अर्थार्जनासोबत समाजकारणाचा ध्यास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2019
Total Views |

 

 मळलेल्या पायवाटेवरून न जाता राजेशने तलासरीमध्ये साई दूध डेअरी सुरू केली आणि तलासरी तालुक्यातील आपल्या ढोडी या आदिवासी समाजासाठी जागतिकीकरणाच्या युगात नव्या संधीच्या वाटा उपलब्ध करून दिल्या.
 

राजेश ढोडी यांनी दुधदुभते आणि त्यापासून तयार होणार्‍या खाद्यपदार्थांचे दुकान सुरू केले ते ‘साई डेअरी’ या नावाने. आज ‘साई डेअरी’ ही तलासरीची नामांकित दुग्धजन्य उत्पादन निर्माण करणारी डेअरी आहे. इथले दूध १०० टक्के निर्भेळ आहे, या खात्रीने दुरूवरून लोक या डेअरीचे दूध खरेदी करण्यासाठी तलासरीत दाखल होतात. त्यासाठी तलासरीच्या ७ गोठ्यांमधून राजेश दूध खरेदी करतात. त्यांच्या ‘साई डेअरी’ची दिवसाची उलाढाल कित्येक वनवासी कुटुंबांचे आयुष्य उज्ज्वल करू शकेल इतकी तर नक्कीच आहे. आज ‘साई डेअरी’मध्ये तलासरीतील वनवासी युवक काम करतात. या युवकांना दुधापासून मावा, मिठाई वगैरे खाद्यपदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण राजेश यांनी दिले आहे. एरवी मोलमजुरी किंवा वीटभट्टीवर जाणारी वनवासी युवक आज दुधदुभत्यांच्या व्यवसायात काम करीत आहे.

 

हा प्रवास सोपा होता का? तर नक्कीच नाही. एकतर राजेश यांच्या घरातले तर सोडाच, पण समाजातलेही कुणी या व्यवसायामध्ये नव्हते. दुसरे असे की, राजेश यांची सामाजिक परिस्थितीही अत्यंत प्रतिकूल अशीच. वंचित गटाचे प्रतिनिधित्व करणार्‍या वनवासी समाजातल्या शंकर ढोडी आणि काशीबाई ढोडी यांना पाच अपत्ये. त्यांपैकी एक अपत्य राजेश. घरची आर्थिक परिस्थिती तर अठरा विश्वे दारिद्य्र. तसेही तलासरी तालुका तसा वनवासीबहुलच. ढोडी समाजाचीही इथे ८०० ते ९०० कुटुंबे. मोलमजुरी करणे, शेतावर मजूर म्हणून जाणे हेच समाजाचे सध्याचे अर्थार्जन. घरी पशुधन नाही असे नाही, उलट पारंपरिक पद्धतीने समाजामध्ये पशुधनाचे संगोपन केलेले. मात्र, हे सगळे करत असताना काही समज-गैरसमज आवर्जून जपलेले. जसे तलासरीच्या आजूबाजूच्या परिसराचे शहरीकरण होत असताना तलासरीमध्येही दूध डेअरी आणि त्यापासून खाद्यपदार्थ निर्मिती करणारी आणि विकणारी दुकाने थाटली गेली. तलासरीबाहेरील व्यापार्‍यांनी येऊन इथे या व्यवसायात बस्तान बसवले. मात्र, दुधदुभत्याच्या व्यवसायामध्ये स्थानिक वनवासी कधी नव्हताच. याचे कारण घरच्या गाई-म्हशीचे दुधदुभते तिच्या वासरांसाठीच, असे समाजात एक रुढ समीकरण. फारच आणीबाणी असेल आणि दुसरा काही पर्यायच नसेल, तर अपवादाने एखादाच घरच्या गाईम्हशीचे दूध विकत असे.

