बेस्ट संप : कामगारांना घरे सोडण्यासाठी नोटीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2019
Total Views |


 


मुंबई : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारपासून संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत कोणताही तोडगा निघालेला नाही. मुंबईतील रस्त्यांवर बुधवारी एकही बस चालवली गेली नाही. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत बेस्ट प्रशासनाने ताठर भूमिका घेत बेस्ट वसाहती राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरे खाली करण्याच्या नोटीशी पाठवण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या या नोटिशीमुळे कामगारांमध्ये संतापाचे वातावरण तयार झाले असून संप आणखी चिघळणार असल्याचे वातावरण तयार झाले आहे.
 
 
मंगळवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप बुधवारीही कायम आहे. पण, यामुळे बेस्टला तब्बल ३ कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे. सुधारित वेतन करार, बोनस, सातवा वेतन आयोग आदी मागण्यांसाठी सोमवारी मध्यरात्रीपासून बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. दरम्यान, मंगळवारी शिवसेनेने बेस्ट संपातून माघार घेतली होती. सेना युनियनने दिलेले आश्वासन तोडले, असे म्हणत शिवसेना युनियनमधील सदस्यांनी राजीनामा द्यायला सुरुवात केली.
 

आम्हाला न्याय मिळवून देण्यास सेना युनियन कमी पडली आहे. त्यामुळे राजीनामा देत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. यामध्ये मुलुंडमधील १८०, विक्रोळीतील ८०, शिवाजीनगर येथील १५० आणि घाटकोपरमध्ये ४० ते ५० सदस्यांना आतापर्यंत राजीनामा दिला आहे. तर राजीनामा देण्याचे सत्र अजुनही सुरू आहे. हे सत्र असेच सुरू राहिल्यास येत्या काही दिवसात शिवसेनेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. संप मिटण्याची काही चिन्हे दिसत नसताना प्रवाशांना मात्र याचे अतोनात हाल सहन करायला लागत आहे. अशामध्ये प्रवासी लोकल आणि एसटीची मदत घ्यावी लागत आहे. तसेच, लोकलला प्रचंड गर्दीचा ताण सहन करावा लागत आहे. 

 

रिक्षा चालकांची मुजोरी

 

दुसऱ्या दिवशीही सुरू असलेला बेस्टचा संप रिक्षाचालकांच्या चांगलाच पथ्यावर पडला आहे. बेस्ट अभावी प्रवाशांचे हाल होत असताना रिक्षा चालकांची मुजोरी सुरुच आहे. रिक्षासाठी प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पश्चिम उपनगरात दिसून आले. बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने दुसऱ्या दिवशीही प्रवाशांना रिक्षा, खासगी बससाठी ताटकळत राहावे लागत आहे. बेस्टच्या संपामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खासगी वाहने आल्याने वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. शालेय विद्यार्थ्यांनाही बेस्टच्या संपाचा फटका सहन करावा लागत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@