भूखंड प्रकरणावरून शिवसेना एकाकी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2019
Total Views |



भूखंड ताब्यात घ्या; अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा विरोधकांचा इशारा


मुंबई : मुंबईतील आरक्षित भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याच्या विरोधी पक्षाच्या आरोपावरून सोमवारी पालिका सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. भाजपने विरोधी पक्षाला पाठिंबा दिल्याने शिवसेना सभागृहात एकाकी पडल्याचे दिसून आले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भूखंडांचे वादग्रस्त प्रकरण शिवसेनेच्या अडचणी वाढविणारे ठरण्याची शक्यता आहे.

 

गेले काही महिने मुंबईतील आरक्षित भूखंड घोटाळे प्रकरण महापालिकेत गाजत आहे. कुर्ला येथील ६०० कोटींचा भूखंडाच्या खऱेदी सूचनांचा प्रस्ताव सुधार समितीत दप्तरी दाखल करून बिल्डरच्या बाजूने निर्णय घेतल्याने शिवसेना टीकेचे लक्ष्य बनले. प्रकरण शेकल्याने या प्रकरणी यू टर्न घेत शिवसेनेला हा प्रस्ताव सभागृहात परत आणावा लागला. यातून धडा न घेता नव्या वर्षाच्या प्रारंभी पोयसर, गोरेगाव येथील सहा आरक्षित भूखंडाचा प्रस्तावही दप्तरी दाखल करून शिवसेनेने बिल्डरांना मदत केल्याचा विरोधकांनी आरोप करून शिवसेनेला पुन्हा अडचणीत आणले. सोमवारी सभागृहात विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी यावर निवेदन करून प्रशासनासह शिवसेनेला जाब विचारला. विरोधी पक्षासह भाजपही आक्रमक झाल्याने शिवसेना सभागृहात एकाकी पडल्याचे चित्र दिसले. समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख, राष्ट्रवादीच्या राखी जाधव तसेच भाजपचे गटनेते रईस शेख यांनी आपल्या भाषणातून शिवसेनेवर टीकेची झोड उठवली. यानंतर सुधार समिती अध्यक्ष दिलीप (मामा) लांडे यांनी याबाबत स्पष्टीकरण देण्याऐवजी जुनी प्रकरणे उकरून काढून विषय भरकटवल्याने भाजप व विरोधी पक्ष आक्रमक झाले.

 

शोर है शोर है शिवसेना चोर है, लांडेमामा चोर है, परत घ्या परत घ्या सहा भूखंड परत घ्या,” आदी घोषणाबाजी करीत सभागृह दणाणून सोडले. भाजपचे नगरसेवकही विरोधकांसोबत घोषणा देत उभे राहिल्याने सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. त्यानंतर शिवसेनेचे नगरसेवकही उभे राहिले. सत्ताधारी-विरोधी पक्ष आमनेसामने आले. विरोधकांनी जवळपास अर्ध्या तासाहून अधिक वेळ घोषणाबाजीने हल्लाबोल करीत शिवसेनेची कोंडी केली. सभागृहात आतापर्यंत पहारेकऱ्यांची भूमिका बजावत विरोध दर्शवला तरी शिवसेनेसोबतच असल्याचे दाखविणाऱ्या भाजपने यावेळी शिवसेनेला एकटे अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. प्रचंड गदारोळ, कागदी बोळे फेक, कागदी विमाने सोडून शिवसेनेला टीकेचे लक्ष्य केले. अखेर प्रचंड गदारोळात भूखंडाबाबतच्या प्रस्तावावर काहीच निर्णय न घेता दुसरा विषय घेऊन महापौरांनी सभागृह सुरू ठेवले.

 

विरोधकांचे आरोप बिनबुडाचे - शिवसेना

 

आरक्षित मोकळे भूखंड कोणाच्याही घशात घालू देणार नाही. सहा भूखंडांबाबत शिवसेना सभागृहात भूमिका मांडणार होती. विरोधकांनी ती ऐकून घ्यायला हवी होती. परंतु, भाजपसह विरोधकांनी गोंधळ घालून बिनबुडाचे आरोप केले. सुधार समितीत आरक्षित भूखंडाचा प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला होता. काँग्रेसच्या सदस्यांनीही प्रस्तावाच्या बाजूने मतं मांडली होती. मग काँग्रेसने बिल्डरांसोबत सेंटिंग केली, असा आरोप करायचा का?, असा प्रश्न स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला. तसेच सहापैकी पाच भूखंड हे एकाच मालकाचे असताना प्रशासनाने वेगवेगळे प्रस्ताव का बनवले, याचा जाब विचारण्याची जबाबदारी सत्ताधारी शिवसेनेची आहे. शिवसेनाही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे एकही भूखंड सोडणार नाही, असा दावा जाधव यांनी केला.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@