नकळत सारे घडते !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Feb-2019   
Total Views |
 

 
 
 
सध्या पन्नाशीच्या आसपास असलेल्या पिढीत व. पु. काळे यांची कथाकथने अत्यंत लोकप्रिय होती, किंबहुना तशी ती आजही आहेत आणि नव्या पिढीलादेखील ती आवडतात. मिश्कील तरीही अर्थगर्भ कथांसाठी वपु ओळखले जातात. त्यांच्याच एका गोष्टीमध्ये एक गमतीशीर वाक्य आहे. कथेचे नायक स्वत: लेखकच आहेत. हाय ब्लड प्रेशरचा त्रास असलेले हे लेखक महोदय ’आपल्या ऑफ़िसमधील कर्मचाऱ्यांना या त्रासाबाबत कुतुहल आहे पण संवेदना मात्र नाही’ हे दर्शविण्याकरिता भाष्य करतात, ’ऑफ़िसमध्ये जेवढी मंडळी मला ओळखतात, ती सर्व माझी जिवाभावाची मित्रमंडळी आहेत असं मी मानत नाही. त्यामुळे बऱ्याच जणांच्या मनात ’माझं जर काही बरं-वाईट झालंच तर ते शनिवारी दुपारी होऊ नये’ असं असतं.’ यातला विनोदाचा भाग सोडला तरी ज्याला ऑफ़िस संस्कृती असं म्हटलं जातं ती कमी-अधिक फ़रकाने सर्वत्र अशीच असते. शेवटी लेखक मंडळीदेखील लिहितात ते स्वत:च्या अनुभवांतून आणि निरीक्षणांतूनच.
 
अर्थात जिथे केवळ कागदी घोडेच नाचवायचे आहेत किंवा की-बोर्डच बडवायचे आहेत अशा ऑफ़िसेसमध्ये एक वेळ असे वातावरण चालुनही जाईल पण सामाजिक प्रकल्पांमध्ये मात्र असा कोरडेपणा असून चालत नाही. एक तर ज्या संवेदनेतून प्रकल्प सुरु झाला ती संवेदना आणि प्रकल्प चालवताना आवश्यक असलेली कौशल्ये या दोन्ही गोष्टी साधण्याकरिता खास प्रयत्न करावे लागतात. यात मुख्य आव्हान असते ते निरनिराळ्या वातावरणांतून एकत्र आलेल्या आणि निरनिराळ्या स्तरांवर काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांची संच-बांधणी करण्याचे. ’आपण एका मोठ्या कामाचा भाग आहोत आणि आपल्याला एकत्रित काम करायचे आहे’ ही भावना जर सर्वांमध्ये रुजवता आली तर परिणाम चांगले मिळतातच. अर्थात त्यासाठी प्रशिक्षणांची एक रचना ठरवावी लागते. जनकल्याण रक्तपेढीमध्ये निरनिराळ्या स्तरांवर असे प्रयत्न सातत्याने चाललेले असतात.
 
मला आठवते, मी रक्तपेढीत रुजू होण्याआधी मला दोन-तीन सहकाऱ्यांसह दत्ताजी भाले रक्तपेढी, औरंगाबाद इथे दोन दिवस पाठविण्यात आले होते. येथील सुप्रसिद्ध डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या भव्य परिसरामध्ये वसलेली ही रक्तपेढी म्हणजे महाराष्ट्रातील एक अग्रगण्य रक्तपेढी तर आहेच शिवाय एकूण १६ रक्तपेढ्यांच्या ’जनकल्याण साखळी’मधील एक महत्वाची रक्तपेढी म्हणूनही ती ओळखली जाते. तांत्रिकता, व्यवस्थापन, सामाजिकता या सर्वच दृष्टीने अत्यंत नीटनेटकी असलेली ही रक्तपेढी पाहणे हा खरोखरीच एक विलक्षण अनुभव होता. या पहिल्याच भेटीत ’आपले साध्य काय आहे’ याचा एक पुसटसा अंदाज येऊन गेला आणि खरे सांगायचे तर जरा दडपणही आले. या भेटीत डॉ. अश्विनीकुमार तुपकरी, डॉ. महेंद्रसिंह चौहान, डॉ. मंजुषा कुलकर्णी, श्री. प्रसन्न पाटील इ. दिग्गजांबरोबर झालेले संवाद आमच्या रक्तपेढीतील वाटचालीसाठी खऱ्या अर्थाने दिशादर्शक ठरले. अर्थात माझ्यापुरती प्रशिक्षणाची सुरुवात इथून झाली असली जनकल्याण साखळी रक्तपेढीतील सर्व रक्तपेढ्यांमध्ये विविध स्तरांवर काम करणाऱ्या सर्वांचे नियमित प्रशिक्षण साखळीमधीलच निरनिराळ्या ठिकाणी होतच असते. यात मदतनीस मावश्यांपासून ते रक्तपेढी-संचालकांपर्यंत सर्व श्रेणी अंतर्भूत आहेत.
 
