जयद्रथाची घाबरगुंडी !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2019
Total Views |

 

 
 
 
 
खरंतर आज कौरव खूप आनंदात होते, कारण त्यांनी पांडवांचा एक महायोद्धा अभिमन्यू ठार मारला होता. दुर्योधन तर खूपच खुशीत होता. सर्व कौरव विजयोत्सव साजरा करीत होते. त्यांना वाटले, अभिमन्यूच्या मृत्यूच्या दु:खातून पांडव सावरणार नाही आणि आत्महत्याच करतील.
 

पण, अर्जुनाच्या गांडीव धनुष्याचा टणत्कार आणि श्रीकृष्णाच्या पांचजन्य शंखाचा आवाज त्यांच्या कानांवर पडला आणि कौरव त्या सुखातून हडबडून जागे झाले. दुर्योधनाच्या गुप्तहेरांनी अर्जुनाच्या प्रतिज्ञेची बातमी आणली आणि त्यामुळे जयद्रथ मात्र खूपच भेदरून गेला. तो दुर्योधनास म्हणाला, “अर्जुन आपली प्रतिज्ञा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आता मला इथून पळ काढण्याशिवाय गत्यंतर नाही. मी पुन्हा माझ्या पित्याकडे जातो. अर्जुन युद्धधर्मानुसार पळून गेलेल्या मला मारणार नाही, कारण तो धर्मानुसार वागतो.” पण, त्याचे हे भाषण स्वार्थी दुर्योधनाने हसण्यावारी नेले, कारण त्याचा स्वार्थ आणि कार्यभाग जयद्रथाने आधीच पार पाडला होता. दुर्योधन त्याला म्हणाला,“घाबरू नकोस. अर्जुन तुला काहीही करू शकणार नाही. पण, हेही विसरू नको की, आपण अभिमन्यूचा वध करताना धर्म पाळला नाहीय! अर्जुन असेही बोलला आहे की, जयद्रथ जरी शंकराच्या संरक्षणात असला तरी मी त्याचा वध करीन. त्यामुळे तू पळून जाऊन काही फरक पडणार नाही. तुला वाटणारी भीती मूर्खपणाची आहे. आम्ही इतके सारे वीर तुझ्या बाजूला असताना प्रत्यक्ष इंद्र जरी आला तरी तुला काही होऊ देणार नाही. मी स्वत: तुझे रक्षण करीन, शिवाय तूही कसलेला योद्धा आहेस. तो अर्जुन काही देव नाही, तेव्हा भीती सोड. आम्ही सारे तुझी काळजी घेऊ, आपली प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही तर अग्निप्रवेश करीन, असेही तो अर्जुन म्हणाला आहे. तेव्हा ही आयतीच संधी आपल्याला मिळाली आहे. ती फुकट घालवू नकोस. आपण त्याला संपवले की पांडव हे युद्ध हरणारच.”

 

या आश्वासनामुळे थोडा वेळ जयद्रथाचे समाधान झाले खरे, पण तो द्रोणांकडे विचारावयास गेला की, “कोण श्रेष्ठ धनुर्धर आहे, अर्जुन की मी? मला स्पष्ट उत्तर हवे आहे.” द्रोण म्हणाले, “तुम्ही दोघेही एकाच गुरूचे शिष्य आहात, पण सतत अभ्यास करून अर्जुनाने आपले कौशल्य वाढविले आहे. शिवाय त्याच्याकडे अनेक दिव्य अस्त्रेही आहेत, पण तरी तू भिऊ नकोस. अर्जुनापासून उद्या मी तुझे रक्षण करीन. मी अभेद्य असा व्यूह रचतो, जेणेकरून तुझ्यापर्यंत पोहोचणेदेखील त्याला मुश्कील होईल. त्या व्यूहाच्या प्रवेशद्वारी मीच उभा राहीन. मला ओलांडून जाणे अर्जुनाला शक्य होणार नाही, याची मला खात्री आहे. एवढा का भितो आहेस? मला मारूनच त्याला तुला मारावे लागेल. मी त्रिशूल व्यूह रचणार आहे, पहिला भाग शकटव्यूह, दुसरा चक्रव्यूह आणि शेवटी तिसरा सुचीमुख व्यूह! तुला मी शेवटच्या भागात ठेवणार आहे. शेवटच्या भागात पोहोचेपर्यंत सूर्यास्त झालेला असेल आणि अर्जुनाला अग्निप्रवेश करावा लागेल. घाबरू नकोस आणि जर रणांगणी मृत्यू आलाच तर स्वर्ग गाठशील. जा आता, उद्याची काळजी सोडून जाऊन शांतपणे झोप.” द्रोण यांच्याकडूनदेखील आश्वासन मिळाले म्हणून जयद्रथाला खूप धीर आला.

