मुंबई ते पुणे लोकल धावणार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2019
Total Views |

 

 
 
 
 
पुणे : मुंबई ते पुणे आणि मुंबई ते नाशिक या रेल्वे मार्गावर लवकरच लोकल ट्रेन धावण्यासाठी मध्य रेल्वेकडून प्रयत्न केले जाणार आहेत. या लोकल ट्रेनची चाचणी १० जानेवारीपर्यंत कधीही होऊ शकते. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर या लोकल ट्रेन धावतील. अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
 

या रेल्वे मार्गावर घाट असल्याने या चाचणीसाठी लोकल ट्रेनची रेक ही चेन्नई येथील कारखान्यातून आणण्यात येणार आहे. चेन्नईहून हा रेक आणल्यानंतर ही चाचणी घेतली जाईल. असे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. मुंबई-पुणे आणि मुंबई-नाशिक या रेल्वे मार्गांवर प्रवाशांच्या सुविधेसाठी लोकलसेवा सुरु करावी. अशी मागणी प्रवाशांनी आणि चाकरमान्यांनी गेल्या काही दिवसांपासून केली होती. प्रवासी रेल्वे संघटना आणि काही लोकप्रतिनिधांनीही रेल्वे प्रशासनाकडे अनेकवेळा ही मागणी केली होती. या मागणीचा सतत पाठपुरावा केला जात असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने या दोन्ही रेल्वेमार्गांवर लोकल ट्रेन सुरु करण्याबाबत चाचणी सुरु केली आहे.

 

या दोन्ही रेल्वे मार्गावर घाट सेक्शन असल्यामुळे सामान्य लोकलची रेक यावर धावू शकत नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) कडे विशेष लोकल ट्रेन तयार करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आयसीएफने ही विशेष लोकल ट्रेन तयार केली आहे. ही विशेष लोकल ट्रेन १० जानेवारीनंतर कधीही मुंबईतील यार्डात दाखल होईल. ही विशेष लोकल ट्रेन आल्यानंतर तिची दोन्ही रेल्वे मार्गांवर चाचणी घेण्यात येणार आहे. पुणे-मुंबई या रेल्वे मार्गावर कर्जत हा घाट आहे. तसेच मुंबई-नाशिक या रेल्वेमार्गावर कसारा ते इगतपुरी या दरम्यान घाट आहे. या दोन्हीही रेल्वे मार्गांवर घेतलेली चाचणी यशस्वी झाल्यानंतर या रेल्वे मार्गावर नियमित रेल्वे लोकलसेवा सुरु करण्यात येईल. असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सामान्य लोकल ट्रेनला १६ चाकांवर पार्किंग ब्रेक असतात. या विशेष लोकल ट्रेनला ३२ चाकांवर पार्किंग ब्रेक असणार आहेत.

 

मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर धावणारी ही सर्वात जास्त लांबीची लोकल ट्रेन असेल. पुणे विभागातील रेल्वे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी या चाचणीचे स्वागत केले आहे. मुंबई ते पुणे लोकल ट्रेन सेवा सुरु झाल्यास वाहतुकीची समस्या सुटेल, तसेच प्रवाशांना कमी पैशात खूप सुविधा उपलब्ध होणार आहेत. पुण्यातून प्रगती एक्सप्रेस ही सकाळी आठ वाजता सुटते. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजेपर्यंत पुण्याहून मुंबईला जाणारी एकही एक्सप्रेस गाडी उपलब्ध नसते. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. परंतु आता ही विशेष लोकल ट्रेन सुरु झाल्यानंतर प्रवाशांची गैरसोय होणार नाही. एक्सप्रेस रेल्वे गाड्या या ठराविक रेल्वे स्थानकांवरच थांबतात. लोकल ट्रेन मात्र प्रत्येक ठिकाणी थांबत असल्याने प्रवाशांसाठी हे अत्यंत सोयीचे ठरणार आहे. या रेल्वेमार्गावर २५ वर्षांपूर्वी लोकल ट्रेनची चाचणी घेण्यात आली होती. परंतु रेल्वे प्रशासनाने दाखवलेल्या उदासीनतेमुळे हा प्रस्ताव बारगळला होता. आता चाचणीनंतर लवकरच या मार्गावर लोकल ट्रेन सुरु होईल. अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

 

विशेष रेल्वेचे रेक आल्यानंतर या रेल्वे मार्गावर चाचणी घेण्यात येईल. परंतु हे रेक कधी येणार आहेत याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. या विशेष लोकलची चाचणी यशस्वी झाल्यानंतर दोन्ही रेल्वे मार्गांवर लोकल ट्रेन सुरु करण्याचा निर्णय घेतला जाईल. अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली.

 

मुंबई-पुणे या रेल्वे मार्गावर कर्जत ते खंडाळा या दरम्यान घाट असल्यामुळे या मार्गावर विशेष लोकलची आवश्यकता होती. मुंबई ते पुणे हे अंतर १९२ किलोमीटरचे आहे. त्यामुळे प्रवाशांना तीन तासांपेक्षा अधिक काळ या विशेष लोकल ट्रेनमध्ये घालवावा लागणार आहे. त्यामुळे या विशेष लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांसाठी स्वच्छतागृह आणि पाण्याची सोय असणे आवश्यक आहे. सध्याच्या लोकलमध्ये ही सुविधा नाही. लोकलची दुरुस्ती पुण्यात होत नाही. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता या मार्गावर लोकल धावणे कठीण वाटत आहे. झोनल रेल्वे यूझर्स कन्सल्टेटिव्ह कमिटीचे सदस्य नितीन परमार यांनी ही माहिती दिली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@