावून सांगायला हवेच.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@