हिंदू अध्यात्मिक आणि सेवा प्रदर्शनाचे आयोजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2019
Total Views |


 


हिंदू संस्थांच्या सेवा कार्यांची माहिती या प्रदर्शनातून मिळणार

 

मुंबई : हिंदू संस्थांच्या सेवा कार्याची माहिती सर्वांना देण्याच्या उद्देशाने हिंदू अध्यात्मिक आणि सेवा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रदर्शनाच्या आयोजन अध्यक्षा डॉ. अलका मांडके यांनी दिली. तसेच या प्रदर्शनात येणार्‍यांना अनेक संत-सत्पुरूषांचे मार्गदर्शन लाभणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. मंगळवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. बोरीवलीतील कोरा केंद्र परिसरात दि. ११ ते १३ जानेवारी दरम्यान हिंदू अध्यात्मिक आणि सेवा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
 

आपल्या आध्यात्मिक आणि धार्मिक संस्थांच्या माध्यमातून केल्या जाणार्‍या कार्याची माहिती जनतेला व्हावी, या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात जवळपास सव्वाशे स्टॉल्स उभारण्यात येणार असून प्रत्येक स्टॉलवर त्यांच्या कार्याची माहिती देण्यात येणार आहे. हिंदू धर्म कायमच आधुनिक बाबी आत्मसाद करित आला आहे. आता युवा वर्गालाही हिंदू संस्थांच्या कार्याची माहिती याद्वारे मिळणार असल्याचे मांडके म्हणाल्या. या प्रदर्शनादरम्यान अनेक संस्था एकत्र एकाच ठिकाणी येणार आहेत. तसेच प्रदर्शनाला येणार्‍या लोकांनाही या संस्थांची माहिती घेऊन जोडले जाण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे त्या त्या संस्थांच्या कार्याची व्याप्ती वाढण्यासही मदत होणार असल्याचे त्या म्हणाल्या. प्रदर्शनादरम्यान अनेक कार्यक्रमांचे आ़योजन करण्यात आले आहे. यामध्ये कन्या वंदन, आचार्य वंदन, माता-पिता वंदन, वीर सन्मान, चाणक्य मंचन, स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम, युवा संमेलन, महिला संमेलन अशा अनेक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. २००९ सालापासून या प्रदर्शनाची सुरूवात करण्यात आली होती. तर २०१६ साली मुंबईत पहिल्यांदा हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

 

सध्या १२ प्रातांमध्ये दरवर्षी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. वन आणि वन्य जीवांचे संरक्षण, पर्यावरण रक्षण, निसर्ग अर्थात इकोलॉजीचे रक्षण, कौटुंबिक आणि मानवी मूल्यांना महत्व देणे, स्त्री सन्मानाला प्रोत्साहन देणे, राष्ट्र भावना जागृत करणे ही या प्रदर्शनाची प्रमुख उद्दिष्ट्ये असल्याची माहितीही डॉ. मांडके यांनी दिली.

 

सहभागी संस्थांच्या संख्येत वाढ

 

या प्रदर्शनात सहभागी होणार्‍या संस्थांची झपाट्याने वाढ होत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पहिल्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात केवळ १७ संस्थांनी भाग घेतला होता. परंतु २०१८ मध्ये सहभागी संस्थांची संख्या वाढून २ हजार ४७५ झाली. तर २०१७-१८ या कालावधीत तब्बल देशभरात झालेल्या प्रदर्शनाचा लाभ ४१ लाख लोकांनी घेतला असल्याचेही सांगण्यात आले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@