भूशास्त्रीय कालमापन-अंक दुसरा..

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Feb-2019   
Total Views |

 


 
 
         ज्युरॅस्सिक कालखंड - एक कल्पनाचित्र
 
 
आपण पृथ्वीच्या इतिहासातील विविध कालखंडांची माहिती घेण्यास सुरुवात केली होती. पृथ्वीच्या जन्मापासून सुरुवात करून आपण जवळजवळ ३.८ अब्ज वर्षे वर्तमानकाळाकडे आलो होतो व सुमारे ५५० दशलक्ष वर्षांवर येऊन थांबलो होतो. या सगळ्या काळाला ‘प्रीकँब्रियन इऑन’ असे म्हणतात हेही आपण पाहिले. या लेखात आपण ‘प्रीकँब्रियन इऑन’च्या शेवटापासून आत्ताच्या क्षणापर्यंतचा इतिहास बघू. मागच्याच लेखात म्हटल्याप्रमाणे आपण काही ठराविक कालखंडच निवडणार आहोत.
 

प्रीकँब्रियन इऑन’मधल्या ‘प्रोटेरोझोईक एरा’च्या शेवटी शेवटी बहुपेशीय सजीव अस्तित्वात आले, हे आपण गेल्या लेखात पाहिलेच. ‘प्रीकँब्रियन इऑनसंपल्यानंतर दुसरे इऑन सुरू झाले व तेच इऑन आजतागायत चालू आहे. या इऑनचे नाव आहे, ‘फानेरोझोईक इऑन’ (Phanerozoic Eon). या इऑनचे तीन एरामध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यातला पहिला एरा आहे ‘पॅलेओझोईक एरा’ (Palaeozoic Era). ‘पॅलेओझोईक’ या शब्दाचा अर्थ प्राचीन सृष्टीचा (Palaeozoic, Palaios - Old/-Ancient आणि Zoon- Life, हे ग्रीक शब्द आहेत) कालखंड असा आहे. या एरामध्ये सृष्टीची भरभराट सुरू झाली. हा कालखंड अंदाजे ३०० दशलक्ष वर्षांचा असून सुमारे ५५० दशलक्ष वर्षांपूर्वी सुरू झाला व सुमारे २५० दशलक्ष वर्षांपूर्वी संपला. या एरामध्ये विविध कालावधींत अस्तित्वात असलेल्या सजीवांचे जीवाश्म पृथ्वीवर अनेक ठिकाणी सापडलेले आहेत. या एरामधला पहिला कालखंड आहे ‘कँब्रियन’ (Cambrian). हा सुमारे ५५० दशलक्ष वर्षांपूर्वी सुरू झाला व सुमारे ४८० दशलक्ष वर्षांपूर्वी संपला. हा पृथ्वीवरचा असा पिरिएड आहे, ज्यात सर्वांत जास्त प्रकारच्या प्रजाती उदयास आल्या. या घटनेला ‘कँब्रियन विस्फोट’ (Cambrian Explosion) असे म्हटले जाते. या वेळेचे मुख्य सजीव म्हणजे अपृष्ठवंशीय (Invertebrate) अर्थ्रोपॉड (Arthropod). याबरोबरच एकपेशीय वनस्पती आणि जीवाश्मशास्त्रात सर्वज्ञात असलेले ‘ट्रायलोबाईट्स’ही (Trilobites) अस्तित्वात होते.