 

इकडे अर्जुनाच्या तंबूत कृष्ण आला आणि म्हणाला, “अर्जुना, तू मला विचारल्याशिवाय, अविचाराने सर्वांच्या समोर ती प्रतिज्ञा केलीस. का? तुला माहिती आहे का की तू खूप मोठ्ठी जबाबदारी आपल्या शिरावर घेतली आहेस? तुझी या जगात नाचक्की होणार नाही, अशी मला आशा आहे, पण जयद्रथाचा वध करणे सोप्पे नाही. त्याच्या संरक्षणाची धुरा प्रत्यक्ष गुरू द्रोण यांनी उचलली आहे, असे मी ऐकले. द्रोणांनी त्रिशूल व्यूह रचण्याचा बेत केला आहे. यात प्रथम भागी शकटव्यूहात ते स्वत: उभे असणार आहेत, दुसरा भाग चक्रव्यूह आणि तिसरा अभेद्य असा भाग म्हणजे सुचीमुख. सुचीमुख म्हणजे सुईचे टोक. या ठिकाणी जयद्रथ असेल, वाटेत तुला राधेय, भूरिश्रवा, अश्वत्थामा, वृषसेन, दुर्जय, कृप, शल्य, दुर्मुख आणि द्रोण अशा एकाहून एक महारथींचा सामना करावा लागणार आहे. मला तुझी फार काळजी वाटते आहे. तू ही अशी प्रतिज्ञा करायला नको होती.”

 

यावर अर्जुन म्हणाला, “कृष्णा, तू ज्यांचा नामोल्लेख केलास त्या सर्वांचा मी सहज पराभव करू शकतो. दुर्योधनाला वृथा अभिमान आहे की, त्याचा सेनापती महान आहे, पण मी द्रोणांचाही पराभव करू शकतो. तू उद्या माझा पराक्रम पाहशीलच. बघ, माझे गांडीव धनुष्य कसे तेजाने झळकेल ते! उद्या सूर्यास्तापूर्वी तो जयद्रथ ठार झालेला असेल. माझा अभिमन्यू ते स्वर्गातून पाहील. स्वत: श्रीकृष्ण माझा सारथी आहे आणि मी जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर असताना मला कसली काळजी? कृष्णा, तू मजबरोबर असताना विजय माझाच होणार.” काही काळ दोघेही एकमेकांजवळ बसून होते. एकदम अर्जुनाला सुभद्रेची आठवण आली, तो म्हणाला, “कृष्णा, मला सुभद्रेचे अश्रू पाहवत नाहीत, मला तिच्याकडे जाता येणार नाही. तू जाऊन तिचे सांत्वन कर.” कृष्ण म्हणाला, “मला कळते आहे तुला ते सोसवणार नाही, मी तिला नक्कीच भेटेन.”

 

आपल्या बहिणीला सुभद्रेला भेटायला कृष्ण गेला आणि म्हणाला, “सुभद्रे, तू तुझे दु:ख आता आवर, तुझ्या पुत्राला वीरगती मिळून त्याला स्वर्ग प्राप्त झाला आहे. तो तिथे सुखात आहे. लोकांच्या तो कायम आठवणीत राहील. त्याच्यासारखे दिव्य मरण यायला भाग्यच लागते. अशा मरणाचा शोक नसतो करायचा, उठ आणि आधी ते डोळे पूस.” सुभद्रा म्हणाली, “कृष्णा, रडण्याखेरीज मी दुसरे काय करू शकते? महावीर अर्जुन, त्याचे भाऊ आणि कृष्ण जिवंत असताना असे कसे होऊ शकते? तो महान वीर होता, शूर होता पण कोमल होता. त्याच्या बाबतीत हे असे कसे घडले? तू हे असं कसं घडू दिलंस? पांडव शूर वीर आहेत, असं मला वाटत होतं, पण ती माझी चूकच होती.”

 

कृष्ण म्हणाला, “अग, तू हे दु:खामुळे बोलत आहेस. त्याला गैरमार्गाने मारलं आहे. या लोकांनी त्याचा अधर्माने खून केलाय. या घोर कुकर्माची फळे त्यांना मिळतीलच. ते तू उद्या पाहशील. त्या पापी जयद्रथाची या पृथ्वीवरची ही शेवटची रात्र आहे. तुझा पुत्र पुण्यवान. त्याला वीराचे मरण आले. गेले तेरा दिवस चालू असलेल्या या युद्धात किती सुमातांचे सुपुत्र बळी गेले. त्यांनी हे दु:ख सहन केलेच ना? तू आत्ता हे रडणे थांबव आणि आधी त्या उत्तरेचे सांत्वन कर. तिच्या पोटी अभिमन्यूचे बाळ आहे. तुला तिचे रक्षण केले पाहिजे,” असे म्हणून श्रीकृष्ण तिला उत्तरेच्या तंबूत घेऊन गेला. मग त्या दोघींचे आणि द्रौपदीचे सांत्वन करूनच तो आपल्या तंबूत परत आला. अर्जुन त्याची वाट पाहात होता. त्याने कृष्णाच्या पूजेची तयारी केली होती. हा रोजचाच उपक्रम होता. त्याने कृष्णाची यथासांग फळे-फुले आणि मध देऊन पूजा केली. मग कृष्ण त्याला म्हणाला, “अर्जुना, जा आता जाऊन झोप. उद्या तू लढणार आहेस आणि मी तुला यश मिळावे म्हणून शर्थीने प्रयत्न करेन.”

 
 
- सुरेश कुळकर्णी 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@