पुण्याच्या जनकल्याण रक्तपेढीने तर याला आणखी वेगळ्या प्रयोगांची जोड दिली आहे. दोन वर्षांपूर्वी प्रथमच जनकल्याण रक्तपेढीत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा एक निवासी वर्ग सिंहगड पायथ्याला आयोजित केला गेला. ’निवासी वर्ग’ हा प्रयोग सहभागी अधिकाऱ्यांसाठी अगदीच नवीन होता. रक्तपेढीसारख्या ठिकाणी अत्यंत धकाधकीच्या दैनंदिन वेळापत्रकामध्ये चर्चेत न येऊ शकणारे परंतु कामाच्या दृष्टीने महत्वाचे असणारे विषय या एकत्रीकरणामध्ये सहजपणे चर्चेत आले. त्याबरोबरच अन्यही काही हलकेफ़ुलके विषय त्यात ओघानेच आले. वातावरण आपोआप मोकळे झाले. सहनिवासामुळे एक प्रकारचा आपलेपणा निर्माण झाला. भरपूर हास्यविनोदांमुळे ताण हलके झाले. रात्री कॅंप-फायरभोवती सर्वांचे सुप्त कलागुणही समोर आले. या सर्व वातावरणाचा सकारात्मक परिणाम नंतरच्या दैनंदिन कामावर न झाला तरच नवल. उलट ठराविक कालांशानंतर असे एकत्रित भेटणे गरजेचे आहे असा स्वाभाविक सूर सर्वांचाच आला आणि त्यानुसार योजनाही ठरत गेल्या. यापुढे असाच वर्ग झाला तो पुढील श्रेणीचा, म्हणजे पर्यवेक्षकांचा. आपल्या दैनंदिन व्यवहारांशी निगडीत विषयांवरील चर्चासत्र, विषयमांडणी इ. बरोबरच मैदानी खेळांपासून ते परस्परांच्या सविस्तर परिचयापर्यंत वैविध्यपूर्ण विषय यात झाले. या निमित्ताने अनेकांचे संघर्षमय जीवन – जे एरवी कधी लक्षात आले नसते – सर्वांच्या समोर आले. याच वर्गात बोलताना एका महिला तंत्रज्ज्ञाने सांगितले, ’दिवसभर प्रयोगशाळेत काम करताना सहजपणे जाणवणारी एक गोष्ट म्हणजे बऱ्याचदा आपल्याकडे रितसर नोंद न झालेली अशी अनेक थॅलेसेमियाग्रस्त बालके रक्तघटकांच्या अपेक्षेने येतात. आपल्या हे लक्षातही येते की फ़ार दुर्मीळ रक्तगट नसुनही या मुलांना - बहुधा मोफ़त सेवा द्यावी लागेल यामुळे - काही रक्तपेढ्या सरसकट ’जनकल्याण’मध्ये पाठवून देतात. असे असतानाही बाकी कुठचाही विचार न करता येणाऱ्या कोणत्याही थॅलेसेमियाग्रस्त बालकाला आजवर कधीही आपण सेवा नाकारलेली नाही किंवा चकरा मारायला लावलेले नाही. कामाच्या प्रचंड व्यापामध्येही ही गोष्ट जाणवते आणि त्यामुळे काम करायला आणखी छान वाटते.’ हे सांगताना ती स्वत:च खूप भावूक झाली होती. जनकल्याण रक्तपेढीचे धोरण प्रत्यक्षात राबविणाऱ्यांची मनोभावना यावेळी सर्वांना पहायला मिळाली. अर्थात प्रत्येक वेळी चांगल्याच गोष्टी वर येतील असेही नाही, तसे ते अपेक्षितही नाही. उलट, जे ’नकोसे’ आहे तेही कधीतरी पृष्ठभागी यायलाच हवे की. अन्यथा ते बाहेर कसं काढणार ?
 