 
दुसरा कालखंड येतो तो ‘ओर्डोव्हिसियन’ (Ordovician), जो ४४० दशलक्ष वर्षांपूर्वी संपला. यात काही असे सजीव निर्माण झाले, जे आजही अस्तित्वात आहेत, उदाहरणार्थ, प्रवाळ (Coral). याचवेळी सजीवांनी पाण्यातून जमिनीवर स्थलांतरही केलं. याच वेळी एक मोठा हिमीकरणाचा प्रसंग (Glaciation) घडला व मोठ्या प्रमाणात सजीव मृत्युमुखी पडले. हा प्रसंग जगाच्या इतिहासातील पाच मोठ्या महाविलुप्ततेच्या (Mass-Extinction) प्रसंगांमधला एक आहे. ‘ओर्डोव्हिसियन’ कालखंडानंतर येतो तो ‘सिल्युरियन’ (Silurian) कालखंड. हा कालखंड ३७ दशलक्ष वर्षे चालला. यामध्ये पृथ्वीवर आधीच्या विलुप्ततेनंतर पुन्हा सृष्टी फुलायला लागली. या वेळी पाण्यात तसेच जमिनीवरही सजीव अस्तित्वात आले. ‘सुल्युरियन’ नंतर येणारा ‘डेव्होनियन’ (Devonian) कालखंड सुमारे ६० दशलक्ष वर्षे चालला. याला मत्स्यांचे युग (Age of Fishes) असेही म्हणतात. नावाप्रमाणेच यामध्ये माशांच्या अनेक प्रजाती अस्तित्वात आल्या. तसेच वनस्पतींची भरभराट झाली. हे सर्व असताना हा कालखंड संपताना जगातला दुसऱ्या क्रमांकाचा महाविलुप्ततेचा प्रसंग घडला. यात पृथ्वीवरील जवळजवळ ७० टक्के प्रजाती नष्ट झाल्या. पुढे येतो तो ‘कार्बोनिफेरस’ (Carboniferous) कालखंड. हा जवळजवळ ६० दशलक्ष वर्षे चालला. यामध्ये चिखलाचे साम्राज्य पसरले होते. यामध्ये पहिले सरपटणारे प्राणीही अस्तित्वात आले. ‘पॅलेओझोईक’ एराचा शेवटचा कालखंड आहे ‘परमियन’ (Permian). हा सुमारे ५० दशलक्ष वर्षे चालला. यात पँजिया हे महाखंड तयार झाले. या काळाच्या शेवटी मात्र हे पँजिया कोरडे पडायला सुरुवात झाली. शेवटी तर अंतर्गत पँजियाचे वाळवंटात रुपांतर झाले. याच्या शेवटी तिसरी महाविलुप्ततेची घटना घडली व त्यात ९५ टक्के सजीवांचा नाश झाला.
 
 

 
 
डायनोसॉरचा जीवाश्म
 
 
पॅलेओझोईक एरा संपल्यावर सुमारे २५० वर्षांपूर्वी ‘मेसोझोईक’ (Mesozoic) एरा सुरू झाला. ‘मेसोझोईक’ या शब्दाचा अर्थ ‘मध्यम काळातली सृष्टी’ (Mesozoic, Meso - Middle आणि Zoon - Life) असा आहे. या एराला ‘सरपटणाऱ्या प्राण्यांचे युग’ (Age of Reptiles) किंवा डायनोसॉरचे युग (Age of Dinosaurs) असेही म्हणतात. या एरामध्ये तीन कालखंड आहेत. त्यांतील पहिला आहे ‘ट्रायॅस्सिक’ (Triassic). ‘पॅलेओझोईक’ एरा संपल्यानंतर सुरू झालेला हा पहिला काळ आहे. हा सुमारे २५० दशलक्ष वर्षांपूर्वी सुरू झाला आणि सुमारे २०० दशलक्ष वर्षांपूर्वी संपला. याच्या सुरुवातीला पँजियामध्ये वाळवंटांचे साम्राज्य होते. त्यातच ९५ टक्के सजीव हे महाविलुप्ततेमध्ये नष्ट झाले होते. हळूहळू पुन्हा एकदा विविध प्रकारचे सजीव निर्माण व्हायला सुरुवात झाली. एकपेशीय वनस्पती, प्रवाळ यांसारखे सजीव बहरले, तर निरनिराळ्या प्रकारचे सरपटणारे प्राणी अस्तित्वात आले. विविध प्रकारचे कीटकही अस्तित्वात आले. तसेच सरपटणाऱ्या प्राण्यांचा आकार मोठा होत गेला आणि मगरींसारखे प्राणी तसेच डायनासोर अस्तित्वात आले. परंतु, या कालखंडाच्या शेवटी पृथ्वीच्या इतिहासातील चौथा महाविलुप्ततेचा प्रसंग घडला व पृथ्वीवरील २५ टक्के सजीव मृत्युमुखी पडले. ‘ट्रायॅस्सिक’ नंतर आला ‘ज्युरॅस्सिक’ (Jurassic) काळ. १४५ दशलक्ष वर्षांपूर्वी हा संपला. दमट व उष्णकटिबंधीय वातावरण असल्यामुळे सृष्टीच्या विकासाला हातभार लागला. डायनोसॉरच्या अनेक प्रजातींनी पृथ्वी भरून गेली होती. हे डायनोसॉर जमिनीवर तसेच पाण्यातही होते. उडू शकणारे डायनोसॉरही या काळात निर्माण झाले होते. ‘मेसोझोईक’ एरामधला शेवटचा कालखंड आहे, ‘क्रेटॅशियस’ (Cretaceous). ४५ दशलक्ष वर्षे कालावधी असलेला हा काळ १०० दशलक्ष वर्षांपूर्वी संपला. सर्वत्र डायनोसॉरचे साम्राज्य होते. सर्व खंडे एकमेकांपासून वेगळी होऊन त्यांच्या आत्ताच्या जागी जायला लागली होती. विविध प्रकारची झाडे या काळात बहरली. याच वेळी भारतातील दख्खनमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक चालू होता व आपले दख्खनचे पठार तयार होत होते. हे सर्व चालू असतानाच सुमारे ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी कुठूनतरी एक प्रचंड मोठा अशनी (Asteroid) भिरभिरत आला आणि पृथ्वीवर आदळला. हा आघात इतका मोठा होता की, या एका आघातात पृथ्वीवरील ७५ टक्के सजीव विलुप्त झाले. हा जगातला पाचवा आणि सर्वांत अलीकडील महाविलुप्ततेचा प्रसंग आहे. डायनोसॉरचे युग इथेच संपले.
 