 

या पार्श्वभूमीवर राजेश यांनी हा व्यवसाय सुरू केला. आजूबाजूच्या परिसरातील लोकांना दूध हा अर्थार्जनाचा एक घटक आहे, हा विश्वास देण्यापासून ते त्यांना दुधाच्या धंद्यात उतरण्यात मदत करण्यापर्यंत राजेश यांनी पुढाकार घेतला. असो, यापूर्वी राजेश एका दुध डेअरीमध्येच काम करायचे. राजेश तिथेच दुधाच्या व्यवसायातले सर्व बारकावे शिकले. दुधापासून खाद्यपदार्थ बनवायलाही ते तिथेच शिकले. मात्र, तिथले वातावरण पाहून त्यांना वाटे की, दुधाच्या व्यवसायामध्ये नफा असतानाही लोक त्यात पाणी मिसळून बेईमानी का करतात? समाजस्वास्थ्याला धोका का निर्माण करतात? तसेच तिथे राब राब राबूनही पगार मात्र दोन वेळेची भाकरी मिळेल इतकाही नव्हता. शेवटी राजेश यांनी ठरवले की, आपण दुधाचा व्यवसाय करायचा. त्यांनी दूध डेअरी टाकली. पुढे दुधापासून खाद्यपदार्थ बनविण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकेतून कर्जही काढले.

 

मात्र, त्यावेळी या व्यवसायात ते यशस्वी झाले नाहीत. तरीही राजेश खचले नाहीत. ते छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतात. अपयश पदरी पडले असताना त्यांना महाराजांचा संघर्ष आठवला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेच्या स्मरणांनी राजेश यांना पडत्या काळात बळ दिले. त्यांनी ठरवले, आता माघार नाही. पुन्हा त्यांनी कसोशीने प्रयत्न केले. यावेळी त्यांनी पूर्ण कौशल्य, माहिती आणि आधुनिक तंत्राचा वापर करत दूध डेअरी सुरू केली. यश येणारच. मोलमजुरी करणार्‍या स्थानिक समाजबांधवांना अर्थार्जनाची संधी उपलब्ध करूनच द्यायची, हे त्यांनी ठरवले. त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले आणि त्यातूनच ‘साई डेअरी’ आज वास्तव स्वरूपात निर्माण झाली. ‘साई डेअरी’मध्ये विक्रीस असणार्‍या दुग्धजन्य खाद्यपदार्थांबाबत लोकांमध्ये विश्वासार्हता आहे. सातत्याने इथल्या खाद्यपदार्थांची मागणी वाढते, याचे कारण काय आहे?

 

यावर राजेश म्हणतात की,’‘मी प्रामाणिकपणे व्यवसाय करतो. दुधात जराही पाणी किंवा इतर पदार्थ टाकत नाही. हे प्रामाणिकपणाचे संस्कार कल्याण आश्रमाचे, रा. स्व. संघाचे. नेहमी प्रामाणिक राहावे, जे काय कराल ते समाजासाठी, उत्तमाचा ध्यास घेतलेले असायला हवे, हे जे माझ्या व्यवसायाचे ब्रीद आहे, त्यालाही प्रेरणा आहे ती तलासरी वनवासी कल्याण आश्रमाचीच. मी तलासरीच्या वनवासी कल्याण आश्रमाचा विद्यार्थी. नव्वदच्या दशकात आमच्या तलासरीमधले वातावरण पूर्ण लाल बावट्याचे. आम्ही वनवासी कल्याण आश्रमामध्ये शिकतो आणि त्यांच्या बैठकांना जात नाही म्हणून आमच्या घरावर दगड मारले जायचे. पण, आम्हीही ठाम राहिलो. त्या विरोधात आवाज उठवला. त्यानंतर तसे काही करण्याची समोरच्यांची हिंमत झाली नाही. त्यानंतर परिस्थिती झपाट्याने बदलली आहे. समाज, युवक देशप्रेमासाठी, समाजकल्याणासाठी संघटित होत आहेत. वैयक्तिक व्यवसायामध्येही समाजाचे हित पाहणारे राजेश यांच्यासारखे युवक केवळ वनवासीच नव्हे, तर सर्वच समाजासाठी आदर्श आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@