पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार महाराष्ट्रातील विकासकामांचे उद्घाटन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2019
Total Views |
 
 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी महाराष्ट्रातल्या सोलापूरला भेट देणार आहेत. या भेटीत विविध विकास प्रकल्पांचा प्रारंभ आणि विविध प्रकल्पांचे भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. संपर्क आणि रस्ते वाहतुकीला चालना देत राष्ट्रीय महामार्ग- ५२ वरच्या सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद दरम्यानच्या चौपदरी रस्त्यांचे पंतप्रधान लोकार्पण करणार आहेत. सोलापूर-उस्मानाबाद महामार्गावरच्या या रस्त्याच्या चौपदरीकरणामुळे सोलापूर शहराशी मराठवाड्याचा संपर्क अधिक वाढण्यासाठी मदत होणार आहे.

 

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३० हजार घरांचे भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. कचरा वेचणारे, रिक्षा चालक, गिरणी कामगार, विडी कामगार यासारख्या गरीब, बेघर लोकांना याचा प्रामुख्याने लाभ होणार आहे. या प्रकल्पासाठी १ लाख ८११.३३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून यापैकी ७५० कोटी रुपये केंद्र आणि राज्य सरकार मदत म्हणून पुरवणार आहे. स्वच्छ भारतहे उद्दिष्ट समोर ठेऊन भूमीगत मलनि:सारण यंत्रणा आणि सांडपाणी प्रक्रिया करणाऱ्या तीन सयंत्राचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येईल. यामुळे शहराच्या स्वच्छता विषयक व्याप्तीत वाढ होणार आहे. सध्याच्या यंत्रणेची जागा ही यंत्रणा घेणार असून अमृत अभियानांतर्गत, भूमीगत लांब नाल्यांची जोडणी याद्वारे करण्यात येईल.

 

सोलापूर स्मार्ट सिटीमध्ये विभागवार आधारित विकासाअंतर्गत, पाणी पुरवठा आणि स्वच्छता यंत्रणा सुधारणा विषयक संयुक्त प्रकल्प, उज्जनी धरणातून सोलापूर शहराला होणारी पेयजल पुरवठा व्यवस्था मजबूत करण्यासाठी तसेच अमृत अभियानाअंतर्गत भूमीगत मलनि:सारण यंत्रणेची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या प्रकल्पासाठी २४४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सेवा प्रदान करण्यात आणि सार्वजनिक आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्वाचा ठरणार आहे.

 

पंतप्रधान एका जनसभेलाही संबोधित करणार आहेत. पंतप्रधानांची सोलापूरला ही दुसरी भेट आहे. याआधी १६ ऑगस्टमध्ये दिलेल्या भेटीदरम्यान त्यांनी राष्ट्रीय महामार्ग- वरच्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगतच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे भूमीपूजन केले होते. त्याचबरोबर ७६५ केवीच्या सोलापूर-रायचूर विद्युत पारेषण वाहिनीचे लोकार्पणही पंतप्रधानांनी केले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@