 

 
 
 
ट्रायलोबाईटचा जीवाश्म
 
‘मेसोझोईक’ एरा संपल्यावर जो एरा आत्ता सुरू आहे, तो एरा सुरू झाला. याचे नाव आहे ‘सेनोझोईक’ एरा (Cenozoic). याला ‘सस्तनांचे युग’ (Age of Mammals) असेही म्हणतात. याचा अर्थ या एरामध्ये डायनोसॉरच्या काळात तुलनेने फारच कमजोर असलेले सस्तन प्राणी आता विपुलतेने आढळायला लागले. या एरामध्येही तीन कालखंड आहेत. त्यातला पहिला आहे ‘पॅलेओजीन’ (Palaeogene). ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी सुरू होऊन हा सुमारे २३ दशलक्ष वर्षांपूर्वी संपला. या काळात गर्भ असलेले प्राणी तयार झाले. समुद्रांमध्ये शार्क मासे विपुल प्रमाणात होते आणि सरपटणारे प्राणी फारच कमी प्रमाणात जीवंत होते. नंतर येणारा ‘निओजीन’ (Neogene) कालखंड हा अगदी आत्ताच म्हणजे अडीच दशलक्ष वर्षांपूर्वी संपला. याच काळात टेथिस समुद्र पूर्णपणे नकाशातून पुसला गेला व त्या जागी भूमध्य समुद्र, कॅस्पियन समुद्र यासारखे समुद्र शिल्लक राहिले होते. सुरुवातीच्या काळातच आत्ताची आधुनिक झाडे निर्माण झाली. या काळात आधुनिक वनस्पतींचा विकास झाला. याच वेळी मानवाचे पूर्वज म्हणजे ‘एप’ (Ape) निर्माण झाले होते. आत्तापर्यंतच्या इतिहासातील शेवटच्या एरामधला शेवटचा कालखंड आहे, ‘क्वाटर्नरी’ (Quaternery). याच्या सुरुवातीला हिमयुगे येऊन पृथ्वीचे तापमान थोडे थंड झाले. यातच ‘मॅमथ’ (Mammoth) सारखे प्रचंड आकाराचे सस्तन प्राणी तयार झाले. याच वेळी ‘होमो सॅपियन’ (Homo Sapian) म्हणजेच आदिमानवही अस्तित्वात होता. हा कालखंड अजूनही चालू आहे. तर इथे आपण आहोत, २१ व्या शतकात. पृथ्वीच्या ४५०० दशलक्ष वर्षे लांबलचक इतिहासाच्या शेवटी. या इतिहासात तब्बल चार आठवडे डोकावल्यानंतर पुढील लेखांमध्ये आपण पृथ्वीवरील सर्व खंडांची माहिती बघूया.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@