औपचारिक प्रशिक्षणातून संभाषण, दूरध्वनी-संभाषण, समुपदेशन, लेखन, संगणक-उपचार यांसारखी आवश्यक कौशल्ये शिकायला मिळतात तर अनौपचारिक एकत्रीकरणांमधून मनं ताजीतवानी होतात. दोन्ही गोष्टी सारख्याच आवश्यक आहेत. रक्तपेढीच्या मार्फ़त आजवर जे जे प्रशिक्षणांचे कार्यक्रम झाले त्यात या दोन्ही गोष्टींचा सुंदर मेळ घातला गेला आहे. अगदी अलिकडील गोष्ट. ’जनकल्याण’ पुणे चे संचालक डॉ. अतुल कुलकर्णी यांना ’जनकल्याण रक्तपेढी साखळी’मधील महाड येथील रक्तपेढीमध्ये एका बैठकीसाठी जायचे होते. यावेळी त्यांनीच मांडलेल्या कल्पनेनुसार यावेळी निवडक पर्यवेक्षक आणि अधिकारी अशी एक सहाजणांची टीमही यावेळी डॉ. कुलकर्णी यांच्यासह गेली. सर्वजण भल्या सकाळी पुण्यातून निघाले आणि पाचाड येथे जिजाऊंच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेऊन थेट रायगडावर पोहोचले, तेही गड चढत. सर्वांच्याच दृष्टीने अत्यंत अविस्मरणीय असा हा अनुभव ठरला. रायगडासारख्या पवित्र ठिकाणाचे प्रत्यक्ष दर्शन आणि त्याला जोडुन अनौपचारिक सादरीकरणांतून घेतली गेलेली काही औपचारिक सत्रे – या दोन्हींचा उत्तम मेळ जमुन आला. त्यामुळे महाडमधील डॉ. कुलकर्णी यांच्या प्रस्तावित बैठकीबरोबरच हीदेखील एक समांतर बैठक होऊन गेली. या समांतर बैठकीची सुरुवात झाली ती पुण्याला सर्वजण गाडीत एकत्र बसल्यावर आणि त्यानंतरची सत्रे पार पडली ती गड चढताना, राजदरबारात आणि छ. शिवरायांच्या समाधीस्थळी. या ’बैठक कम सहली’चा समारोप झाला तो भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लढ्यामुळे अमर झालेल्या महाडच्या चवदार तळ्यावर. या सर्व ठिकाणांची महतीच अशी होती की निम्मं प्रशिक्षण तर इथेच होऊन गेलं. त्यातही जे विषय झाले त्यात सर्वजण एकाच - मित्रत्वाच्या पातळीवर होते. या वातावरणातून एक नवीन ऊर्जा न मिळाली तरच नवल. शिवाय या निमित्ताने महाडची जनकल्याण रक्तपेढी सर्वांना पाहता आली. तेथील अधिकारी आणि सेवक वर्गाने केलेले आतिथ्य हाही एक सुंदर अनुभव होताच. त्यामुळे हा संपूर्ण कार्यक्रम एक निराळेच प्रशिक्षण देऊन गेला.
 
अर्थात प्रशिक्षण हा शब्द तसा नीरस आहे. पण या नीरसतेला जेव्हा अशा अकृत्रिम अनौपचारिकतेची जोड मिळते तेव्हा त्यातून चैतन्य बहरते आणि अपेक्षित परिणामही साधून जाते. म्हणूनच ’तुम्ही एक टीम आहात’ असे हॅमरींग करीत राहण्यापेक्षा ’आम्ही एक टीम आहोत’ असे आतूनच वाटायला लावणारे वातावरण निर्माण करण्यावर जनकल्याण रक्तपेढीचा भर आहे आणि यातुनच अपेक्षित असलेले ’सारे नकळत घडते’ हा आजवरचा अनुभवही आहे. गरजू रुग्णांना उत्तम रक्तसेवा देण्याकरिता रक्तपेढीत असे वातावरण असणे ही गरज आहे. सर्व प्रशिक्षणे चालतात ती यासाठीच !
 
 
 
- महेंद्र वाघ
 
@@AUTHORINFO_V1@@