बेलापूरमध्ये शिपयार्ड क्लस्टर उभारण्यात येणार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2019
Total Views |



महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांची मान्यता

 

मुंबई : बेलापूर येथे शिपयार्ड क्लस्टर व कार्गो जेट्टी उभारण्यास तसेच महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डास दोन नव्या अत्याधुनिक फेरी बोटी खरेदी करण्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली. यासोबतच एलिफंटा (घारापुरी) येथील जेट्टी वाढवून त्याचा विकास करून तेथे पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा निर्माण करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. मेरीटाईम बोर्डाची ७४वी बैठक फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

 

एलिफंटा येथील जेट्टी लहान असल्यामुळे अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे या जेट्टीचा विकास करण्यात येणार आहे. त्यामध्ये जेट्टीची रुंदी वाढविणे, पर्यटकांसाठी सोयी सुविधा निर्माण करणे आदी कामे करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. तसेच मेरीटाईम बोर्डासाठी दोन नव्या फेरी बोटी घेण्यास यावेळी मान्यता देण्यात आली असून या बोटी गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा व गेट वे ऑफ इंडिया ते अलिबाग या मार्गावर चालविल्या जाणार आहेत.

 

वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाजवळील बोर्डाच्या जेट्टीच्या ठिकाणी बार्जवर ग्लास हाऊस सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी येथील जेट्टीचा विकास, धरमतर खाडीमधील शहाबाज (जि.रायगड) येथे कॅप्टीव्ह जेट्टी बांधणे, पनवेल येथील मौजे तरघर येथे कॅप्टिव्ह जेट्टी उभारणे, वसई खाडीमधील घोडबंदरजवळ बहुउद्देशीय जेट्टी उभारणे, अलिबागमधील थेरोंडा येथे मरिना प्रकल्प उभारणे आदी प्रस्तावांनाही यावेळी मान्यता देण्यात आली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@