लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Feb-2019   
Total Views |

 

 
 
 
महाराष्ट्राचे थोर नेते, पुरोगामी विचारवंत, गोरगरिबांचे कैवारी, जाणते राजे, लोकशाहीचे ‘पाचवे स्तंभ’ असं बरंच काय काय असणारे एक विभूतिमत्त्व म्हणजे आदरणीय शरच्चंद्र पवारसाहेब. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या लोकशाहीसाठी पवार यांनी आजवरच्या कारकिर्दीत दिलेले योगदान नि:संशयपणे अत्युच्च दर्जाचे आहे. विशेषतः, त्यांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस नामक पक्षाची स्थापना केली, तेव्हा तर या दर्जाचा स्तर महाराष्ट्राच्या अवकाशात मावेनासा झाला. त्यानंतर धरणसम्राट अजितदादा पवार, ‘सेल्फीविथखड्डा’ सम्राज्ञी सुप्रियाताई सुळे यांना राजकारणात आणून पवार साहेबांनी भारतीय लोकशाहीची मुळे आणखी घट्ट केली. आता या मुळांना खतपाणी घालण्यासाठी म्हणून पवारसाहेबांनी एक नवा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे. हा निर्णय म्हणजे, यावेळच्या लोकसभा निवडणुकांत म्हणे, पवार कुटुंबातील (की घराण्यातील?) चार चारजण निवडणुकांच्या रिंगणात उतरणार आहेत. यामध्ये स्वतः शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रिया सुळे हे तर आहेतच आणि त्यांच्यासोबत अजितदादांचे चिरंजीव पार्थ पवार हेही असण्याची शक्यता आहे. वास्तविक, थोरल्या पवार साहेबांनी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर करून पाच-सात वर्ष उलटली असतील. परंतु, पवार साहेबांनी दिलेल्या शब्दाचं किंवा केलेल्या घोषणेचं पुढे काय होतं, हे महाराष्ट्रातील तालुक्या-तालुक्याला ठाऊक आहे. (कारण, पवार साहेबांनी अख्खा महाराष्ट्र पालथा घातला आहे म्हणतात) त्यामुळे तो भाग एकवेळ बाजूला ठेऊ. मागच्या वेळेस पवारसाहेब न लढल्यामुळे कार्यकर्त्यांचा फारच हिरमोड झाला. यावेळेस म्हणे खुद्द विजयसिंह मोहिते-पाटील यांनीच पवारांना तुम्ही माढ्यातून लढा असं साकडं घातलं आहे. आता यामागे मोहितेंचा नेमका हेतू काय असावा, हे मात्र सांगता येणार नाही. मागे २००९ मध्ये नाही का, याच मोहिते-पाटलांना पंढरपुरातून लढावं लागलं. त्यात पराभूत होऊन काहीकाळ राजकीय विजनवासात जावं लागलं... असो. त्याचा इथे काहीच संबंध नाही. आणि असलाच, तरी पवारसाहेब घेतीलच की काय ते बघून. २००९ मध्येही शरद पवार माढ्यातून सव्वातीन लाखांनी निवडून आले होतेच की. तसेच ते यावेळी उभे राहिले तरी, निवडून येतीलच. हे वर्ष २०१९ असलं म्हणून काय झालं...
 

बारामतीतील घड्याळाची टीकटीक...

 

अजितदादा विधानसभा सोडून लोकसभेसाठी लढण्याची शक्यता अगदीच धूसर वाटते. ते काय छगन भुजबळ किंवा सुनील तटकरे थोडीच आहेत! म्हणजे ते शिरूरमधून लढण्याबाबत वृत्त जरी विविध माध्यमे देत असली तरी, त्याकडे लक्ष देण्याची फारशी गरज वाटत नाही. लक्ष दिले पाहिजे ते त्यांच्या चिरंजीवांच्या संभाव्य राजकारणप्रवेशाचे. या युवराज्याभिषेकाची खमंग चर्चा गेल्या वर्षा-दीड वर्षापासून आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तर कधी एकदा धाकले साहेब निवडणुकीत उतरतात, अशी आतुरतेने वाट पाहत आहेत म्हणे. आधी स्वत: पवार साहेब, मग अजितदादा, मग सुप्रियाताई आणि आता पार्थ पवार... असे पवार घराण्यातील एकेक सदस्य राजकारणात उतरत असतील, तर त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसअंतर्गत नव्या युवा नेतृत्वाला पुढे येण्यास बळ मिळू शकेल. अर्थात, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात काय होईल आणि काय नाही हा पवारांचा कौटुंबिक प्रश्न आहे. त्यात आपण काही वक्तव्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. प्रश्न उरतो तो बारामतीचा. पवारसाहेबांचा अभेद्य किल्ला म्हणून बारामती राज्यात नाही, तर सार्‍या देशात ओळखली जाते. हा किल्ला इतका अभेद्य की राष्ट्रवादी काँग्रेसचा... माफ करा, पवार कुटुंबातील कोणी उमेदवार इथे अगदी तीन-सव्वातीन लाखांच्या मताधिक्याच्याही खाली आला तरी ती अप्रतिष्ठा मानली जाते. जिंकणं-हरण्याचा तर काही विषयच नाही. २०१४ मध्ये ताईंचं मताधिक्य ७० हजारांवर आलं, हा भाग अलहिदा. त्यावेळी म्हणे महादेव जानकर कमळ चिन्हावर लढते तर ताई पडल्या असत्या. पवार साहेब किंवा त्यांच्या कन्या निवडणुकीत पराभूत होणार आणि तेही बारामतीतून, हे साताजन्मात तरी शक्य आहे काय? त्यात सुप्रिया सुळे या काही साध्यासुध्या नेत्या नाहीत. ‘सेल्फी विथ खड्डा’ किंवा अशा अनेक मोहिमांतून त्यांनी केवढी ती जनजागृती केली. सुप्रियाताई स्वकर्तृत्वावर पुढे आलेल्या नेत्या आहेत. मात्र, यावेळची निवडणूकही ताईंना अवघड जाणार, असं काही नतद्रष्ट म्हणत आहेत. असो. आधी निवडणूक आणि उमेदवार्‍या जाहीर तर होऊ द्या. केवळ बातम्या किंवा वक्तव्यांवरून आपण लगेच स्वर्ग गाठण्यातही काही अर्थ नाही. कारण, पवार साहेबांनी काही सांगितलं, म्हणजे ते होईलच, याची शाश्वती खुद्द परमेश्वरही देऊ शकणार नाही!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@