मराठी साऊंड इंजिनियरचा जागतिक सन्मान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Feb-2019
Total Views |



मुंबई : आपण करियर म्हणून निवडलेल्या क्षेत्रातली मानाची सर्वोच्च पदवी मिळणं ही प्रत्येकासाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट असते. अनेक वर्षांची मेहनत, त्यातील व्यासंग आणि अनुभव यांचं फलित म्हणजे तो सन्मान. मराठी हिंदी सिनेसृष्टीतले सुप्रसिद्ध साऊंड इंजिनियर प्रमोद चांदोरकर’ यांना फ्रान्‍स येथील 'एकोले सुपीरियर रॉबर्ट डी सोरबॉन' या विद्यापीठाने ‘साऊंड रेकॉर्डिंग अँड ऑडिओ टेकनॉलॉजी’ या विषयात बहुमानाची अशी 'डॉक्टरेट' ही पदवी प्रदान केली आहे. २५ वर्षांचा या क्षेत्रातला अनुभव आणि या विषयातला सखोल अभ्यास या दोहोंच्या बळावर डॉ.प्रमोद चांदोरकर यांनी ही पदवी संपादित केली आहे. या निमित्ताने परदेशातील विद्यापीठातून ध्वनिमुद्रणाच्या क्षेत्रात डॉक्टरेट मिळवणारे प्रमोद चांदोरकर हे पहिले भारतीय ठरले आहेत. नुकत्याच दिल्लीमध्ये पार पडलेल्या एका सोहळ्यात त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली.

 

गेली २५ वर्षे डॉ.प्रमोद चांदोरकर साऊंड रेकॉर्डिंगच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. म्युजिक रेकॉर्डिंग, साऊंड डिझायनिंग आणि मिक्सिंग, आणि लाईव्ह साऊंड रेकॉर्डिंग या तिन्ही क्षेत्रात त्यांचा हातखंडा आहे. आजवर असंख्य चित्रपट, कार्यक्रम आणि म्युजिक शोज साठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. २००५ साली त्यांना ‘हम तुम’ या चित्रपटाच्या म्युजिक रेकॉर्डिंग साठी ‘झी अवॉर्ड’ ने सन्मानित करण्यात आले आहे तर २०१७ साली ‘फास्टर फेणे’ या चित्रपटाच्या साऊंड डिझाईन आणि मिक्सिंग साठी ‘टाइम्स टेक्निकल अवॉर्डने’ त्यांचा गौरव करण्यात आला आहे. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्यासोबत १५ वर्ष त्यांनी लाईव्ह साऊंड इंजिनियर म्हणून काम केले आहे. त्याचसोबत गेली १० वर्षे आपल्या ‘साऊंड आयडीयाज’ या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांसाठी साऊंड रेकॉर्डिंग संदर्भात विशेष कोर्सेस घेतात.

 

"वनस्पती शास्त्रातला पदवीधर असूनही या क्षेत्राच्या आकर्षणामुळे मी साऊंड इंजिनियरिंगकडे वळलो. आज याच क्षेत्रातल्या कामासाठी आणि संशोधनासाठी मला डॉक्टरेट मिळाली आहे, याचा अतिशय आनंद आहे, त्यात ही पदवी परदेशातल्या प्रतिष्ठित विद्यापीठातून मिळाल्यामुळे त्या आनंदाला सोन्याची किनार लाभली असली तरी आपल्या शिक्षण व्यवस्थेने ऑडिओ इंजिनियरिंग सारख्या कलात्मक क्षेत्राकरिता विशेष अभ्यासक्रम सुरु करणे आवश्यक आहे. ऑडिओ इंजिनियरिंग च्या शिक्षणाला आपल्या देशात तेवढेसे महत्त्व नाही, त्यामुळे त्याची उपलब्धता नाही. गेल्या काही वर्षात साऊंड इंजिनियर्सची मागणी वाढली आहे. ज्या विद्यार्थ्यांची या क्षेत्रात करियर करायची इच्छा आहे ते त्यांचा मार्ग शोधतील पण जर सरकरने या शाखेला मान्यता दिली तर या क्षेत्रासाठी ते वरदान ठरेल. जर परदेशातील विद्यापीठ यासाठी डॉक्टरेट देऊ शकते तर आपल्या शिक्षण व्यवस्थेने यातून प्रेरणा घेणे आवश्यक आहे" अशा भावना डॉ. प्रमोद चांदोरकर यांनी व्यक्त केल्या.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@